Featured

*माझ्या गावचा धडा*

*कवयित्री – श्रीम. सुसिमा म्हाळसाकांत थोरात.

*कवयित्री परिचय – १) शिक्षकांसाठी घेतल्या जाणाऱ्या विविध स्पर्धांमध्ये सहभाग व यश संपादन.

२) विज्ञान प्रदर्शनात सहभाग व यश संपादन.

३) एक उत्तम लेखिका व कवयित्री स्वतःचा ब्लॉग आहे.

४) शाळेत नाविन्यपूर्ण उपक्रमांच्या अंमलबजावणी.

*शाळेचे नाव – जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, आंधळी.

तालूका – पलूस, जिल्हा  – सांगली.

*कवितेचे नाव – माझी शाळा

*इयत्ता – दुसरी*

*माझी शाळा*

गावाबाहेर नदीकाठी,

आहे माझी शाळा,

घडवी चिमुकल्या मुलांना,

देई प्रेम नी लावी लळा.

रोपे सुंदर शोभेची,

डोलती  शाळेभोवती,

फुलपाखरे रंगीबेरंगी,

आहेत माझे सोबती.

मंजुळ गाणे गाते येरळामाई, 

सुखावे साऱ्या गावाला,

पिंपळ मोठा धरी सावली पुढे,

देई गारवा शाळेला…

बालचमू ज्ञान घेती,

हसती, बागडती आनंदाने,

ज्ञान  चांगले वागण्याचे,

शिक्षक देती मोदाने…

*शब्दार्थ

लळा – प्रेम

सोबती – मित्र

मंजुळ – मधुर

मोद – आनंद

*स्वाध्याय*

१)माझी शाळा कुठे आहे?

२) शाळेभोवती कोण डोलत आहे?

३) मंजुळ गाणे कोण गात आहे?

४) शाळेला गारवा कोण देत आहे?

*सफर जंगलाची…..*

Featured

हिरव्या हिरव्या रानात,

कापूस नाचतो,

पांढराशुभ्र ससुल्या,

टुणटूण उड्या मारतो.

             आकाशात जमले

             ढग काळे वर.

             पिसारा फुलवून,

             थुई  थुई नाचे मोर.

आंब्याच्या झाडावर

कुहुकुहू करते,

काळी कोकिळाताई,

गोड गळ्याने गाते.

           हिरव्या हिरव्या झाडावर

           पेरू फोडून खातो,

           पोपटराव आमचा,

           विठू विठू बोलतो.

सोंड हलवून अभिवादन

हत्ती दादा करे,

जंगलात असती,

त्याचे भलते तोरे.

        वाघोबाची स्वारी,

        डरकाळी फोडी,

        सारे हिरवे जंगल,

        दणाणून सोडी..

माडावर उंच उंच,

सरसर चढते वर,

पट्टेरी खारुताईला ,

आहे खूपच जोर..

      राजा जंगलचा सिंह,

      ऐटीत चालतो,

      गर्जनेने त्याच्या,

      साऱ्यांना घाबरवून सोडतो.

                                – सुसिमा थोरात.

                               23/07/2024

@All rights are reserved.

@Image source – Google.

नारीशक्ती

Featured

घडवलेली विधात्याने एक अप्रतिम कलाकृती,

असे स्त्री शक्ती तीच नारीची आकृती.

घेऊन आसमंत कवेत ठेवी पाय अंतराळात,

ओलांडून सारी क्षितीजे ती आहे पोहोचली नभात.

दिला वसा जो सावित्रीने ती पेलतेय नेटाने,

ठेवूनी जाण मांगल्याची टाकतेय पाऊल बेताने.

काही नको असे तिला आदर मात्र हवा,

एक आधाराचा हात फिरायला पाठीवरून हवा.

तीच रणरागिणी, दुर्गा,भवानी तीच असे,

तिच्यावाचून जगच थांबेल पर्याय तिला नसे.

आदिशक्तीचे रूप तीच,गृहलक्ष्मी ही तीच असे,

सर्व क्षेत्रात धुरा फक्त तिच सांभाळत असे.

ज्ञानाची बहीन तीच,रामाची सीता तीच असे,

सहधर्मचारिणीला न्याय मिळावा अपेक्षा हीच असे.

असो वा नसो आधार तिला स्वप्न मोठे असावे उरात,

मिळेल अजून संधी तर जग करेल पादाक्रांत.

– सुसिमा

*फुलावे कोणासाठी?…. *

पावसाळ्याचे दिवस होते….ऑगस्ट महिना मध्येच थोडी पावसाची भुरभुर, श्रावण महिना म्हणजे पर्वणीच ….  पावसामुळे मॉर्निंग  वॉक बऱ्याच दिवसांपासून बंद झाले होते… त्याचा परिणाम मनावर आणि शरीराला सुद्धा स्पष्ट दिसत होता…आज ठरवलेच होते पाऊस असेल तरी मॉर्निंग वॉकला जायचे … पाऊस नुकताच पडून गेला होता… लहानपणीपासून बॉडी क्लॉक जबरदस्त सेट झाले होते चार – साडेचार वाजता उठायचेच पण तरीही मॉर्निंग वॉकला जाणे झालेच नव्हते…..

