*अगतिकता….*

आज मला तिच्या डोळ्यातल्या चमकेने आणि धाडसाने भारावून टाकले होते….मी ऐकत होते, ती सांगत होती, काळा सावळा चेहरा,सरळ नाक, विस्कटलेल्या थोड्या दाट पण मध्यम भुवया….डोळ्यात चमक असणारे तेजस्वी डोळे,तपकिरी छोटीशी टिकली… हलकीशी केशरी रंग असणारी साडी चापून  चोपून नेसली होती…पिन अप केले नव्हते, पण पदराने सर्व अंग झाकून घेतले होते,.. गडद शेवाळी रंगाचा कोपराच्या थोडा वर ब्लाउज…… शेतात मजुरी करून काळवंडलेले हात- पाय… पायात थोडी मोठी जाड जोडवी, हिरव्या कळकट झालेल्या बांगड्या… काखेला चार वर्षाचे पोर सर्दीने बेजार झाले होते….

तिचे बोलणे ऐकून माझे  डोके सुन्न झाले…..ती भरभरून सांगत होती ..” मॅडम पोरगा अभ्यास करत नाही, आजोबाच्या मागे फिरतो… आजोबाने नुसतं लाडवून ठेवले त्याला”.. किती मारलं? तरी ऐकत नाही … नवऱ्याने  लय मारल बघा मला मागच्या आठवड्यात….सासू – सासरे  तमाशा बघत उभे होते… त्यांनी अडवलं सुद्धा नाही नवऱ्याला… रोज दारू पिवून येतीती आणि मारतीती….पोटाला तीन पोरी त्याचा पाठीवर झालेली दोन मुले त्यापैकी एक मोठा माझ्या पहिलीच्या वर्गात पहिली शिकत होता.. दोन वर्षांपूर्वी शिलाई मशीन घेतली, नवऱ्याने घरातून बाहेर काढलं, त्या मशीनच्या जीवावर लय पैसे मिळवलं…. सगळं घर मीच व्यक्ती चालवती…बाजार आणती… हे काहीच पैसे कमवत नाही, किरकोळ कमावतात तेही दारुत उडवतात..”…

असे खेड्यातले चित्र मला फारसे काही नवीन नव्हते… बाईच्या नशिबाची ही हळवी कर्मकहाणी होती… पाच नॉर्मल डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात झाल्यानंतर कसली जपणूक नाही..पहिल्या तीन मुली…..मुलांना जन्म देण्यापासून, सांभाळण्यापासून, पैसे मिळवून, ज्वारी आणून त्यांना भाकरी करून वाढेपर्यंत आणि त्यांचा सर्व अभ्यास .. सर्व गोष्टींची काळजीपूर्वक विचार करून वागणारी, या जगातील एकमेव त्यागमुर्ती म्हणजे आईच असू शकते…

मला तिच खूप कौतुक वाटलं… मी माझीच नाही, तर सर्व स्त्रियांची तुलना तिच्यासोबत केली…. ती म्हणाली,” काम करून मिळालेले, पोरींचे काही पैसे बँकेत ठेवती” मोठी पोरगी नववीत शिकत होती… बचत गटात भरती… घरात ठेवत नाही नाहीतर, ते भांडून, घेऊन दारू पिऊन येतात…”

शिवीगाळ करणारा, मारहाण करणारा, पाच पाच बाळंतपणं अंगावर लादनारा ,व्यसनी नवरा… नातवंडाला चांगले वळण लागून न देता, वंशाचा दिवा म्हणून, लाडाने बिघडवणारे सासू सासरे…. पोटाला पाच लहान मुले,  वंशाला दिवा पाहिजे म्हणून पाच वेळा मरणप्राय यातना,कळा सोसणारी ही माय ..

तिचं गाऱ्हाणं ऐकताना डोळ्याच्या कडा आपोआपच ओल्या झाल्या….. मुलांना जन्म देण्याची एकच जबाबदारी तिच्यावर नव्हती, पैसे कमावून त्यांना ज्वारी आणून भाकरी करण्यापासून ,त्यांच्या आजारपणाची, त्यांचा अभ्यास, त्यांच्यावर चांगले संस्कार करून, त्यांना आधार देणे यासाठी रात्रंदिवस ती झिजत होती….. चार वर्षाच पोर घेऊन मजुरीला जात होती… कपडे शिवत होती… गोधड्या शिवत होती..आलेले पैसे काटकसर करून बँकेत ठेवत होती…

या सर्व गोष्टी पैकी एकाही गोष्टीची काळजी तिच्या नवऱ्याला किंवा तिच्या सासू-सासर्‍यांना नव्हती.. ती सांगू लागली, “आई-वडिलाकडे गरीबीच हाय सगळी मॅडम..!!  तिकडे तर कशी जावू पोरी, पोर घेवून “.. तिचा स्वर भिजलेला होता, तिच्या या अगतिकतेचा, पुरेपूर फायदाच सासरच्या लोकांनी उठवला होता, उठवतच होते… तिच्या शरीरावर होणारे वार आणि मनावर होणारे वार याची मोजदादच करता येत नव्हती… लग्न करून सात जन्माची साथ देतो, सांभाळतो, म्हणून वचन देऊन लग्न करून घरची लक्ष्मी म्हणून घरी आणणाऱ्या नवऱ्याने त्यापैकी कोणतच वचन पूर्ण केलेले नव्हतं… तिची आर्थिक जबाबदारी, मानसिक जबाबदारी, तिची भावनिक जबाबदारी, तिची शारीरिक जबाबदारी,  मुलांच्या जबाबदारी यापैकी कोणत्याच जबाबदारीची त्याला जाणीव नव्हती… त्याचं कोणतच कर्तव्य त्याला माहीत नव्हतं… गळ्यात अडकवलेलं धाग्यातल्या काळ्या मण्याचे मंगळसूत्र त्याच्या नावाखाली  फक्त डोंगराएवढे  ओझे ती वाहत होती…. क्षणाक्षणाला पोरांच्या काळजीत होती… “रातभर ते दारू पिऊन दंगा करतात , पोरींना मी दुसऱ्या घरात झोपायला पाठवते…” या तिच्या वाक्यांने काळजावर अजून एक चर्कन वार झाला…

या मुलांवर संस्कार करण्यासाठी, त्यांच्यासाठी पैसे कमावण्याची कसलीच जबाबदारी तिच्या नवऱ्याची नव्हती का? आज किती घरात अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते….

