आज मला तिच्या डोळ्यातल्या चमकेने आणि धाडसाने भारावून टाकले होते….मी ऐकत होते, ती सांगत होती, काळा सावळा चेहरा,सरळ नाक, विस्कटलेल्या थोड्या दाट पण मध्यम भुवया….डोळ्यात चमक असणारे तेजस्वी डोळे,तपकिरी छोटीशी टिकली… हलकीशी केशरी रंग असणारी साडी चापून चोपून नेसली होती…पिन अप केले नव्हते, पण पदराने सर्व अंग झाकून घेतले होते,.. गडद शेवाळी रंगाचा कोपराच्या थोडा वर ब्लाउज…… शेतात मजुरी करून काळवंडलेले हात- पाय… पायात थोडी मोठी जाड जोडवी, हिरव्या कळकट झालेल्या बांगड्या… काखेला चार वर्षाचे पोर सर्दीने बेजार झाले होते….
तिचे बोलणे ऐकून माझे डोके सुन्न झाले…..ती भरभरून सांगत होती ..” मॅडम पोरगा अभ्यास करत नाही, आजोबाच्या मागे फिरतो… आजोबाने नुसतं लाडवून ठेवले त्याला”.. किती मारलं? तरी ऐकत नाही … नवऱ्याने लय मारल बघा मला मागच्या आठवड्यात….सासू – सासरे तमाशा बघत उभे होते… त्यांनी अडवलं सुद्धा नाही नवऱ्याला… रोज दारू पिवून येतीती आणि मारतीती….पोटाला तीन पोरी त्याचा पाठीवर झालेली दोन मुले त्यापैकी एक मोठा माझ्या पहिलीच्या वर्गात पहिली शिकत होता.. दोन वर्षांपूर्वी शिलाई मशीन घेतली, नवऱ्याने घरातून बाहेर काढलं, त्या मशीनच्या जीवावर लय पैसे मिळवलं…. सगळं घर मीच व्यक्ती चालवती…बाजार आणती… हे काहीच पैसे कमवत नाही, किरकोळ कमावतात तेही दारुत उडवतात..”…
असे खेड्यातले चित्र मला फारसे काही नवीन नव्हते… बाईच्या नशिबाची ही हळवी कर्मकहाणी होती… पाच नॉर्मल डिलिव्हरी सरकारी दवाखान्यात झाल्यानंतर कसली जपणूक नाही..पहिल्या तीन मुली…..मुलांना जन्म देण्यापासून, सांभाळण्यापासून, पैसे मिळवून, ज्वारी आणून त्यांना भाकरी करून वाढेपर्यंत आणि त्यांचा सर्व अभ्यास .. सर्व गोष्टींची काळजीपूर्वक विचार करून वागणारी, या जगातील एकमेव त्यागमुर्ती म्हणजे आईच असू शकते…
मला तिच खूप कौतुक वाटलं… मी माझीच नाही, तर सर्व स्त्रियांची तुलना तिच्यासोबत केली…. ती म्हणाली,” काम करून मिळालेले, पोरींचे काही पैसे बँकेत ठेवती” मोठी पोरगी नववीत शिकत होती… बचत गटात भरती… घरात ठेवत नाही नाहीतर, ते भांडून, घेऊन दारू पिऊन येतात…”
शिवीगाळ करणारा, मारहाण करणारा, पाच पाच बाळंतपणं अंगावर लादनारा ,व्यसनी नवरा… नातवंडाला चांगले वळण लागून न देता, वंशाचा दिवा म्हणून, लाडाने बिघडवणारे सासू सासरे…. पोटाला पाच लहान मुले, वंशाला दिवा पाहिजे म्हणून पाच वेळा मरणप्राय यातना,कळा सोसणारी ही माय ..
तिचं गाऱ्हाणं ऐकताना डोळ्याच्या कडा आपोआपच ओल्या झाल्या….. मुलांना जन्म देण्याची एकच जबाबदारी तिच्यावर नव्हती, पैसे कमावून त्यांना ज्वारी आणून भाकरी करण्यापासून ,त्यांच्या आजारपणाची, त्यांचा अभ्यास, त्यांच्यावर चांगले संस्कार करून, त्यांना आधार देणे यासाठी रात्रंदिवस ती झिजत होती….. चार वर्षाच पोर घेऊन मजुरीला जात होती… कपडे शिवत होती… गोधड्या शिवत होती..आलेले पैसे काटकसर करून बँकेत ठेवत होती…
या सर्व गोष्टी पैकी एकाही गोष्टीची काळजी तिच्या नवऱ्याला किंवा तिच्या सासू-सासर्यांना नव्हती.. ती सांगू लागली, “आई-वडिलाकडे गरीबीच हाय सगळी मॅडम..!! तिकडे तर कशी जावू पोरी, पोर घेवून “.. तिचा स्वर भिजलेला होता, तिच्या या अगतिकतेचा, पुरेपूर फायदाच सासरच्या लोकांनी उठवला होता, उठवतच होते… तिच्या शरीरावर होणारे वार आणि मनावर होणारे वार याची मोजदादच करता येत नव्हती… लग्न करून सात जन्माची साथ देतो, सांभाळतो, म्हणून वचन देऊन लग्न करून घरची लक्ष्मी म्हणून घरी आणणाऱ्या नवऱ्याने त्यापैकी कोणतच वचन पूर्ण केलेले नव्हतं… तिची आर्थिक जबाबदारी, मानसिक जबाबदारी, तिची भावनिक जबाबदारी, तिची शारीरिक जबाबदारी, मुलांच्या जबाबदारी यापैकी कोणत्याच जबाबदारीची त्याला जाणीव नव्हती… त्याचं कोणतच कर्तव्य त्याला माहीत नव्हतं… गळ्यात अडकवलेलं धाग्यातल्या काळ्या मण्याचे मंगळसूत्र त्याच्या नावाखाली फक्त डोंगराएवढे ओझे ती वाहत होती…. क्षणाक्षणाला पोरांच्या काळजीत होती… “रातभर ते दारू पिऊन दंगा करतात , पोरींना मी दुसऱ्या घरात झोपायला पाठवते…” या तिच्या वाक्यांने काळजावर अजून एक चर्कन वार झाला…
या मुलांवर संस्कार करण्यासाठी, त्यांच्यासाठी पैसे कमावण्याची कसलीच जबाबदारी तिच्या नवऱ्याची नव्हती का? आज किती घरात अशी परिस्थिती आपल्याला दिसून येते….