मॉर्निंग वॉकला गेले…मस्त पाऊस पडला होता.. संपूर्ण निसर्ग , पर्यायाने  झाडे , वेली ,फुले न्हाऊन निघाल्या होत्या.. धुंद झाल्या होत्या…बघून मनाला सुखद वाटले… बऱ्याच घरांच्या कुंपणातून पारिजात, मोगरा, रातराणी, सोनचाफा, केवडा , कण्हेरी अशा फुलांचा सुगंध दरवळत होता…. तो मनाला खूप प्रफुल्लित करत होता … पावसात न्हाऊन निघालेली ती फुले खूप सुंदर दिसत होती….तृप्त झाली होती….

मनात विचार आला, फुलांच आयुष्य किती चार दिवसाचे…. तरी किती त्याग त्यांचा… चार दिवसाच्या आयुष्यात इतरांना सुगंधित करायच, आनंदात जगायचं…..वाटायचा तो सुगंध पायदळी तुडविणारांनाही, कुस्करणाऱ्या हातांनाही…आणि फांदीपासून वेगळे करणारालाही…. सोनचाफ्याची दोनच फुले एक केसात माळले आणि एक टेबलवर ठेवले, तरी दिवस संपूर्ण हवेत तरंगल्यासारखा भासतो मला…. त्यांचे किती उपकार ते आपल्यावर..

अनंत किती दूरवर उमलला तरी त्याचा सुगंध संपूर्ण परिसराला धुंद करून सोडतो…. फुलं आपलं जीवन इतरांना सुगंध देण्यात व्यतीत करतात…. जगावे लागते इतरांसाठी म्हणून ते कधी दुःख करताना आपण पाहिले आहे का? की त्यांनी किती प्रश्न केला आहे.. फुलावे कोणासाठी?…. उमललो कोणासाठी ???  …. ‘उमललो कोणासाठी’ हे महत्त्वाचे नसतेच मुळी… उमलल्यानंतर इतरांना सुगंध देत राहणे…. मग तो कोणीही असो… हे आपलं कर्तव्य जसं फुल सोडत नाही….. त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्यात इतरांना होईल तेवढी मदत करायची… कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता …. अडल्या नडलेल्यांना मदत करावी…

यातून जे आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो तोच आपल्या जीवनाला जगण्यासाठी नवी उमेद आणि उभारी देते…

“जगाच्या कल्याणा देह  कष्टवावा..” 

  या तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार फूलाप्रमाणे आपले जीवन व्यतीत कराव… आपला आयुष्य आपल्या स्वतःसाठी नसतेच मुळी, त्यामध्ये होता होईल तेवढे इतरांचे कल्याण करायच..

फुल झाडाचा सर्वात कोमल,नाजूक आणि सुंदर भाग… फुलपाखरे, मधमाशा, भुंगे त्यांच्यातील मध सेवन करतात…..आयुष्य चार दिवसाच तरी आनंदात डोलायचं… वाटायचं तो परिमळ, वाढवायची ती शोभा निसर्गाची… आणि आयुष्याची सुद्धा इतरांच्या…

तसच काहीस आपल आयुष्य असावं….छोटंसं पण त्यात भरभरून जगाव… आनंद आणि परिमळ उधळावा दाही दिशांत.. जेणेकरून जगण्याचा आनंद काय असतो??  हे इतरांना उमगावे आपसूकच आपल्याकडे पाहून….बस इतकेच .. असेच असावे,आपले जगणे आणि फुलणे सुद्धा….

  • सुसिमा थोरात.
  • 19/08/2026
  • @All rights are reserved.
  • @Image source – Google

*फुलावे कोणासाठी?…. *

*नवी क्षितिजे…. *

                                

          आज ती मला भेटायला आली होती… तिने मला डोळे बंद करायला सांगितले. एक सुंदर साडी हातावर ठेवली, मी डोळे उघडले,साडी खरच खूप सुंदर होती…ती साडी बाजूला ठेवून तिने मला एक घट्ट आलिंगन दिले….तिच्या डोळ्यातील आनंदाश्रू वाहत होते.. केंद्रप्रमुख म्हणून माझी नियुक्ती झाली, याचा आनंद माझ्यापेक्षा जास्त तिलाच होता…तिच्या डोळ्यातून निघणारे आनंदाश्रू पाहून, माझ्याही डोळ्यात अश्रू उभे राहिले..

         आजवर अविरत कष्ट केल्यानंतर, हा दिवस माझ्या आयुष्यात उगवला होता… याची मला आणि तिलाही पुरेपूर जाणीव होती…माझ्या यशाच्या आनंद माझ्यापेक्षा माझ्या मैत्रिणीला जास्त झाला होता.. आजवरच्या वनवासाचं प्रामाणिकपणाचं चीज झालं होतं…मी कुठेतरी मोठ्या पदावर जावं असं स्वप्न माझ्यापेक्षा तिने उरी  बाळगलं होतं..ती नेहमी म्हणायची “सुसिमा ही तुझी जागा नाही,.. तू मोठी कोणी अधिकारी बनणार” ….आज वरच्या सोबतचा प्रवासात माझ्या सुखदुःखाची, सर्व घटनांची ती एकमेव साक्षीदार होती.. दुःखाचे क्षण आले,असे म्हणण्यापेक्षा  दुःखाचे कढत अश्रूच जास्त वाट्याला आले.. तरी सर्वांच्या आशिर्वादाने आयुष्यात एक पायरी वरती चढले…

       बालपणापासून होत आलेली परवड आणि परिस्थितीच्या चटक्यांमुळे भोगावा लागणारा वनवास यांनीच मला या सुंदर  वळणावर आणले होते… जिद्द, चिकाटी, संयम आणि प्रयत्नातील सातत्य यांनीच मला या मुक्कामी पोहचवले होते… पुढील प्रवास खूप सुंदर आणि सुखाचा, आयुष्यात सुख आणि सुगंध देणारा आहे…याची मला पुरेपूर जाणीव झाली.       