याची विरुद्ध बाजू म्हणजे, शहर भागात बरीच लोक चांगल्या कंपन्यांमध्ये काम करतात भरपूर पैसे कमावतात,.. स्वतःचे फ्लॅट घेतात त्यांच्यापैकी कित्येक जणांच्या बायका मात्र घरी ऐश आरामात घरी बसून राहतात.. एक रुपया कमावत नाही तरी…. सर्व सुख सुविधा, सोयी त्यांना उपलब्ध असतात…त्याचा उपभोग घेतात.. जेवण सुद्धा करण्याचे कष्ट त्यांना घ्यावेसे वाटत नाही… पार्सल मागवतात  हॉटेलमध्ये जातात… महिन्याला होणारा हजारो रुपयांचा ब्युटी पार्लरचा खर्च, महागडे कपडे, दागिने , हाऊस मौज आराम त्यांच्या वाट्याला येतो..बर्थडे, anniversary… एक रुपयाची कमाई नाही तरी, मुलाला सोडायला आणायला स्कूल बस असते… कारण त्यांचे नवरे व्यवस्थित कमावणारे आणि त्यांच्या बायकोला जपणारे असतात….यापैकी काहीच तिच्या वाट्याला आले नव्हते, हे नसूनही होणारी मारहाण, ही बाळंतपणे, शिवीगाळ यामुळे ती पूर्ण पिचून गेली होती….

पण मग एखादीच्याच वाट्याला असं दुःख, असा त्रास का यावा??? तिची नकळत तुलना मी सर्वांशी करत होते… का देवाने तिच्या वाट्याला असं आयुष्य आणले असेल???काही वेळा हे व्यसन करणारे नवरे, व्यसनांमुळे पटकन मरूनही जातात… लवकर जगाचा निरोप घेतात…आणि सर्व जबाबदाऱ्यांवरून मोकळे होतात, ती विधवा होते तो मेला म्हणून, पण तरीही जबाबदाऱ्यातून मोकळी होत नाही… माय कधीच या चक्रातून जबाबदारीतून मोकळी होऊ शकत नाही… ती मरेपर्यंत झिजत असते कणाकणाने…. आपल्या लेकरांसाठी..

नवरा म्हणून नावाला असलेले एक वलय तिला काय देतं हे आजवर मला कळलं नाही???फक्त समाजात नवरा आहे ही एक ओळख …बाकी.. सर्व खोटी आरास असते…स्त्री तिच्या कर्तृत्वाने सगळं घर उभा करते.. स्वतः साठी ती कधीच  जगत नाही…ती हरत नाही…… स्वतःचा संसार स्वतः चालवते… कुणी मारलं,  कुणी शिवीगाळ केली, कुठल्या नवऱ्याने अपमानित केले, नातेवाईकांनीला लाथाडले….तरी ती जगत असते…

तिला हक्क नसतो का सन्मानाने जगण्याचा??? स्वतःची  हौसमौज  करण्याचा…नवऱ्याकडून कोड कौतुक करून घेण्याचा.. पाठीवर आधाराचा हात ठेवणारा नवरा खूप काही तिला देऊन जाऊ शकतो..तो सर्वांना मिळतोच असे नाही…

पण तिच्या भाळावर बाराही महिने कष्ट आणि त्रास संघर्ष,लिहिला होता, ती झगडत होती… परिस्थितीशी लढत होती.. स्वतःच्या मुलांसाठी, स्वतःच्या लेकरांसाठी समाजाशी लढत होती… तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच होते… आज या जगात भरपूर स्त्रीया असतील ज्या वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळे क्षेत्रांमध्ये काम करत असतील …तरीसुद्धा तिच्या डोळ्यातील वेगळीच चमक, मला जगण्यासाठी अजून मोठी प्रेरणा देऊन गेली…. तिच्या या कर्तुत्वाला सलाम!!!!

आई म्हणून ती कधीच हरली नाही, हरणार नाही….. परिस्थितीने तिला हरवले असले, तरी ती हरली नव्हती… आणि हरणारही नव्हती… ती झुंजत राहणार होती… तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिच्या मुलांसाठी….. कारण सगळ्यांनी जबाबदारी टाळली तरी ती त्या जबाबदाऱ्या टाळू शकत नव्हती… कारण ती माय होती… तिच्या पायात पडलेली ही बेडी समाजाला दिसत नसली.. तरी ती माय या बेडीतून कधीच मोकळी होणार नव्हती… कधीच मोकळी होणार नव्हती…..

  • सुसिमा थोरात.
  • २३/११/२०२४

@All rights are reserved.

@Image source – Google.

*अगतिकता….*

*क्षण निरोपाचा… नव्हे,शुभेच्छांचा….*

आज तो क्षण जवळ आला, ज्याची मी कधीच वाट पाहिली नव्हती, किंवा मला असे वाटते ही नव्हते की कोकणाने मला निरोप द्यावा…..जानेवारी 2024 मध्ये आंतर जिल्हा बदली सांगली येथे झाली.15 ऑगस्ट रोजी मला कार्यमुक्त केले….सोळा ऑगस्टला मी सांगली जिल्हा परिषदला हजर झाले…

चार ऑक्टोबर 2024 रोजी ज्या शाळेत मी माझ्या नोकरीची पाच वर्षे पूर्ण केली, जिथे मला शुभेच्छा देण्यासाठी, शुभेच्छा समारंभ आयोजित केला होता… निरोप समारंभ त्याला मी कधीच म्हणणार नाही.. हा शुभेच्छांचा क्षण मला सतत मागे वळून बघायला सांगत होता पाच वर्षे असताना पाच वर्षे असं नाही जवळ जवळ नऊ ते दहा वर्ष मी कोकणाच्या सहवासात राहिले…. शिक्षणाच्या निमित्ताने….

