पावसाळ्याचे दिवस होते….ऑगस्ट महिना मध्येच थोडी पावसाची भुरभुर, श्रावण महिना म्हणजे पर्वणीच …. पावसामुळे मॉर्निंग वॉक बऱ्याच दिवसांपासून बंद झाले होते… त्याचा परिणाम मनावर आणि शरीराला सुद्धा स्पष्ट दिसत होता…आज ठरवलेच होते पाऊस असेल तरी मॉर्निंग वॉकला जायचे … पाऊस नुकताच पडून गेला होता… लहानपणीपासून बॉडी क्लॉक जबरदस्त सेट झाले होते चार – साडेचार वाजता उठायचेच पण तरीही मॉर्निंग वॉकला जाणे झालेच नव्हते…..
मॉर्निंग वॉकला गेले…मस्त पाऊस पडला होता.. संपूर्ण निसर्ग , पर्यायाने झाडे , वेली ,फुले न्हाऊन निघाल्या होत्या.. धुंद झाल्या होत्या…बघून मनाला सुखद वाटले… बऱ्याच घरांच्या कुंपणातून पारिजात, मोगरा, रातराणी, सोनचाफा, केवडा , कण्हेरी अशा फुलांचा सुगंध दरवळत होता…. तो मनाला खूप प्रफुल्लित करत होता … पावसात न्हाऊन निघालेली ती फुले खूप सुंदर दिसत होती….तृप्त झाली होती….
मनात विचार आला, फुलांच आयुष्य किती चार दिवसाचे…. तरी किती त्याग त्यांचा… चार दिवसाच्या आयुष्यात इतरांना सुगंधित करायच, आनंदात जगायचं…..वाटायचा तो सुगंध पायदळी तुडविणारांनाही, कुस्करणाऱ्या हातांनाही…आणि फांदीपासून वेगळे करणारालाही…. सोनचाफ्याची दोनच फुले एक केसात माळले आणि एक टेबलवर ठेवले, तरी दिवस संपूर्ण हवेत तरंगल्यासारखा भासतो मला…. त्यांचे किती उपकार ते आपल्यावर..
अनंत किती दूरवर उमलला तरी त्याचा सुगंध संपूर्ण परिसराला धुंद करून सोडतो…. फुलं आपलं जीवन इतरांना सुगंध देण्यात व्यतीत करतात…. जगावे लागते इतरांसाठी म्हणून ते कधी दुःख करताना आपण पाहिले आहे का? की त्यांनी किती प्रश्न केला आहे.. फुलावे कोणासाठी?…. उमललो कोणासाठी ??? …. ‘उमललो कोणासाठी’ हे महत्त्वाचे नसतेच मुळी… उमलल्यानंतर इतरांना सुगंध देत राहणे…. मग तो कोणीही असो… हे आपलं कर्तव्य जसं फुल सोडत नाही….. त्याचप्रमाणे आपण आपल्या आयुष्यात इतरांना होईल तेवढी मदत करायची… कोणत्याही मोबदल्याची अपेक्षा न ठेवता …. अडल्या नडलेल्यांना मदत करावी…
यातून जे आत्मिक समाधान आणि आनंद मिळतो तोच आपल्या जीवनाला जगण्यासाठी नवी उमेद आणि उभारी देते…
“जगाच्या कल्याणा देह कष्टवावा..”
या तुकाराम महाराजांच्या उक्तीनुसार फूलाप्रमाणे आपले जीवन व्यतीत कराव… आपला आयुष्य आपल्या स्वतःसाठी नसतेच मुळी, त्यामध्ये होता होईल तेवढे इतरांचे कल्याण करायच..
फुल झाडाचा सर्वात कोमल,नाजूक आणि सुंदर भाग… फुलपाखरे, मधमाशा, भुंगे त्यांच्यातील मध सेवन करतात…..आयुष्य चार दिवसाच तरी आनंदात डोलायचं… वाटायचं तो परिमळ, वाढवायची ती शोभा निसर्गाची… आणि आयुष्याची सुद्धा इतरांच्या…
तसच काहीस आपल आयुष्य असावं….छोटंसं पण त्यात भरभरून जगाव… आनंद आणि परिमळ उधळावा दाही दिशांत.. जेणेकरून जगण्याचा आनंद काय असतो?? हे इतरांना उमगावे आपसूकच आपल्याकडे पाहून….बस इतकेच .. असेच असावे,आपले जगणे आणि फुलणे सुद्धा….
- सुसिमा थोरात.
- 19/08/2026
- @All rights are reserved.
- @Image source – Google
*फुलावे कोणासाठी?…. *