       शुभेच्छा, शुभ भावना, शुभाशीर्वाद यांचा अक्षरशः पाऊस पडत होता …मन आनंदाने न्हाऊन निघाले ……पावसाळ्याचे दिवस होते..पावसाच्या सरी बाहेर बरसत होत्या…. पण माझं मन मात्र सुंदर क्षणांनी चिंब भिजलेले होते…. सुखावले होते…

     . आज इतक्या वर्षांच्या कष्टाचे सार्थक झाले होते….चीज झाले होते… पुढचा प्रवास सुखमय होणार याची खात्री होती…. सुखाचा एक दीर्घ उसासा आम्ही दोघींनी टाकला होता.. ..नवीन क्षितिजे खुणावत होती… पुन्हा एकदा मला कवेत घेण्यासाठी ती सज्ज झाली होती… या गोष्टीचा आनंद किती आणि कसा वर्णावा…. तो अनुभवत असेल त्यालाच समजणारा असतो…तरी प्रवास संपलेला नव्हता… नवी ध्येये आणि नवीन क्षितिजे पुन्हा खुणावत होती… त्यांच्याकडे वाटचाल करण्यासाठी… पुन्हा एकदा मी सज्ज झाले होते..

   .                – सुसिमा म्हाळसाकांत थोरात

                        08/07/2026

@Image source – google.

@All rights are reserved.

*नवी क्षितिजे…. *

*कॅलेंडर….*

    

     खर तर लिहायला थोडासा उशीरच झाला.. डिसेंबर महिना सुरू होताच आपल्याला सर्वांना आवर्जून खरेदी करावी लागणारी व नियमितपणे आपल्या डोळ्यासमोर असावी अशी गोष्ट म्हणजे कॅलेंडर…दिवाळी संपताच नवीन कॅलेंडरची विक्री सुरू होते… प्रत्येकाला क्षणोक्षणी, दररोज हवी असणारी गोष्ट म्हणजे कॅलेंडर..

एके सकाळीच “नवीन वर्षाचे कॅलेंडर, महालक्ष्मी, भाग्योदय कॅलेंडर….” असा आवाज कानावर पडताच मी गॅलरीत जाऊन पाहिले तर एक अगदीच म्हातारे,अपंग आजोबा, ज्यांना एक एक पाऊल मोठ्या कष्टाने टाकावे लागत होते…असे सायकलला दोन्ही बाजूला कॅलेंडरच्या पिशव्या अडकवून, कॅलेंडरची विक्री करत होते… मी थोडा वेळ खाली जाईपर्यंत तर ते दूर गेले होते….मी पळत जाऊन त्यांना गाठले आणि थांबवून कॅलेंडरची किंमत विचारली… त्यांनी पन्नास रुपये सांगितले.. मी पैसेच नेले नव्हते..आधी मला त्यांना थांबवायचे होते.. त्यांना तिथेच थांबवून धावत जावून पैसे आणले आणि कॅलेंडर विकत घेतले…. कॅलेंडरवर किंमत बघितली तर ती 55 रुपये होती.. मी त्यांच्याकडून कॅलेंडर घेईपर्यंत आजूबाजूच्या दोघे तिघीजणी आल्या व त्यांनी कॅलेंडर विकत  घेतली.. ही सकाळी सकाळी झालेली विक्री पाहून त्यांच्या चेहऱ्यावर थोडे समाधान दिसले…..

हळूहळू एक एक पाऊल ते लंगडत- लंगडत सायकल आणि स्वतःचा बॅलन्स करत होते .. कानाला घातलेली लोकरीची साधीशी टोपी आणि अंगावर असलेली साधीशी कपडे असे त्यांचे पहाटेपासूनच  थंडीत विक्रीचे काम चालू होते…मला त्यांच्याजवळ कॅलेंडर खरेदी करून बरे वाटले..

आपणही दरवर्षी कॅलेंडर खरेदी करतो,पण ते मॉल,दुकान अशा ठिकाणी खरेदी करतो.ते अशा ठिकाणी न खरेदी करता एखाद्या गरजू ,अपंग व्यक्तीजवळ खरेदी केले तर त्यांनाही दोन पैसे मिळतील आणि त्यांच्या चेहऱ्यावर असलेले समाधान आपल्याला कायमस्वरूपीसाठी आत्मिक समाधान देऊन जाईल.

  आपल्या सर्वांनाच या जगातून एक दिवस निरोप घेऊन निघून जायचे आहे.जाताना तर कोणी पैसे, दागदागिने ,संपत्ती सोबत नेत नाही,परंतु जिवंत असताना तरी अपंग, वृद्ध असून  शारीरिक कुवत नसताना सुद्धा, कधी लहान वयात परिस्थितीमुळे कष्ट करून खाण्याची वेळ काही  जणांवर येते…असे असताना सुद्धा अशा कष्ट करणाऱ्या हातांना एक संवेदनशील मनाने, आपण जर त्यांचा विचार केला, तर आपल्यालाही त्याचे समाधान मिळेल आणि समोरच्यालाही जीवनाचा आनंद क्षणभर का होईना घेता येईल…