“कोकणची माणसं साधी भोळी, हृदयात त्यांच्या भरली शहाळी..”

हे वाक्य , तत्व तंतोतंत मला पटले होते… खूप जीव लावणारी प्रेम करणारी.. माणसं मला भेटली. माझ्यासाठी ज्यांच्या डोळ्यात आसवे यावी अशी  खूप कमी माणसं माझ्याजवळ होती… त्यापैकी  ही काही…तीच जास्त होती..

माझ्या सर्व्हिस मधील कुरचुंबं  नंबर १ ही पहिली शाळा होती .माझ्या कूरचुंब नंबर एक शाळेतील प्रवासात पालकांनी गावकऱ्यांनी मला खूप जिव्हाळा दिला… आपुलकीची वागणूक दिली… त्यामुळे मला कधी माझ्या गावी जाण्याची ओढ वाटलीच नाही .. जावेच वाटले नाही ….पण परिस्थितीच्या मनात काही वेगळेच होते, म्हणून की काय… मला माझ्या भागात आणून  ठेवण्याचे परिस्थितीचे प्रयोजन मला काही समजले नाही..

पण कोकण, माझे कुरचूंब गाव ,माझी शाळा मला माझ्या नजरेआड  करावी वाटत नव्हती…. दोन लहान मुले घेऊन मी खूप आनंदाने तिथे राहिले होते…कोकण माझ्या जीवनाचा अविभाज्य भाग झाला होता… रसाळ फणस, आंबे, काजू ,रसाळ शहाळी… त्याचबरोबर अथांग पसरलेला अरबी समुद्र…निळा जलधी.. मला माझा जिवाभावाचा सखा वाटत होता…. त्याचबरोबर प्रेमळ मोठ्या मनाने जीव लावणारी ,पाठीवरून हात फिरणारी माणसं यांचा मला खूप आधार वाटत होता ….

तोंडावरून मायेनं  हात फिरवणारी माणसं मिळायला भाग्य लागतं… ते भाग्य मला कोकणाने मिळवून दिलं होतं. एवढा लळा लोकांनी मला लावला …..शाळेतील विद्यार्थ्यांनी लावला…. एवढ्या लवकर मी या सर्वाला पारखी होईल, असे कधी वाटले नव्हते… कार्यक्रम होईपर्यंत ,शाळेत असेपर्यंत ,माझा म्हणण्याचा हक्क या निरोप समारंभाने माझ्याकडून हिरावून घेतला असे वाटले…

निसर्गरम्य , हिरव्यागार परिसरात असणारी माझी मोठी शाळा…. मला कधीच परकी वाटली नाही…शाळेच्या भिंतींशी, तिथे असणाऱ्या मातीच्या कणाकणाशी, तिथे असणाऱ्या झाडा-माडांशी त्याच्या पानाफुलांशी  माझे एक अनामिक नातं जडलं होतं…… ते नातं मी कधीच विसरू शकत नाही..सोबत सहकारी म्हणून लाभलेले कोल्हापूरचे श्री पाटील सर एक उत्तम मार्गदर्शक ठरले.. त्याचबरोबर गावचे सरपंच मा.प्रसादजी माने sir, शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष विनोदजी माने sir, शिक्षणतज्ञ मिलिंद माने sir, शाळा व्यवस्थापन समितीच्या उपाध्यक्ष संजना गुरव ताई सर्वांनी खूप चांगल्या पद्धतीने सहकार्य केले…आम्हाला नवीन भागात आल्यावर कधीही परकेपणा जाणवू दिला नाही… त्यांनी अतीव विश्वास आमच्यावर दाखवला… याचबरोबर मला पावलोपावली मार्गदर्शन करणारे स्नेही, पदवीधर शिक्षक संघटनेचे अध्यक्ष, माननीय श्री डांगे सर व बहिणी प्रमाणे मला मार्गदर्शन करणाऱ्या , माझी एक छान मैत्रीण असणाऱ्या डांगे मॅडम यांची उणीव मला सतत जाणवत राहील… अडचणीच्या काळात खूप मदत त्यांनी मला केली… ही फक्त काही नावे पण प्रत्यक्ष अप्रत्यक्षरीत्या मदत करणाऱ्यांचे  धन्यवाद न मानता त्यांच्या ऋणात राहणे  मी पसंद करेन…..

कोकणाने मला खूप काही दिले, काही कटू क्षण सोडले ते..मला  पुन्हा कधी वाटले तर तिथेच राहायला आवडेल, त्याच माणसांमध्ये…त्यांच्या चुलीवरचा कोरा चहा मला अमृता समान वाटला… कारण त्यामध्ये खूप माया, प्रेम, आपुलकी आहे….घासातला घास देणारी माणसे मिळायला भाग्य लागतं… जे मला तेवढ्या वर्षापुरतच लाभलं होतं या माणसांच्या , सहवासाचे हे सर्व  क्षण मी कुपीत घालून हृदयात बंद करून ठेवणार आहे… जेणेकरून जेव्हा जेंव्हा मला या सगळ्यांची आठवण येईल तेव्हा ते बंदिस्त क्षण उघडून मला त्याचा सुवास घेता येईल आणि आयुष्य जगण्याची उमेद येईल…ते मी जपून ठेवणार आहे…

तो हिरवा निसर्ग,  पहाटेचे पांढरे शुभ्र धुके, पहाटेचे मोरांचे आवाज पक्षांचा किलबिलाट ,धुक्यातून जाणारी इवलिशी पाऊलवाट.. दवबिंदू ,मैदानावर उमललेली छोटी निळसर फुले, गवताच्या हिरव्या गालिच्यावर उमललेली नाजूकशी पिवळी फुले …अखंड सुवास देणारी अनंताची फुले….झोके घेणारी पाखरे, वाऱ्याबरोबर मजेत डोलणारी ,भाताची हिरवी शेती… सारेच कसे क्षणात दृष्टीआड झाले…. पण  हे सर्व मी मनात साठवले आहे ……साठवलेले  आठवले तरी बरेच वाटेल……

  • सुसिमा थोरात
  • 04/10/2024

*सफर जंगलाची…..*

हिरव्या हिरव्या रानात,

कापूस नाचतो,

पांढराशुभ्र ससुल्या,

टुणटूण उड्या मारतो.

