*✤_______________________________✤*
*╭════════════════════╮*
* ●ओथंबलेले क्षण●*
*╰════════════════════╯*
*○रांगोळी समृद्ध जीवनाची○*
आज जरा लवकरच जाग आली… सूर्योदयाला थोडा वेळ होता. विचार केला चला सडा टाकून घेऊ… अंगणात छान सडा टाकला. कुंडीतील रोपांना अगदीं मनसोक्त पाणी दिलं… कुंडातील चीनी गुलाब, कोरफड, शेवंती पाणी दिल्यावर बिचारी शहारून गेली.. आणि गालातल्या गालात हसू लागली. त्यांना पाणी दिलं आणि माझ्या मनाला एक वेगळच समाधान मिळालं..
तुळशीवृंदावनासमोर रांगोळी रेखाटायला घेतली. रांगोळी रेखाटण्याचा माझा नित्यनियम. ठिपक्यांची छान रांगोळी काढली, या रांगोळीला वेली आणि पाने- फुले यांनी सजवली. ती पांढरी रांगोळी फार आकर्षक वाटत नव्हती. काहीतरी उणेपणा मला तिच्यात जाणवत होता. रंग उचलले रांगोळीत भरलेही हिरवा, केशरी, निळा, पिवळा, गुलाबी. रंग भरल्यावर ती खूप सुंदर दिसू लागली. मी समाधानाने पुन्हा एकदा रांगोळीकडे पाहिलं. आता माझ्या मनासारखी झाली होती… सूर्योदयानंतर सूर्याची किरणे पडल्यावर ती अधिक सुंदर दिसू लागली.
मनात विचार आला आयुष्यही असंच असावं नाही का??? आपल्या आयुष्यात ओकेपणा येऊ नये म्हणून काही माणसं आयुष्यात रंग भरतात.. जीवनाची रांगोळी अशी पांढरी असेल तर थोडी उदासीनता येत असेलही कदाचित, पण त्यामध्ये रंग भरले तर तिला एक वेगळाच आकर्षकपणा येतो. ती सगळ्यांचेच मन मोहून घेते….
आपल्या आयुष्यात आपल्यावर प्रेम करणारी, आपल्याला समजून घेणारी, आपल्या जीवनाच्या रांगोळीत रंग भरणारी माणसं खूप महत्त्वाची असतात. मग ती व्यक्ती कोणीही असेल!! आपले आई-वडील, आपल्या मित्र-मैत्रिणी, आपला जोडीदार किंवा आपली बहिण -भाऊ. अशा व्यक्ती आपले आयुष्य खूप आकर्षक आणि हवहवसं बनवतात. अशा प्रेम करणाऱ्या ,आपल्या सुखदुःखात सोबत उभा राहणाऱ्या माणसांमुळे, आपल्या जीवनाची रांगोळी नक्कीच सुसंस्कृत, समृद्ध बनते. त्यामध्ये असणाऱ्या रेषा, फुले, पाने, विविध आकार हे, आपल्या आयुष्यात येणारे वेगवेगळे प्रसंग आणि हे सगळे विविध रंग म्हणजे त्यामध्ये आपल्या जिवलग माणसांनी दिलेली साथ असते.
आपण बोलतच नाही मूक राहतो, पण जीवनाची रांगोळी सर्व काही बोलून जाते, त्यामुळे ती रांगोळी रंगीबेरंगी,आकर्षक ,छान व समृद्ध करण्याचा प्रयत्न करायला हवा,
समृद्ध रांगोळीचा ठेवा जपायला हवा तरच जगणं समृद्ध होईल….
*”रांगोळी सुंदर जीवनाची रेखाटू,
रंग त्यात प्रेम – चैतन्याचे भरू.”
_- सुसिमा
@All rights are reserved.
२३/०५/२०२०
*╰✤▬▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬▬✤╯*
╰══════════════════╯