   मी गेली तीन-चार वर्षे अशाच व्यक्तीकडून कॅलेंडर विकत घेत आहे.प्रत्येक वेळी दुकानात गेले की नवीन कॅलेंडर दिसतात पण उदबत्ती, कॅलेंडर अशा रोजच्या वापराच्या काही वस्तू  विकायला रस्त्यावर  येणाऱ्या गरीब, अपंग , गरजू , वयस्कर माणसांना नेहमी संवेदनशील मनाने वागणूक द्या…त्यांच्याकडे त्या वस्तू आपण विकत घेतल्या तर त्यांना काही फार मोठा मोबदला मिळतो असे नाही पण त्यांना जो काही दोन-चार रुपयांचा किरकोळ मोबदला मिळतो त्याच्यावर त्यांची दिवसाची उपजीविका अवलंबून असते…. मंदिराच्या दरवाजात बसलेला भिकाऱ्याला आपण दोन पाच दहा रुपये सहज जाता जाता देऊन जातो… की जो कसलेच कष्ट घेत नाही… परंतु अपंग असून, शारीरिक कुवत नसताना गरीब असताना सुद्धा…. कधी बालवयात असताना सुद्धा परिस्थिती पुढे हतबल न होता स्वाभिमानाने जगणाऱ्या माणसांना अशा पद्धतीने त्यांच्याकडे आपण खरेदी केली….तर त्यांचा स्वाभिमान, त्यांचा आत्मसन्मान जपला जाईल आणि आपल्यालाही त्या गोष्टीचे समाधान , आनंद मिळेल…..

परमेश्वराने आपल्या पदरात खूप काही दान न मागताच टाकले आहे… त्याचा उपयोग, विनियोग चांगला केलाच पाहिजे.. पण थोडी सहानुभूती म्हणून ,माणूस म्हणून सुद्धा एखाद्या गोष्टीचा विचार करता आला पाहिजे की,जे खरच परिस्थिती पुढे हतबल न होता,कष्ट करत आहेत…याच हातांना आपण सुंदर हात म्हणावे का….???? मित्रांनो नवीन वर्ष सुरू होतंय, जुन वर्ष संपत आहे….नवीन वर्षात असेच काही नवे संकल्प करूया,…. चांगल्या गोष्टी छोट्या- छोट्या ज्या आपण सहज जाता जाता करू शकतो…. त्यामुळे एखाद्याची खूप मोठी मदत होऊ शकते तर अशा चांगल्या गोष्टी नक्कीच करण्याचा प्रयत्न करूया…..

  • सुसिमा थोरात.
  • 25/12/2025

@All rights are reserved.

*तयासी जीवन ऐसे नाव….*

आज मी खूप बदललेय, परिस्थितीत मिळालेल्या चटक्यांनी, वेदनादायी अनुभवांनी, होरपळून गेलेल्या क्षणांनी, करपलेल्या या माझ्या काळजाने मला जगात जगायला शिकवले…
जेवढ्या आपण समोरील माणसांकडून अपेक्षा ठेवू तितके अधिक दुःख वाट्याला येते .. प्रेम आयुष्यात प्रत्येकाला मिळतेच असे नाही.. पण तरीही एखाद्या व्यक्तीवर प्रेम करणे म्हणजे, तिच्यावर हक्क गाजविणे नाही.. तर तिला समजून घेवून , त्या व्यक्तीचे आयुष्य आनंदी बनविणे, म्हणजे खरे प्रेम असते…..
समोरच्या व्यक्तीशी वाद घालून, तिने आपल्याला समजून घ्यावे ही अपेक्षा ठेवून, दुःख करत बसण्यापेक्षा शांत राहून आपले आयुष्य सुखात जगणे आता मला बरे वाटते…. 
शांत राहणे म्हणजेच मौन यासारखा परीस नाही… कोणताही गहन आणि कठीण प्रश्न मौनात सोडविण्याची ताकद असते…
आणि खर वास्तविक पाहता , जे आपले आहे आणि आपल्या नशिबात आहे ते कसेही करून मिळतेच.. पण जे आपले नव्हतेच ते ओरबाडून आपले बनविण्यात ही काही अर्थ नाही..
खूप बदलून घेतल मी स्वतःला…
म्हणजे आयुष्यात आलेल्या बऱ्या वाईट प्रसंगांनी .. मला खऱ्या अर्थाने दुनियादारी दाखवली …. मला जगायला शिकवलं.. प्रारब्ध जे चटके देईल ते सोसायला शिकवलं…
आयुष्यात भेटणारी माणसं .. खरचं आपली कोण आणि परकी कोण हे ओळखायला शिकवलं… वेळ सर्व काही शिकवून गेली… यापुढेही जाईल…
काही माणसांचं आयुष्य म्हणजेच पेटणारा धगधगता वणवा असतो… त्या  वणव्यात उभ आयुष्य जळून जातं…काही वेळा आपणच प्रत्येक गोष्टीला जबाबदार असतो असेही नाही… परिस्थिती तशी निर्माण होते की काहीच पर्याय उरत नाही….पण आपल्यावर वेळ येते, संकट येतात .. आणि खूप काही शिकवून जातात…
  या सर्व गोष्टी आणि प्रसंग हेच आपले खरे गुरू असतात…
जे आपल्याला जगण्याचं.. म्हणण्यापेक्षा आत्मसन्मानाने जगण्याचे तत्त्वज्ञान शिकवतात…..
आता कशाचे काही वाटत नाही… कोणाबद्दल असुया नाही, घृणा नाही, द्वेष नाही , कोणावर कसली जबरदस्ती नाही, अपेक्षा नाही आणि प्रेमही नाही… शांत राहून आयुष्यात जे घडेल ते निर्विकार भावनेने पाहणे आणि आयुष्यात येणारा निवांतपणा अनुभवने… कशाचीच अगदी कशाचीच अपेक्षा न करता.. तटस्थपणे आयुष्याकडे पाहणे अगदी निर्विकारपणे…

  • सुसिमा थोरात.
  • ११/१२/२०२५

@All rights are reserved.