             आकाशात जमले

             ढग काळे वर.

             पिसारा फुलवून,

             थुई  थुई नाचे मोर.

आंब्याच्या झाडावर

कुहुकुहू करते,

काळी कोकिळाताई,

गोड गळ्याने गाते.

           हिरव्या हिरव्या झाडावर

           पेरू फोडून खातो,

           पोपटराव आमचा,

           विठू विठू बोलतो.

सोंड हलवून अभिवादन

हत्ती दादा करे,

जंगलात असती,

त्याचे भलते तोरे.

        वाघोबाची स्वारी,

        डरकाळी फोडी,

        सारे हिरवे जंगल,

        दणाणून सोडी..

माडावर उंच उंच,

सरसर चढते वर,

पट्टेरी खारुताईला ,

आहे खूपच जोर..

      राजा जंगलचा सिंह,

      ऐटीत चालतो,

      गर्जनेने त्याच्या,

      साऱ्यांना घाबरवून सोडतो.

                                – सुसिमा थोरात.

                               23/07/2024

@All rights are reserved.

@Image source – Google.

*Overtake…*

आज रस्त्याला नेहमीसारखीच वर्दळ जास्त नव्हती,तरीही वाहने होतीच ….भरपूर पाऊस पडून गेल्याने, बऱ्याच ठिकाणी पाण्याची तळी साचली होती…. येणारी वाहने वेगात येत होती, जाणारी  काही वाहने वेगाने पुढे निघून जात होती… मी मात्र गाडी नेहमीच्या मीडियम स्पीड वर ठेवली होती..35- 40 स्पीड मध्ये मला एक रिलॅक्सपणा वाटत होता..मला घाई नव्हती कारण, रोज पाच- दहा मिनिटे लवकर निघायची सवय असल्याने,ती सवय मला गाडी चालवताना रिलॅक्स राहायला शिकवून गेली..

काही वेळा मागचे वाहन ओव्हरटेक करून जोरात पुढे जायचे.. काही वेळा एखादे वाहन राईट इंडिकेटर दाखऊन लेफ्टला अचानक वळायचे…. काही जण लेफ्ट इंडिकेटर देऊन लेफ्टला वळायच्या अगोदर राईटला जायचे…हा रोजचा अनुभव …या गोष्टीचे आश्चर्यही वाटायचे..तर काही वेळा घाई- घाईत काही लोक इंडिकेटर न देताच पटकन वळायचे….तर काही वेळा शेजारून येणारी एखादी गाडी खड्ड्यातून झपकन मातीचे लाल पाणी अंगावर उडवून जायची…. खड्डे आली की गाडीचा स्पीड पाच- दहा वर ठेवायला बरं वाटायचं.. खड्ड्यातून हळुवार जाताना कोणताही त्रास व्हायचा नाही..

आयुष्यात एखादी वेळ सोडता, फार वेळा काही गाडीवरून पडण्याचा प्रसंग आला नाही…. प्रत्यक्ष आयुष्य जगताना मात्र काही वेळा चूक नसताना, तर काही वेळा छोटी चूक झाली तरी खूप वेळा पडावं लागलं….माणसेही तशी भेटली, वाहने भेटतात अगदी तशी… काही वेळा राईट इंडिकेटर दाखवून लेफ्ट जाणारी… तर काही कारण नसताना अंगावर चिखल फेक करणारी….. नियतीने माझी कुठलीच चूक कधीच पदरात घेतली नव्हती..प्रत्येक चुकीची पुरेपूर शिक्षा मला दर वेळेस मिळत गेली.. even आताही ती मिळतच होती.. या सगळ्या ठेचा खाल्ल्यानंतर आता मला पुन्हा बिलकुल पडायचं नव्हतं….

आयुष्यात पडण दूरच, गाडी सुद्धा खूप काळजीपूर्वक मी चालवत होते.सावकाश ,विचारपूर्वक प्रत्येक पाऊल मी जपून टाकत होते. डोक्यावर हेल्मेट…. पावसासाठी रेनकोट… तशीच गाडीही चालवत होते…आता मला कसलीच घाई नव्हती ….कोणाच्या पुढेही जायचं नव्हतं.. कोणाला ओव्हरटेक करायचा नव्हतं …. अशा पद्धतीने राईट इंडिकेटर दाखवून लेफ्टला ही वळायचं नव्हतं, जेणेकरून मागची व्यक्ती फसेल..मागच्या आरशात जास्त वेळ पाहण  योग्य ठरणार नव्हत.. भूतकाळ फक्त एक मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवाचं गाठोड होत. … एकदम सावकाश ,जाणीवपूर्वक खड्डे पाहून, प्रसंगी दुसरी गाडी जाईपर्यंत,थोडं थांबून, मला फक्त सुरक्षित ध्येयापर्यंत पोहोचायचं होतं….आयुष्य सुरक्षित जगायचं होतं…

घाई-गडबडीत काही चुकीचे निर्णय घेऊन, ते निस्तरण्याची ताकद आता माझ्यातही नव्हती.. आता मला प्रत्येक पाऊल सावधपणे टाकायचे होते…कोणाच्या पुढे जाण्याने किंवा कोणाच्या ओव्हरटेक करण्याने  मला काहीच फरक पडणार नव्हता.कोणाच्या पुढे जाण्याचे आणि कोणाच्या मागे राहण्यानचे मला कसलेच दुःख होणार नव्हते….आयुष्याचे ही तसेच काहीसे कोणी प्रगती करून पुढे गेले म्हणून ईर्षा वाटत नव्हती… आणि कोणी माझ्या मागे राहिले म्हणून त्या मागे राहण्याचा  असुरी आनंदही मला नव्हता….