याची विरुद्ध बाजू म्हणजे, शहर भागात बरीच लोक चांगल्या कंपन्यांमध्ये काम करतात भरपूर पैसे कमावतात,.. स्वतःचे फ्लॅट घेतात त्यांच्यापैकी कित्येक जणांच्या बायका मात्र घरी ऐश आरामात घरी बसून राहतात.. एक रुपया कमावत नाही तरी…. सर्व सुख सुविधा, सोयी त्यांना उपलब्ध असतात…त्याचा उपभोग घेतात.. जेवण सुद्धा करण्याचे कष्ट त्यांना घ्यावेसे वाटत नाही… पार्सल मागवतात हॉटेलमध्ये जातात… महिन्याला होणारा हजारो रुपयांचा ब्युटी पार्लरचा खर्च, महागडे कपडे, दागिने , हाऊस मौज आराम त्यांच्या वाट्याला येतो..बर्थडे, anniversary… एक रुपयाची कमाई नाही तरी, मुलाला सोडायला आणायला स्कूल बस असते… कारण त्यांचे नवरे व्यवस्थित कमावणारे आणि त्यांच्या बायकोला जपणारे असतात….यापैकी काहीच तिच्या वाट्याला आले नव्हते, हे नसूनही होणारी मारहाण, ही बाळंतपणे, शिवीगाळ यामुळे ती पूर्ण पिचून गेली होती….
पण मग एखादीच्याच वाट्याला असं दुःख, असा त्रास का यावा??? तिची नकळत तुलना मी सर्वांशी करत होते… का देवाने तिच्या वाट्याला असं आयुष्य आणले असेल???काही वेळा हे व्यसन करणारे नवरे, व्यसनांमुळे पटकन मरूनही जातात… लवकर जगाचा निरोप घेतात…आणि सर्व जबाबदाऱ्यांवरून मोकळे होतात, ती विधवा होते तो मेला म्हणून, पण तरीही जबाबदाऱ्यातून मोकळी होत नाही… माय कधीच या चक्रातून जबाबदारीतून मोकळी होऊ शकत नाही… ती मरेपर्यंत झिजत असते कणाकणाने…. आपल्या लेकरांसाठी..
नवरा म्हणून नावाला असलेले एक वलय तिला काय देतं हे आजवर मला कळलं नाही???फक्त समाजात नवरा आहे ही एक ओळख …बाकी.. सर्व खोटी आरास असते…स्त्री तिच्या कर्तृत्वाने सगळं घर उभा करते.. स्वतः साठी ती कधीच जगत नाही…ती हरत नाही…… स्वतःचा संसार स्वतः चालवते… कुणी मारलं, कुणी शिवीगाळ केली, कुठल्या नवऱ्याने अपमानित केले, नातेवाईकांनीला लाथाडले….तरी ती जगत असते…
तिला हक्क नसतो का सन्मानाने जगण्याचा??? स्वतःची हौसमौज करण्याचा…नवऱ्याकडून कोड कौतुक करून घेण्याचा.. पाठीवर आधाराचा हात ठेवणारा नवरा खूप काही तिला देऊन जाऊ शकतो..तो सर्वांना मिळतोच असे नाही…
पण तिच्या भाळावर बाराही महिने कष्ट आणि त्रास संघर्ष,लिहिला होता, ती झगडत होती… परिस्थितीशी लढत होती.. स्वतःच्या मुलांसाठी, स्वतःच्या लेकरांसाठी समाजाशी लढत होती… तिचे कौतुक करावे तेवढे थोडेच होते… आज या जगात भरपूर स्त्रीया असतील ज्या वेगवेगळ्या पातळ्यांवर, वेगवेगळे क्षेत्रांमध्ये काम करत असतील …तरीसुद्धा तिच्या डोळ्यातील वेगळीच चमक, मला जगण्यासाठी अजून मोठी प्रेरणा देऊन गेली…. तिच्या या कर्तुत्वाला सलाम!!!!
आई म्हणून ती कधीच हरली नाही, हरणार नाही….. परिस्थितीने तिला हरवले असले, तरी ती हरली नव्हती… आणि हरणारही नव्हती… ती झुंजत राहणार होती… तिच्या अखेरच्या श्वासापर्यंत तिच्या मुलांसाठी….. कारण सगळ्यांनी जबाबदारी टाळली तरी ती त्या जबाबदाऱ्या टाळू शकत नव्हती… कारण ती माय होती… तिच्या पायात पडलेली ही बेडी समाजाला दिसत नसली.. तरी ती माय या बेडीतून कधीच मोकळी होणार नव्हती… कधीच मोकळी होणार नव्हती…..
@All rights are reserved.
@Image source – Google.
*अगतिकता….*