@Image source – Google.

*व्रत हरतालिकेचे….*

आज तिने फक्त लांबूनच रस्त्यावरील हरतालिकेच्या मूर्तीला हात जोडले…. दोन्ही हाताला दोन मुले घेऊन रस्त्याने ती चालत होती… रस्त्याच्या एका बाजूला हरतालिकेच्या रंगीत व न रंगवलेल्या छोट्या-छोट्या मूर्ती विकणारा बसला होता… नकळत तिच्या डोळ्यातून अश्रू ओघळले तिने हात जोडले आणि ती पुढे निघाली….

दिसायला ती सुंदरच होती….  नाकी डोळी एकदम नीटस… काळेभोर लांब, दाट केस…. कपाळ भाग्यशाली होत तिच…. रेखीव भुवया, पाणीदार आणि भावनाप्रधान असणारे डोळे…. हाताची लांब सडक बोटे…पायात ही लक्ष्मी होती तिच्या…गोरी नाजूक त्वचा ….बघता क्षणी कोणालाही भुरळ पडावी असे लावण्य तिच्या पदरात देवाने घातले होते….चार चौघीत अगदी उठून दिसायची…आयुष्य मात्र तिचे कधीच चार चौघी सारखे सामान्य तिच्या वाट्याला आलेच नव्हते….

लहानपणीपासून कधी आई-वडिलांचे प्रेम मिळाले नाही… साथ मिळाली नाही…अभ्यासात हुशार असूनही तिने परिस्थितीवर मात करून स्वतःच्या मनासारखे नसले तरी शिक्षण घेतले… तरी ती थांबली नव्हती…जगराहाटीप्रमाणे पाहुणे बघायला आले… हुंडा काही मागितला नाही म्हणाल्यावर.. नातेवाईकांनी लगेच सोपस्कार उरकले … याद्या करून घेतल्या….लग्न पार पडले…ती आनंदात होती .. आता आपण खूप सुखी राहू या आशेवर .. पण त्यानंतर तिची पूर्ण निराशा झाली…. तिचा जोडीदार तिला म्हणावा असा जीवाभावाचा भेटलाच नाही…. होणारा मानसिक त्रास, वाट्याला  आलेली अवहेलना….आणि अपमान,खूप सगळं मनस्ताप ती सहन करत होती…. या सगळ्यात एक मूल पदरात पडले.. …तिच्या नवऱ्याचे पापाचे माप भरले…..एका आजारात तिच्या जोडीदाराचा दुर्दैवी मृत्यू झाला….

माहेरचा कसलाच आधार नसताना…. सासरच्यांनी तिला घराबाहेर काढले….तिच्यावर आभाळ कोसळले… नवरा मेलेल्या स्त्रीला… स्वतः मेले तरी समाजाला तिची दया येत नाही….सर्व संकट तिच्या पुढे दत्त म्हणून उभा राहतात …त्यावेळी तिच्यासाठी माहेर – सासर अशी सर्वच दारे बंद होतात….म्हणावी अशी नोकरीही नव्हती..

अर्थार्जनाचे काही साधन नसल्याने ती पार कोलमडून गेली होती.. आणि अशा सगळ्या परिस्थितीत पदरी असणारे मूल या सगळ्यातूनच वाट काढत धाडसीपणाने तिने चांगली शिक्षिकेची  नोकरी मिळवली….मुलाचे चांगले पालनपोषण करायला तिने सुरुवात केली….. थोडे दिवस असेच सूर बसतो न बसतो तोच….एक व्यक्ती तिच्या आयुष्यात आली… तिचे सौंदर्य, कष्टाळूपणा , नोकरी पाहून त्याने तिला लग्नासाठी मागणी घातली…. मुलाला सांभाळतो “सर्व जबाबदारी घेतो”..असे वचन दिले… तिला असे एकटीला जगण्याचा कंटाळा झाला होता… तरी देखील तिने त्या प्रस्तावाचा जाणीवपूर्वक विचार केला…. ठीक आहे ,सगळी जबाबदारी घेतच आहे तर आपण दोघं मिळून काम करू… नव्याने संसार उभा करू ….  या आशेवर तिने त्याच्याशी लग्नाला होकार दिला…. छोटेखानी लग्न उरकले…पण आता तिची खऱ्या अर्थाने फरफट झाली ..त्याने दिलेली वचन त्यांने दिलेले शब्द या सगळ्याला तो विसरला होता …त्याला फक्त तिच्या पैशांशी मतलब होता तिने पैसे कमवून आणायचे आणि ह्यांनी काढून घ्यायचे आणि नको तिकडे उडवायचे…. ती हतबल झाली .. सुखाचा जीव पुन्हा नव्याने तिने दुःखात  घातला…पोटच्या मुलावर होणार अन्याय तिला सहन होईना … तिला स्वतःला सुद्धा तिने मिळवलेले पैसे वापरता येत नव्हते …..त्याचा उपयोग करून एक चांगले आयुष्य तिला  जगता येत नव्हते…..दुसऱ्या लग्नामुळे फक्त तिच्या वाट्याला एक फरफट आली होती… आणि दुसरे लग्न म्हणून तिच्यावर पराकोटीचा अन्याय ती व्यक्ती तिच्यावर करत होती…. अशातच एक मूल तिच्या पदरात पडले…पुन्हा अजून एक जबाबदारी वाढली ….ती सुन्न झाली ..अशा पद्धतीने जगण्याचे मोल ती हरवून बसली .. .. एक एक दिवस तिला नको नको होत होता…जगण्याने तिला एवढे छळले होते.मरण या सगळ्यातून तिची सुटका करणार होते…. पण दोन लहान मुले त्यांची जबाबदारी टाकून ती मरू शकत नव्हती….