मला आता फक्त माझे आयुष्य जगायचे होते ….शांतपणे…. निवांतपणे….कोणताही अपघात न होता अगदी शांत असलेला पाण्याचा प्रवाह छोटासा दगड टाकल्याने त्यावर जसे हळुवार तरंग उमटतात ना अगदी तसे… भरभरून जगायचे होते.. मोकळा श्वास घ्यायचा होता… तो रिलॅक्स ,निवांत ,मोकळा श्वास मला जगण्याचा आनंद मिळवून देईल, याची मला खात्री होती… कोणासाठी मला पॅनिक व्हायचे नव्हते..आणि कोणी आपल्यासाठी पॅनिक झाले तरी मला त्याचे सोयरे- सुतक नव्हते… आयुष्याने मला दिलेल्या खूप सगळ्या धड्यानंतर  मला मिळालेला हा खूप मोठा lesson  होता…आता मला या आयुष्याच्या प्रवासात आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घ्यायचा होता…

आपण आपला मार्ग सुरक्षितपणे, सावकाशपणे, विचारपूर्वक, सारासार विचार करून, मार्गक्रमण केल्यास आयुष्यात बरेच अपघात टाळता येतील…. इतरांशी तुलना करून , चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करून घाईत जाऊन,अपघात होण्यापेक्षा आपण आपल्या स्पीड मधे गेलो तर जास्त सुरक्षित ध्येयापर्यंत निश्चितच पोहोचू यात तीळ मात्र शंका नाही …

– सुसिमा थोरात.

19/07/2024

@All rights reserved.

@Image source – Google.

*जसं दिसत तसं नसत….*

उन्हाळ्याच्या दिवसात सायंकाळी सर्व मुले,गृहिणी,वयस्कर महिला सर्वचजणी सोसायटीच्या मैदानावर फिरायला बाहेर पडायच्या… मुले सायंकाळच्या मोकळ्या, छान वातावरणात खेळायला बाहेर पडायची..उन्ह कलंडलेली असायची तर थंड, मंद वारा वाहत राहायचा…त्या तिन्हीसांजेला मुले छान खेळायची… पावसाळ्यात त्यांना खेळायला मिळत नव्हते.वर्षभर परीक्षा,अभ्यास यातून ती मोकळी झाली होती.. मैदानावरती छान हुंदडत होती…सायकल फिरवत होती… लपाछपी, लगोरी,क्रिकेट असे अनेक खेळ उत्साहात रंगायचे…

महिला मंडळात मात्र evening walk ऐवजी एकमेकींबद्दलच्या चर्चेला, गॉसिपिंग ला जास्त उधाण यायचे …सायंकाळी गप्पा जास्त रंगायच्या….”ती दीक्षित बाई बघा, सकाळी- सकाळी काम धाम सोडून फिरायला जाते…रिकामीच असते ना!” आम्हाला काही कामातून जमतच नाही,morning walk वगैरे……” त्या राणे काकू बघा, घरातून बाहेर नाही.. सून मस्त नोकरीला जाते.. शर्ट- पॅन्ट घालून… या मात्र घराबाहेर नाही, कधी महिला मंडळाच्या कार्यक्रमाला नाही,..की कुठे फिरायला जमणार नाही…..” ती रमा बघा, सतत तोंडावर बारा वाजलेले, सगळं आहे नाहीतर कधी आनंदी नाही..” त्या जोशी बाई बघा, झेपत नाही तरी मुलीची मुले सांभाळत राहिल्या.. मुलगी सांभाळेल ना तिच्या तिच्या मुलांना.. !!” तुझे दागिने कसे.. माझे कसे… कपडे, दिसण… make up…अशा एक ना अनेक गप्पा- गोष्टी रंगायच्या…

थोड्या दिवसांनी काही गोष्टी माझ्या लक्षात आल्या…दीक्षित बाईंना शुगर,गुडघेदुखी, बीपीचा त्रास होता… दीक्षित बाईंना डॉक्टरांनी रोज सकाळी compulsary एक तास व्यायाम करायला सांगितलं होतं.तब्येत चांगली राहावी म्हणून, त्या सकाळी घाईगडबडीत काम उरकून व्यायाम करायला जायच्या…. राणे काकूंची सून मल्टिनॅशनल कंपनीत नोकरी करत होती…सकाळी आठपासून रात्री दहा वाजेपर्यंत तिची ऑफिसची वेळ होती.. राणे काकुंवर एका नातीची जबाबदारी होती…एक वर्षाची नात सोडून राणे काकूंना महिला मंडळाच्या कार्यक्रमात, महिला मंडळात रमणे शक्य नव्हते….एक वर्षाच्या नातीची त्या पूर्ण जबाबदारी घेऊन सांभाळत होत्या…त्यांना जाणीव होती की आपली सून नोकरी करते तर नातवंडाला सांभाळणे हे आपले प्रथम कर्तव्य आहे… तसच काहीस रमाच्या बाबतीत…रमाला दोन मुले होती.एक पाच वर्षाचा आणि एक एक वर्षाचा… रमाचे पती ship इंजिनियर होते…ते सहा महिने शिपवर असायचे… दोन्ही मुलांची जबाबदारी रमावर पडत होती.. घरात सर्व उरकून, मुलांना सांभाळणे तिला खूप जड जात होते.. रात्रभर मुलांमुळे जागरण व्हायची …ती बिचारी थकून जायची मग एकाकी वाटायचे….” जोशी काकूंची मुलगी नोकरी करत होती …. दोन वर्षापूर्वी तिचे पती अपघातात वारले .. तिच्यावर एका मुलाची जबाबदारी होती, त्यासाठी तिला नोकरी करणे भाग होते… अशा परिस्थितीत जोशी काकू मुलीच्या दीड वर्षाच्या मुलाला सांभाळत होत्या …

