दुपारची वेळ होती, सकाळपासूनच खूप ऊन होते.उष्णता वाढली होती. खूप गरम होत होतं. अंगातून घामाचा धारा वाहत होत्या. तीनच्या दरम्यान गच्च आभाळ भरून आलं. दिवस पावसाळ्याचे नव्हते, पण परतीच्या पावसाचे होते. अचानक हवेत गारवा वाटू लागला…पाऊस येणार, असं समजताच नीताने फॅक्टरी च्या मालकाची परवानगी घेतली आणि ती बाहेर पडली.खूप वापरून जिर्ण झालेलं तिचं पातळ कमरेत खोचून तीन शाळेची वाट धरली. मुलांची शाळा अर्धा तासाच्या अंतरावर होती. ती लवकर बाहेर पडली होती, तरी तिला अर्ध्यातच पावसाने गाठले.
सोसाट्याचा वारा आणि पावसाचा धारांत ती न्हाऊन निघत होती.अचानक आलेल्या पावसामुळे, जवळ छत्री नव्हतीच… भरभर धावतच तिने शाळा गाठली. दोन्ही मुलांना घेऊन तिने घराची वाट धरली. मुले भिजणारच होती पण तिच्या मनाच्या समाधानासाठी तिने आपल्या साडीचा ओला पदर त्यांच्या डोक्यावर धरला. विजांचा कडकडाट होत होता. पाच वर्षांपूर्वी तिचा जोडीदार एका दुर्धर आजाराने तिला सोडून गेला.त्याला वाचवण्यासाठी खूप नवससायास केले, पण तो वाचू शकला नव्हता.
दोन्ही मुलांची जबाबदारी तिच्यावरच येऊन पडली होती. त्यांच्या पोटापाण्यासाठी, शिक्षणासाठी ती वणवण भटकत होती. घाम गाळून कष्टाचा दाम मिळवत होती.पावसाचा जोर वाढत होता. सोसाट्याचा वारा पिंगा घालत होता. ती वाट तुडवत एकेक पावलाने घर जवळ करत होती…. अचानक कुठेतरी जवळच वीज पडल्याने मोठा कडकडाट झाला. दोन्ही लेकरे घाबरून पटकन घट्ट तिला बिलगली….. क्षणभर काळजातच धस्स झाले…. तिने दोन्ही मुलांना घट्ट जवळ घेतले.. डोळे क्षणभर मिटून घेतले आणि ती थांबली..
काही क्षणांच्या अवधी नंतर एक दीर्घ श्वास घेऊन, पुन्हा ती आपली वाट चालू लागली.अंगावरून पडणाऱ्या पावसाच्या धारात ती नखशिखांत ओली झाली होती.. पावसाच्या या रौद्र रूपाला, विजेच्या कडकडाटला क्षणभर तीही घाबरली होती. तिलाही भीती वाटत होती…. पण ती कोणालाही बिलगणार होती ???? कोसळणाऱ्या आभाळाचाच तिला आधार होता … तिलाच मुलांचा आधार व्हायचे होते..न कळत या कल्पनेने तिच्या डोळ्यातून अश्रूंच्या धारावाहू लागल्या….. अश्रूमुळे समोरची वाट अजूनच धूसर होत होती.. तरी ती चालत होती …
घरी आली. तिच्या घरी तिच्या दोन मुलाव्यतिरिक्त तिचे सासरे होते. पंच्याहत्तरीचा म्हातारा देह मुटकुळ करून एका बाजूला खाटवर निपचित पडून होता…तरी त्यांनी हाक मारून विचारले.. नीता पोरं आली का???तिने मानेनेच हो उत्तर दिले…घरी आल्यावर कोरड्या सुती साडीच्या धडप्याने तिने मुलांना पुसून घेतले.. कोरडे कपडे घातले..गेली कित्येक वर्षे फक्त तिने त्या सासऱ्याच्या थकलेल्या देहाला जपण्याचे काम तिने केले होते.. म्हातारा देह असला तरी तिला या म्हाताऱ्याचा डोंगरावर आधार होता… दोन लहान मुलांना ती सांभाळत होती,जपत होती, पण तिला सांभाळणारे,जपणारे असे कोणीच नव्हते… हा एक साधस पातळ नेसून तिने चुल पेटवायला लाकड घेतली.. चूल पेटवली… एका जर्मनच्या तपेल्यात कोऱ्या चहाचे आधण ठेवले.. परसातील गवती चहाची दोन पाने त्या आधनात टाकली..चिमटभर पावडर व गुळाचा खडा तेवढ्यावर चार कप चहा उकळला… दोन्ही मुलांना एक बटरचा तुकडा व कोरा चहा दिला…