हरतालिकेचे निर्जळी व्रत लहानपणीपासून ठेवून आज तिच्या  वाट्याला हे सौभाग्यसे लेण आलं होतं… अशा या मिळमिळीत सौभाग्य पेक्षा ढळढळीत वैधव्य  तिच्यासाठी वरदान ठरल होत…. परंतु त्यानंतर ही तिची याच्यातून सुटका नव्हती…

ढळढळीत वैधव्याने देखील तिच्या जगण्याची उंची अधिक वाढवली होती…. नोकरीमध्ये तिला म्हणावसं मान सन्मान मिळत होता… मुलांना ती मायेने वाढवत होती… तीच त्याची आई आणि बाप होती… कोणत्याच नातेवाईकांनी तिला कसलाच मानसिक, आर्थिक आधार दिला नव्हता….. एकाकी पणे तिची झुंज सुरू होतीच… त्यात दुसऱ्या लग्नाचा भयंकर मोठा शाप तिला मिळाला …तिथे नव्याने तिची फसवणूक झाली… पुन्हा नव्याने ती दुसऱ्या परक्या माणसं सोबत मुलांसह भरडली जावू लागली …. विधवा बाई  केली…म्हणून सासर ही पोटाशी धरणारे नव्हते …समाजाबरोबर परिस्थितीबरोबर ती क्षणोक्षणी  कोसळत होती…. पुन्हा स्वतःला सावरत होती… आई-वडिलांचा आधार नाही….. चांगला जोडीदार नाही…. चांगला जोडीदार मिळावा म्हणून लहानपणीपासूनच निर्जळी उपवास ठेवणारी ती….. आज नीतीच्या या न्यायापुढे हतबल झाली होती …उपवास, तापास, पूजा,देवधर्म याच्यावर चा सगळा विश्वासाच उडाला होता तिचा .. फक्त डोळ्यात अश्रू घेवून ती जगत होती.. पश्र्चातापाचे कढत अश्रू तिला क्षणोक्षणी जाळत  होते…जेवढा माणूस प्रामाणिक,जेवढा मेहनती ,जेवढा समजूतदार त्या मानाने तेवढे अधिक दुःख आणि विपरीत परिस्थिती, संघर्ष त्याच्या वाट्याला येतो….एकाकी झुंजू तिच्या वाट्याला आली होती….हे सगळं ती अनुभवत होती…

उभ्या जगात तिच्याशी हक्काचे आपले  म्हणणारे असे कोणीच नव्हते…. पण तरीही लहान बाळाला पुरेशी समज नसल्याने त्याला पोटाशी धरून त्याला घडवण्याचे काम ती करत होती…  त्यांच्या मोठे होण्याची ती आतुरतेने वाट बघत होती…. जेणेकरून ती तिच्या जबाबदारीमधून थोडी निवांत झाली… असती आज हरतालिकेच्या मूर्तीनी त्या निमित्ताने सर्व जीवनपट, भूतकाळ  तिच्यासमोर उभा केला होता……ती असहाय होती .. ना जगू शकत होती. … ना मरू शकत होती ….

  • सुसिमा थोरात.
  • 27/08/2025.
  • @All rights are reserved.
  • @Image source – google.

प्रेम टिल्लू – पिल्लूच…

बोहल्यावर चढण्याआधी वावरत होती स्वप्नांच्या दुनियेत ती,

जिवलग भेटला या भावनेने खूपच आनंदात होती ती.

लग्नाआधी घेतलेल्या आणाभाका फोल सगळ्या ठरल्या होत्या,

टिल्लू – पिल्लूच्या प्रेमाच्या आता खुणा सुद्धा उरल्या नव्हत्या…

आय लव यू लग्नापूर्वी क्षणोक्षणी जप ऐकवत होता,

आता मात्र त्याचा मागमूस सुद्धा उरला नव्हता.

आय लव यु च आय हेट यू मंगलाष्टकांनीच केलं होतं.

टिल्लू – पिल्लूच  प्रेम आता संपून सगळं गेल होत…..

दिले होते वचन त्यांने सुखी तिला ठेवण्याचे,

प्रत्येक सुखदुःखात,पावलोपावली साथ दिला देण्याचे.

आता प्रत्येक क्षणी हृदय तिचे अपमानाने जळत होते,

टिल्लू पिल्लुचे प्रेम त्याचे तीळभर सुद्धा उरले नव्हते….

पिल्लू जेवल का रोज तीनवेळ चौकशी लग्नाआधी व्हायची,

नंतर मात्र बायको झाल्यावर तिला भाकरीच नव्हती द्यायची.