अशा अनेक बाजू जवळून पाहिल्यावर आपल्या लक्षात येतात… “दुरून डोंगर साजरे…”ही म्हण आपल्याला माहीतच आहे… पण जवळ गेल्यावर त्या डोंगरावर असणारे खाच- खड्डे दिसतात…. बदक छान पाण्यावर आरामात तरंगते,किती मजेत तरंगते असे आपल्याला वाटते…. पण पाण्यावर तरंगताना त्याच्या पायांची न थांबता होणारी हालचाल(endless efforts, struggle )फक्त त्यालाच माहित असते… कित्येकदा आपल्याला दुसऱ्याकडे पहिले की वाटते, किती सुखी आहेत ह्या ..किंवा खऱ्या परिस्थितीची कल्पना आपल्याला दुरून येत नाही.. आपल्याला दुरून त्या गोष्टी खूप छान वाटतात, मात्र प्रत्यक्षात असे काहीच नसते… असाच काहीसा प्रकार लग्न ठरवताना होतो.. गाडी ,बंगला, शेती, नोकरी सगळ व्यवस्थित बघून मुलीचे लग्न ठरवले जाते… सर्व आहे, पण ज्यावेळी लग्न होते,तेव्हा थोडेच महिने उलटतात.. तेव्हा बऱ्याच नको त्या गोष्टी समजतात.मुलीला आयुष्यभर झुरत दिवस काढावे लागतात…दिसताना दिसते एक, मात्र प्रत्यक्षात परिस्थिती वेगळी असते… म्हणून म्हटलं जातं,” जसं दिसत तसं नसत ,म्हणूनच जग फसत…”

आपल्या ज्या गोष्टी दिसत नाहीत त्या बघण्याचा आपण प्रयत्न केला पाहिजे…. आपल्याला नाण्याची जी बाजू दिसत नाही ती बघण्याचा प्रयत्न केला पाहिजे… आपल्याला प्रत्येकाच्या नाण्याची एकच बाजू दिसते,दुसरी बाजू बघण्याचा आपण प्रयत्न केला तर आपल्याला समजेल , की प्रत्येकाचे सुख-दुःख वेगवेगळे असते.. सुखी आहे, समाधानी आहे असे वाटत असले, तरी प्रत्यक्षात तसे असतेच असे नाही.त्यामुळे नाण्याची दुसरी बाजू आवर्जून पहा आणि मग गॉसिपिंग करा…. एखादी व्यक्ती आपल्याला वरून आनंदी दिसते म्हटल्यावर ती खरच आनंदी असेलच असे नाही…म्हणून जाणून न घेता, गॉसिपिंग न केलेलेच उत्तम…आणि खरेच आहे की जसं दिसत तसं नसतंच मुळी…

– सुसिमा थोरात.

23/04/2024

@All rights reserved.

@Image source – Google.

*Appreciation…. अर्थात गुणग्राहकता….*

मार्च महिना संपला आणि एप्रिल महिन्याचा सुरुवातीला, शालेय जीवनातील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांच्या बऱ्याच स्पर्धा परीक्षांचे निकाल लागले… त्यामध्ये नवोदय, मंथन, बीडीएस, एमटीएस,आयटीएस,TSE, BTS अशा इयत्ता पहिली पासून अगदी दहावीपर्यंत परीक्षांचे निकाल लागले….मुलांचा स्पर्धा परीक्षेचा अभ्यास व्हावा,या दृष्टिकोनातून विद्यार्थ्यांना प्रोत्साहन मिळावे, त्यांच्या बुद्धीचा विकास व्हावा, आणि अभ्यासाची आवड निर्माण व्हावी,या हेतूने या परीक्षा घेतल्या जातात… या परीक्षांचे निकाल शाळेच्या वर्गाच्या व्हाट्सअप ग्रुप वर, फेसबुक वर सगळीकडे झळकू लागले….

कोणाला यशाचा आनंद…तर कोणाला थोडे अपयशही आले. आपण कुठे आहोत हे या परीक्षांच्या माध्यमातून समजते.. ज्या मुलांचे राज्यात,जिल्ह्यात, तालुक्यात, केंद्रात नंबर आले त्यांची गुणपत्रके, त्यांच्या निकालाची यादी ग्रुप वर पाठवण्यात आली.. पण ग्रुप वर पाठवल्यानंतर, खूप कमी लोकांनी या यशस्वी व गुणवंत विद्यार्थ्यांचे व शिक्षकांचे अभिनंदन केले ….अगदी एक, दोन जणांनीच अभिनंदन केले, तर काहींनी फक्त बघ्याची भूमिका घेतली…

आपल्या पाल्याचा नंबर जरी नाही आला,तरी ज्यांचा नंबर आला, ज्यांना यश मिळाले, त्यां विद्यार्थ्यांसाठी , त्या शिक्षकांसाठी आपण एक कौतुकाची थाप नक्कीच देऊ शकतो.. अर्थात द्यायला हवी… त्यासाठी काही आपल्याला पैसे मोजावे लागत नाहीत.. पण त्यासाठी आपल्याजवळ हवे ते निर्मळ मोठे मन…ती गुणग्राहक वृत्ती..आपल्याजवळ हवे ते appreciation ….म्हणजेच दुसऱ्यांचे कौतुक करण्याची, गुणग्रहण करण्याची वृत्ती….आपली ही कौतुकाची थाप त्या विद्यार्थ्यांनी घेतलेल्या मेहनतीची, यशाची पोचपावती असते… विद्यार्थ्यांना, शिक्षकांना पुन्हा एक नवीन भरारी घेण्यासाठी ती बळ देते… त्यासाठी काही पैसे लागत नाहीत…लागते ती फक्त जाणीव…. कष्टाची, मेहनतीची…..ज्यांना विद्यार्थ्यांच्या यशाचे खरे मोल समजले ते त्यांना कौतुकाची थाप पाठीवर नक्कीच देतील…

