*जान है, तो जहाँ हैं|….
वसंत ऋतूची सुरुवात होऊन नुकताच एक आठवडा आठवडा लोटला होता .. वातावरण कसं प्रफुल्लीत करणारे होते… कोकिळेच्या सुरेल कुंजनाने मन सुखावत होते…. पहाटेची पाखरांची किलबिल, अंगावर सुखद,अलगद हळुवार अशी फुंकर मारणारा सकाळ आणि सायंकाळ चा थंड वारा… दिवसभराच्या रखरखीत उन्हामध्ये सुद्धा नव्याने पल्लवलेली सारी सृष्टी हसत होती…. तो नवा साज लेऊन स्वतःशीच लाजत होती… जणू काही साऱ्या निसर्गाला भाळून टाकत होती….
अशा सगळ्या नयनरम्य वातावरणात, माणूस मात्र पार जायबंदी झाला होता .. तो कोरोना विषाणू च्या संकटामुळे….
तिन्हीसांजेला बाहेर कुठे पडता येणार नाही, पण आपण गच्चीवर नक्की जाऊ शकतो… थोडफार पाय मोकळं करायला.. …असा विचार करून निर्विकार मनाने पायऱ्या चढून गच्चीवर गेले.. पश्चिमेला सूर्यास्त दर्शन होत होते… थोड्याच वेळात तो सूर्य मावळणार. आजचा सूर्यास्त मला वेगळाच भासत होता.अस्ताला जाणारा तो दिनमणी मला उदास वाटत होता…. आंब्याची ,सुपारीची, फणसाची, सागाची, माडाची झाडे निःशब्द उभी होती… सूर्यास्ताच्या वेळी, सूर्याच्या किरणांनी सह्याद्रीची रांग सोनेरी किरणे अंगावर पांघरूण स्तब्धपणे उभी होती.. झाडे सुद्धा या सूर्याची सोनेरी किरणे किरीट प्रमाणे शिरावर धारण करून शांत उभी होती… तरी ती उदासच वाटत होती. आकाशाची लालिमा मन मोहून घेत होती…पाखरांचे थवेच्या थवे घरट्याकडे परतत होते. कोकिळा आर्त कुंजन करत होती….
रस्त्यावर मात्र नेहमीप्रमाणे वाहनांची माणसांची वर्दळ, गर्दी नव्हती. क्वचित एखादी व्यक्ती दिसत होती. एरवी गजबजलेले असणारे बस स्थानक, आज स्मशानाप्रमाणे ओस पडले होते.. सारा निसर्ग मानवाच्या या अवस्थेला कुत्सितपणे हसत आहे… असंच मला जाणवले. पर्यावरणावर प्रदूषकांचा मारा करून साऱ्या पशु – पक्षांचे, प्राण्यांचे, पक्षांचे जीवन धोक्यात आले. त्यांना हैराण करणारा माणूस आज स्वतः जायबंदी झाला होता…
आठवा…. पाण्याचे प्रदूषण केल्याने समुद्राच्या काठाशी मरून पडलेले हजारो मासे…. विषारी पाणी पिऊन मरणारी हजारो जनावरे…. हवा प्रदूषणाने, बॉम्बस्फोटाने मरणारी हजारो पाखरे … जी आज आनंदाने गगनात भरारी घेत आहेत, मात्र आज या विषाणू मूळे माणसे पाखराप्रमाणे मरत आहेत…जीव मुठीत धरून, माणसे घरातच बंदिस्त झाली आहेत… एवढी मोठी शिक्षा आज निसर्गाने मानवाला दिली आहे..
आज दाही दिशातून फक्त आपल्याला जिवलग, आप्तेष्ट, मित्रमंडळी, नातेवाईक यांच्या मृत्यूच्या बातम्या वाऱ्यासारख्या येऊन धडकत आहेत.. त्या ऐकून उरात धडकी बसल्यावाचून राहत नाही ..आज घडीला फक्त आपला जीव वाचवणे, तेही माणसाला कठीण होऊन बसले आहे. या सर्व कोविड परिस्थितीमध्ये आणखीन एक प्रकर्षाने जाणवणारी गोष्ट म्हणजे, ‘ऑक्सिजनचा तुटवडा’… याच माणसाने स्वतःच्या सोयीसाठी हजारो झाडांची निर्दयपणे कत्तल केली, त्याच माणसाला आज निसर्गाकडे ऑक्सिजनची भीक मागावी लागते…
आपल्या एका श्वासाची किंमत काय आहे????? हे माणूस पूर्णपणे विसरला. एका दिवसात एक माणूस तीन सिलेंडर भरतील इतक्या प्राणवायूचे (ऑक्सिजन) श्वसन करतो.. एका ऑक्सिजन सिलिंडरची किंमत 700 रुपये आहे.दिवसाला एका माणसाला 2100 रुपयाचा ऑक्सिजन लागतो,दरवर्षाला एका माणसाला 7 लाख 65 हजार 500 या हिशोबाने, सरासरी माणूस 65 वर्ष जगला, तर त्याला 5 कोटी रुपयांचा ऑक्सिजन लागतो… हा ऑक्सिजन झाडे माणसाला फुकट देतात… एकही रुपया न मागता.. आज 22 एप्रिल वसुंधरा दिनाच्या निमित्ताने एवढेच सांगावेसे वाटते,…आता याच्यापुढे प्रत्येक माणसाने आपल्या आणि समाजाच्या हितासाठी, आपण सर्वजण ‘एक तरी झाड लावू, आणि जगवू ‘ही एकच माफक अपेक्षा..
आज माणसासाठी मरण एवढं स्वस्त झाल आहे आणि जगणं खूप महाग झाल आहे.. माणसाची दयनीय स्थिती झालीय.. त्याला फक्त आणि फक्त माणूस जबाबदार आहे.. या परिस्थितीतून सुरक्षितपणे बाहेर पडण्यासाठी माणसाला थोडी माघार घ्यावी लागेल.. थोडं थांबावं लागेल आणि थोड सोसाव लागेल… या विश्वावर अधिराज्य करणाऱ्या माणसाला जायबंदी व्हावं लागेल.. घरीच राहून सुरक्षित राहाव लागेल … या विषाणूचा पराभव करावा लागेल.. तरच माणसाला या जगात पुन्हा नव्याने , मुक्तपणे भरारी मारता येईल… “या विषाणूचा समूळ नायनाट, लवकरात लवकर व्हावा”, हीच ईश्वरचरणी प्रार्थना!!! सर्वांनी त्यासाठी काळजी घेतली पाहिजे. “घरी रहा, सुरक्षित रहा, मास्क आणि सोशल डिस्टंसिंग वापर करा, सॅनिटायझर चा वापर करा.” जगायचं असेल तर काही बंधनं आपली आपण स्वतःवर घातली पाहिजेत….आणि एक गोष्ट लक्षात ठेवा..” Always keep it in mind, जान है तो जहाँ हैं|…”…
– सुसिमा
22/04/2021
@All rights reserved.
@Image source – Google.