त्याच गरम चूलीवर थोड्या वेळात तिने स्वयंपाक करायला घेतला. फडताळात एक खोबऱ्याचा तुकडा होता..तेवढाच टाकून गरम चुलीवर तिने वरणफळ शिजवून घेतले… दोन्ही मुलांनी आवडीने खाल्ले.. त्यांच्यासोबत तिने कसेबसे चार घास पोटात ढकलले आणि दोन भांडी घासून नितळायला भिंतीला उभी करून ठेवली.. आणि ओसरीवर झोपलेल्या म्हाताऱ्याच्या अंगावर पांघरून घालून ,दरवाजा लोटून दोन्ही मुलांना जवळ घेऊन बसली.
दोन्ही मुलांना दोन्ही बाजूला मांडीवर घेऊन ती त्यांच्या डोक्यावर हळुवार हात फिरू लागली… तेवढ्यात मोठ्या मुलांनी प्रश्न विचारला आई बाबा केव्हा येणार ग???तिच्या डोळ्यात टचकन आलेलं पाणी थांबवत ती म्हणाली ,बाळा बाबा दूरदेशी गेले,खूप लांब खूप तुम्हाला खाऊ आणण्यासाठी… लवकरच येतील बर… शाळेत जाणाऱ्या त्या लहान मुलांची खोटी खोटी समजूत ती काढत होती…शाळेत इतर मुले त्यांना बाप नाही म्हणून चिडवत होती… विधवा म्हणून समाजाने दिलेली वागणूक ….. तिला सारे समजत होते, पण नियतीच्या या खेळात तीही हरली होती …देवाने तिच्यावर व तिच्या दोन मुलांवर दुर्दैव आणले होते.. दोन मुले पदरात घेऊन ती दुसरा संसार थाटण्याचा विचार ती कल्पनेत सुद्धा करू शकत नव्हती…
आपल्या जोडीदाराच्या आठवणीत ती क्षणाक्षणाला झुरत होती… दोन्ही मुलांना तिने अंगाई गाऊन झोपले.. तिच्या डोळ्यातून अश्रू थांबत नव्हते.. त्यांना तिने मोकळीक दिली..त्याच्या आठवणीत ती मनसोक्त रडली.. पहिल्या अश्रूंचा गरम थेंब तिच्या मुलाच्या चेहऱ्यावर पडताच, त्याने हळूच डोळे उघडले पण झोपेच्या अवस्थेत पटकन बंद करून घेतले ..ती रडत होती केंव्हा बारा वाजून गेले समजलेच नाही..दोन्ही मुलांना दोन्ही बाजूला व्यवस्थित झोपवून तिने तोंडावर चादर ओढून घेऊन झोपण्याचा प्रयत्न करू लागली…झोप येतच नव्हती.. डोळे मिटून ती पडून राहिली .. स्वतःला ती सांगायची सगळ ठीक होईल…मात्र स्वतःजवळ जोडीदारच नसल्याने जी पोकळी निर्माण झाली होती,ती कधीच भरून येणार नव्हती… मुलांना बापाचं प्रेम मिळणार नव्हत…. खांद्यावर बसवून जग दाखवणारा बाप मुलांना कधीच भेटणार नव्हता… तिचं मन रीतच राहणार होतं.. चार भिंतीच्या मधे तिला आसरा मिळाला होता …. पण तिला मिळालेला आसरा रिताच होता.. रिताच राहणार होता…. अगदी जन्मभरासाठी……
– सुसिमा थोरात.
14/10/2023
@Image source – Google.
@All rights are reserved.