ज्या विद्यार्थ्यांचे नंबर आले, त्यांना यश मिळाले, तर ते यश म्हणजे एक सहज साध्य होणारी गोष्ट नसून ती एक साधना असते, तपश्चर्या असते, खूप मोठी….जी सहज शक्य होत नाही.. आपण या विद्यार्थ्यांना कौतुकाचे थाप देणे म्हणजे, त्या विद्यार्थ्यांच्या साधनेचा आदर केला जाईल… त्यांच्या कष्टाचा, मेहनतीचा आदर करणे हे आपले सामाजिक बांधिलकी म्हणून कर्तव्य आहे…

त्यासाठी आपल्या आजूबाजूला असणाऱ्या ,शेजारी राहणाऱ्या, आपल्या पाल्याच्या वर्गात असणाऱ्या विद्यार्थ्यांना, त्यांनी कधी एखाद्या परीक्षेत यश मिळवले, काही विद्यार्थी विविध क्रीडा प्रकारात यश मिळवतात ,तर त्या विद्यार्थ्यांना, शिक्षकांना कौतुकाची थाप द्यायला कधीच, कमीपणा मानू नका…. त्यांना कौतुकाची थाप द्यायला विसरू नका… हाच त्यांच्या कष्टाचा साधनेचा आदर होईल.. आणि खऱ्या अर्थाने त्यांचा गुणांचे गुणग्रहण होईल….

सगळ्याच बाबतीत हे सर्व अर्थाने खरे आहे…. आपला जोडीदार, आपला जवळचा एखादा यश मिळवत असेल,तर त्याला नक्की प्रोत्साहन द्या… त्यामुळे त्याला आनंद मिळेल…. उत्साह वाढेल.. आणि ती व्यक्ती याहीपेक्षा मोठ यश मिळवू शकेल…..हीच कौतुकाची थाप, कृतज्ञता माणसामध्ये पुन्हा नव्याने जगण्याचे बळ निर्माण करते…यात तिळमात्र शंका नाही…हेच असते खरे appriciation… अर्थात गुणग्राहकता… कौतुक चांगल्या गुणांचे…. त्यासाठी गरज असते ती पाठीवर कौतुकाची थाप देऊन लढ म्हणून सांगणाऱ्या आपल्या हक्काच्या माणसांची…..आणि खऱ्या अर्थाने सामाजिक बांधिलकी जपणाऱ्या लोकांची… हीच कौतुकाची थाप आपल्या विद्यार्थीरुपी, पाल्यरुपी रोपट्याचे सिंचन होईल…. ज्यामुळे ती रोपटी अधिक तरारून आणि जोमाने वाढतील…ज्यामुळे आपल्या समाजास थंड सावली, मधुर फळे, सुगंधी फुले मिळतील…..म्हणूनच” पाठीवरती हात ठेऊन नुसते लढ म्हणा”..ही कुसुमाग्रजांची उक्ती किती अर्थपूर्ण आणि सार्थ आहे याची प्रचिती आल्यावाचून राहत नाही ….

– सुसिमा थोरात.

21/04/2024

@All rights reserved.

.

*नवी पालवी आशेची….*

चैत्र महिना सुरू झाला,फाल्गुन महिना संपला, मराठी नववर्षाची सुरुवात…ही सर्वांनाच हवीहवीशी वाटते.

आज मराठी नववर्षाचा पहिला दिवस. आभाळात मळभ दाटले होते… सकाळच्या प्रहरी सर्व परिसर मऊ धुक्याची दुलई लेऊन स्तब्धपणे उभा होता… सकाळच्या या वातावरणात मॉर्निंग वॉकला जायची मजा काही वेगळीच असते… मला मॉर्निंग वॉकची प्रचंड आवड आहे… सकाळच्या या वेळी सारी झाडे शांतपणे उभी होती.. गेली कित्येक दिवस, मी त्या झाडांचे निरीक्षण करत होते…. पोपटी, चॉकलेटी ,हिरवी कोवळी पालवी त्यांना फुटली होती.. कडेकपारीत सर्वच झाडांना , झुडुपाना नवीन पालवी फुटली होती…कोकिळा आर्त स्वरात साद घालत होती…..वाऱ्याची मंद,थंड झुळूक त्या झाडांना हळूच गुदगुल्या करत होती.. तो सकाळचा मंद ,थंड वारा मलाही धुंद करून टाकत होता…अलगद डोळे बंद करून मी तो अनुभव घेत होते…आणि पुन्हा पुन्हा त्या झुळुकेची वाट पाहत होते…. झाडेही हाच अनुभव घेत होती.. ती खुश होती ….गालातल्या गालात हसत होती…. ग्रीष्माची दाहकता संपली होती….. उन्हाळा ऋतू असूनही सकाळच्या वेळी वातावरण थंड होते… वसंत ऋतुच्या आगमनाने सारी सृष्टी पुलकित झाली .. वसंताची नवी नवलाई लेऊन नटली…नवीन वर्षाच्या सुरुवातीला नव्या नवलाईने नटलेली झाडे स्वतःशीच गालातल्या गालात हसत होती,नववधू प्रमाणे स्वतःशीच लाजत होती…

याच हसणाऱ्या झाडांनी ही पालवी फुटण्यापूर्वी निष्पर्ण पणे उन्हात उभे राहून एक संघर्ष अनुभवला होता..त्यानंतर त्यांनाही सुख अनुभवायला मिळाले होते.प्रत्येकाच्या आयुष्यात हा संघर्ष असतो ….त्यानंतर नवी पालवी फुटते… फक्त त्यासाठी थोडी वाट बघावी लागते.. थोडा संयम ठेवावा लागतो.. थोडा संघर्ष करावा लागतो …हाच संघर्ष , हाच वेटींग पिरियड आपल्याला यशाच्या एका उंच शिखरावर घेऊन जातो एक नवीन आशेची पालवी आयुष्यात निर्माण करतो…

– सुसिमा थोरात.