लग्नाआधी अमिषे दाखवून फोन, msgs तासन तास चालू असायचे,

टिल्लू – पिल्लुच्या प्रेमाचे ते खोटे रुपडे खूप गोड वाटायचे….

सुखाच्या क्षणांची वाट बघत आशेवर ती जगत होती,

नीच, बेअक्कल शब्द ऐकून घरे तिच्या काळजाला पडत होती,

राणी सारखी ठेवतो तुला सांगून हात तिचा धरला होता,

टिल्लू पिल्लू च्या प्रेमासाठी आत्मसन्मान तिने विकला होता….

आज तिला कळले होते प्रेम तिच्यासाठी नव्हतेच उरले,

शिव्यांच्या लाखोलिने काळीज मात्र तिचे चिरले.

अपार कष्ट सोसून  लेकरांना मात्र जीवापाड ती जपत होती,

टिल्लू पिल्लूच्या खोट्या प्रेमाने नाव तिच्या आयुष्याची उलटली होती…..

  • सुसिमा थोरात.
  • 17/08/2025

@All rights are reserved.

@Image source – Google.

*स्वतःचा नवा इतिहास घडव…!*

तू स्त्री म्हणून मिळेल दुय्यम वागणूक तुला,

खचून कधीच तू जाऊ नको,

कितीदा वाटेत असतील काटे तुझ्या,

काट्यातून रक्ताळल्या पावलांनी,

तुझी स्वतःची वाट स्वतःच बनव,

स्वतःचा नवा इतिहास घडवं….

क्षणोक्षणी तुझ्या स्वाभिमानावर बलात्कार होईलच,

तुझ्या मनावर,शरीरावर अत्याचार होईलच,

नराधमांनी भरलेले जग सारे हे,

त्याच अत्याचाराला तुझी प्रेरणा बनव,

स्वतःचा नवा इतिहास घडव….

वाट्याला आलेल्या अपमानाच्या धगधगत्या ज्वालेत स्वतः कधीच जळू नको ,

भेटतील तुला आजूबाजूला तुला नाउमेद  करणारे लोक,

त्याच अपमानाला तुझी प्रेरणा बनव,

स्वतःचा नवा इतिहास घडव…..

पुरुषी अहंकाराच्या असंख्य इंगळ्या उठता, बसता तुला नांग्या मारतील,

होतील मरणप्राय वेदना तुला,

त्याच असह्य वेदनांना तुझी ताकद बनव,

स्वतःचा नवा इतिहास घडव…..

सीता,तारा ,मंदोदरी, द्रौपदी,जिजाई, येसू ,झाशी ,सावित्री नाचवले समाजाने रिंगणात यांनाही ,

त्यांच्या कहाण्यांना आदर्श बनव,

स्वतःचा नवा इतिहास घडव…

संकटे कोसळतील तुझ्यावर असंख्य,

ती तुझी परीक्षा पाहण्यासाठी, तुला घडवण्यासाठी, त्यांना घाबरू नको,

संकटावर मात कर,झुगारून बंधने सारी, स्वतःला आत्मनिर्भर बनव,

स्वतःचा नवा इतिहास घडव….

  • सुसिमा थोरात.

    08/03/2025

@All rights are reserved.

*स्वतःचा नवा इतिहास घडव…!*

*नाते अनोखे जोडीदाराचे…*

खरंतर या विषयाची कुठून सुरुवात करावी..? हेच समजत नाही… आजकालच्या या धकाधकीच्या जगात दूरापास्त होत चाललेली गोष्ट म्हणजे प्रेम,जिव्हाळा, आदर …याचबरोबर …एकमेकांसाठी केला जाणारा त्याग, एकमेकांची काळजी, एकमेकांची आठवण आणि त्या सुंदर आठवणींची केलेली साठवण……

जगात माणसं जन्माला येताना हजारो नाती सोबत घेऊन येतात… पण माणसाच्या या सर्व रक्ताच्या नात्यापेक्षा,सर्वात जवळचे आणि परमेश्वराने निर्माण केलेले सर्वात जवळचे सुंदर अनोख, मखमली, रेशमी नातं म्हणजे जोडीदाराच….अर्थात पती आणि पत्नी चे…

प्रत्येक सुखदुःखात पावलोपावली एकमेकांच्या सोबत उभा राहण्यासाठी,आपलीच पाठ आपण थोपटू शकत नाही… दुःखात आपल्याच खांद्यावर आपण डोकं ठेवून आपण रडू शकत नाही…आपले दुःख जगात परक्याना सांगू शकत नाही ..म्हणून…यशात आपली पाठ थोपटन्यासाठी..अपयशात शेजारी  बसून पाठीवर हात फिरवण्यासाठी…..एकमेकांचे दुःख वाटून घेण्यासाठी…एकमेकांच्या जखमावर फुंकर घालण्यासाठी…, पावलोपावली येणारा संघर्ष नव्या उमेदीने झेलण्यासाठी…आनंदाने एकत्र जगण्यासाठी, संसाराचा पसारा आवरण्यासाठी आणि एकमेकांना सावरण्यासाठी…….हातात हात घेवून उभे आयुष्य वादळातही चालण्यासाठी…

न सांगता, न बोलता एकमेकांचे दुःख समजून घेण्यासाठी, एकमेकांना जपण्यासाठी…. परमेश्वरांना तयार केलेले हे सुंदर नातं.. एकमेकांना मनाने हृदयाने जोडले गेले… हे तीळा – तांदळाचं नातं आयुष्यातल्या दोन्ही टप्प्यावर अगदी क्षणाक्षणाला सोबत करते.. अंधारात चालताना काहीच दिसत नसते तेंव्हा दिव्याप्रमाणे प्रकाश दाखवणारे हे नाते असते… बाकी सगळी  नाती आपल्याला परक करू शकतात,करतात…सोडूनही  जातात… पण हे एक नातं आपण जेवढे जास्त जपू तेवढं ते अधिकच बहरत जातं, अधिकच घट्ट होत जात…..जोडीदाराच्या नात्याची वीण तेव्हाच अधिक घट्ट होते, जेव्हा ते प्राण- पणान जपलं जातं…वेळोवेळी एकमेकांना समजून घेऊन विश्वासाने सांभाळला जातं …आपल्या जोडीदाराची भक्कम साथ आपल्याला असेल तर आपण जगात कोणत्याही संघर्षाला तोंड देऊ शकतो….

असे हे अनोख नातं परमेश्वराची निर्मिती आहे…त्याच सौंदर्य आणि पावित्र्य जपणे, त्यास जपून टिकवणे यातच त्या नात्याची सार्थकता आहे…एवढ्या  तेवढ्या छोट्या छोट्या गोष्टींनी त्याला सुरुंग  लागावा…  असे नाते असेल तर ते टिकतच नाही त्यासाठी साधना लागते तपश्चर्या लागते तेवढाच त्याग ही असावा लागतो ….. तिथे दोघांच्याही अनुभवाचा कस लागतो…

जोडीदाराचे नातं हे देवा- ब्राह्मणांचा साक्षीने, पवित्र मंगळसूत्राच्या, पवित्र धाग्याने बांधलेले असते… त्याची सर कोणत्याच नात्याला येत नाही… तरुणपणाचा बहर संपू लागला की, जोडीदाराच्या नात्याची खरी किंमत आणि गरज समजते… काहीही झाले तरी सुखदुःखात आपल्या जोडीदारास सारखा जिवलग, आपल्या वेळेला मदतीला धावून येणारा,आपल्या जवळचा त्याच्यासारखा दुसरा कोणीच व्यक्ती नसतो …..

आजकाल या पती पत्नी च्या नात्यामध्ये तेवढे प्रेम, आपलुकी,आदर,काळजी आपल्याला पहायला मिळत नाही… किरकोळ कारणावरून वेगळे होण्याचे प्रमाणही वाढले …आहे या सर्व गोष्टींमध्ये मुलांची फरपट होते…त्यांची आबाळ होते… एकमेकांच्या वादांमुळे मुलांची आयुष्ये उद्वस्त होतात….त्यांच्यावर संस्कार कोण करणार? त्यांना कोण शिस्त लावणार?? जर आई वडिलांना च शिस्त नसेल…मुलांचे बालपण हे नवरा बायकोच्या वादात कुस्करले जाते… त्यांना मॉरल सपोर्ट मिळतच नाही… त्यामुळे पर्यायाने त्यांच्या आयुष्याची वाताहत होते…या सर्वांचा विचार दोघांनी करायला हवा..एकमेकांना समजून घ्यायला हवे….एकमेकांशी प्रेमाने बोलण्यासाठी, जोडीदाराच्या पाठीवरून मायेने आधाराचा  हात फिरवण्यासाठी कोणतच कमीपणा नाही….पैसे लागत नाहीत…

म्हणून या स्पर्धेच्या धकाधकीच्या जीवनात आपल्या जोडीदाराला जीव लावा,त्याला जपा तरच, आयुष्य सुंदर होईल…. मित्रहो आयुष्याचा सोहळाच करायचा असेल तर जोडीदार चांगला भेटायला हवा… तरच तो आपल्या आयुष्यातील प्रत्येक क्षण सुगंधाने, सुवासाने,आनंदाने आणि सुखाने भरून टाकेल….भरभरून जगवेल आणि जगुही देईल…. त्यामुळे परमेश्वराची देणगी असलेले हे सुंदर,रेशमी नाते माणूस म्हणून प्राण पणाने  जपा……काळीज जपा……

– सुसिमा थोरात.२८/०१/२०२५

२८/०१/२०२५

@All rights are reserved.

*स्वागत नववर्षाचे….*

सरत्या, जुन्या वर्षाला, निरोप आपण देवू,

येत्या नववर्षाला, कवेत आपण घेऊ..

देऊ सोडून रुसवे, फुगवे,

राग,लोभ अन कडू अबोले..

घडले भले बुरे जे काही,

विसरून आपण जाऊ..

येत्या नववर्षाला, कवेत आपण घेऊ..

गोडव्याचे सारे क्षण आठवू,

कुपीत ह्रदयाच्या जपून ठेवू,

घाव काळजावरचे जखमांचे,

बुजवून आपण टाकू,

येत्या नववर्षाला कवेत आपण घेऊ…

धन आरोग्याचे जपून ठेवू,

कुणासवे ना तंटा वाढवू,

मांगल्याचे अन सुखाचे तोरण दारी बांधू,

येत्या नववर्षाला कवेत आपण घेऊ…

नवी स्वप्ने, संकल्प नवे घेऊन,

आले नववर्ष समृद्धी घेवून,

आशीर्वाद बाप्पाचा घेऊन,

सुखात आपण न्हावू ,

येत्या नववर्षाला कवेत आपण घेऊ…

  • सुसिमा थोरात.
  • Image source – Google
  • @All rights are reserved.