09/04/2024

@All rights are reserved.

*कवितेतून जगावे…*

(जागतिक कविता दिनानिमित्त..)

कातरवेळी ,नदीकिनारी, सूर्यास्तास पहावे,

विरहाचे क्षण मनातले सारे, तरंगासोबत विरून जावे.

आठवणी काळजातल्या साऱ्या, आठवून निःशब्द व्हावे,

सारे काहूर मनातले , कवितेने कवेत घ्यावे.

दुःख सारे उरातले, अश्रुंतून ओघळावे,

येणार नसेलच मांडता शल्य,क्षण मुक्याने ते जगावे,

वेदना त्या उरातल्या विसरून, सुखास कवटाळावे,

रंग सुखदुःखाचे सारे, मी कवितेतून उधळावे.

उन्हातल्या तप्त झळांत, कुंदाचे मोहरणे पहावे,

झाड असे निष्पर्ण जरी, पळसाचे बहरणे पहावे,

धुंद करून सृष्टीला साऱ्या, प्राजक्ताने गाली हसावे,

सगळे रुसवे , फुगवे निसर्गाचे, मी कवितेला सांगावे.

तूडविणाऱ्या पावलांना, फुलांप्रमाणे सुगंधित करावे,

कठोर वाणी, हृदयाला त्या प्रेमाचे कोंदण द्यावे,

आयुष्यातील तप्त उन्हाळ्यास, कधी न विस्मरावे,

असो नसो कुणीही जिवलग सखा, आपण कवितेतून जगावे..

काळोख्या पाऊल वाटेवर, दीप ज्ञानाचे उजळावे,

शब्द असती सखे आपुले, कलमेला धरून राहावे,

नसे आठवण कुणा, आपली परमात्म्यास स्मरावे,

उरला नाही देह जिवंत, तरी कवितेतून उरावे…

– सुसिमा थोरात.

21/03/2024

@All rights are reserved.

@Image source – Google.

*कवितेतून जगावे…*

*मायबोली मराठी अमुची…*

गोडवा अमृताचा लेऊन नटली मराठी,

वळणाला वळवावी, तशी वळते मराठी.

घराघरात आपूल्या नांदते मराठी,

कणाकणास महाराष्ट्राच्या साद देते मराठी.

अस्मिता मनामनाची जपून ठेवते मराठी,

कडेकपारीत सह्याद्रीच्या घुमते मराठी.

गौरविण्या मराठीला जमतो आम्ही मराठी,

जाणं ठेऊन मराठीची स्मरतो मराठी.

रसिक प्रेक्षकांची मने जिंकते मराठी,

आत्मसन्मान महाराष्ट्राचा जपते मराठी.

शिरपेचात मानाचा तुरा माय मराठी,

तमाम मराठी जनतेची जननी माय मराठी.

रुधिरातूनी आमच्या वाहते मराठी,

नसानसात आमच्या जागते मराठी.

मोत्त्याक्षरे लेऊन संगे सजली मराठी,

हृदयावर मराठमोळ्या राज्य करते मराठी…

– सुसिमा थोरात.

27/02/2024

@All rights are reserved.

@Image source – Google.

*वाढदिवस…*

प्रिय विवान बाळा,

वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!!!

27 ऑक्टोबर 2016 वसुबारस दिवशी तुझा जन्म झाला. तुझं नव आयुष्य या जगात सुरू झाले… तु मुल म्हणून जन्मलास आणि मी आई म्हणून… तुझ्या जगात येण्याने लाखमोलाच मातृत्व देवानं मला बहाल केलं, मिळालं …तुझ्या रूपान एक सुंदर कळी माझ्या आयुष्यात आली.. तिला अलगद उमलायला मला मदत करायची आहे ….तीच हसणं अबाधित ठेवायच आहे…. नेहमी हसत रहा.. आनंदी राहा… माझ्या मातृत्वाचा मला अभिमान आहे ..तो फक्त तुझ्यामुळेच!! तुझा जन्म झाला आणि अचानक एका अल्लड मुलीचे रूपांतर एका जबाबदार आईमध्ये झाले… आई म्हणजे काय ??? हे तुझ्यामुळेच मला अनुभवायला मिळाले… तुझ्या बालपणातच मी क्षणाक्षणाला माझं बालपण जगले. तुझ्यातच हरवून गेले.. माझ आयुष्य पूर्णतः बदलून गेलं.. तुला एक – एक अक्षर बोलायला शिकवण्यापासून ते रामरक्षा शिकवेपर्यंतचा प्रवास खूपच गोड अविस्मरणीय आणि रमणीय होता… इथून पुढेही तो छानच असेल…! कधी शिस्त लागण्यासाठी कठोरपणाने वागणारी ही तुझी आई तुझ्यावर तितकच प्रेम करते ….तुझी तितकीच काळजी करते, तुला तितकंच जपते, तुझ्यात श्यामला पाहते.. हेही तितकेच खरे!!

वाढदिवसाच्या तुला खूप खूप शुभेच्छा!!! तुला निरोगी दीर्घायुष्य लाभो! तुझी सगळी स्वप्न पूर्ण होवोत …तू खूप यशस्वी हो !!.तुझं यश पाहण्याचा भाग्य मला आई म्हणून लाभाव हीच आई तुळजाभवानी चरणी प्रार्थना!! यशाची सगळी शिखरे तू पादाक्रांत करावीस…. सुख ,समाधान, आणि ऐश्वर्यात रहा…छान तर तू आहेसच.. छान अभ्यास कर….मोठा हो.

-,तुझीच आई,

सुसिमा थोरात.

27/10/2023.