आज रस्त्याला नेहमीसारखीच वर्दळ जास्त नव्हती,तरीही वाहने होतीच ….भरपूर पाऊस पडून गेल्याने, बऱ्याच ठिकाणी पाण्याची तळी साचली होती…. येणारी वाहने वेगात येत होती, जाणारी काही वाहने वेगाने पुढे निघून जात होती… मी मात्र गाडी नेहमीच्या मीडियम स्पीड वर ठेवली होती..35- 40 स्पीड मध्ये मला एक रिलॅक्सपणा वाटत होता..मला घाई नव्हती कारण, रोज पाच- दहा मिनिटे लवकर निघायची सवय असल्याने,ती सवय मला गाडी चालवताना रिलॅक्स राहायला शिकवून गेली..
काही वेळा मागचे वाहन ओव्हरटेक करून जोरात पुढे जायचे.. काही वेळा एखादे वाहन राईट इंडिकेटर दाखऊन लेफ्टला अचानक वळायचे…. काही जण लेफ्ट इंडिकेटर देऊन लेफ्टला वळायच्या अगोदर राईटला जायचे…हा रोजचा अनुभव …या गोष्टीचे आश्चर्यही वाटायचे..तर काही वेळा घाई- घाईत काही लोक इंडिकेटर न देताच पटकन वळायचे….तर काही वेळा शेजारून येणारी एखादी गाडी खड्ड्यातून झपकन मातीचे लाल पाणी अंगावर उडवून जायची…. खड्डे आली की गाडीचा स्पीड पाच- दहा वर ठेवायला बरं वाटायचं.. खड्ड्यातून हळुवार जाताना कोणताही त्रास व्हायचा नाही..
आयुष्यात एखादी वेळ सोडता, फार वेळा काही गाडीवरून पडण्याचा प्रसंग आला नाही…. प्रत्यक्ष आयुष्य जगताना मात्र काही वेळा चूक नसताना, तर काही वेळा छोटी चूक झाली तरी खूप वेळा पडावं लागलं….माणसेही तशी भेटली, वाहने भेटतात अगदी तशी… काही वेळा राईट इंडिकेटर दाखवून लेफ्ट जाणारी… तर काही कारण नसताना अंगावर चिखल फेक करणारी….. नियतीने माझी कुठलीच चूक कधीच पदरात घेतली नव्हती..प्रत्येक चुकीची पुरेपूर शिक्षा मला दर वेळेस मिळत गेली.. even आताही ती मिळतच होती.. या सगळ्या ठेचा खाल्ल्यानंतर आता मला पुन्हा बिलकुल पडायचं नव्हतं….
आयुष्यात पडण दूरच, गाडी सुद्धा खूप काळजीपूर्वक मी चालवत होते.सावकाश ,विचारपूर्वक प्रत्येक पाऊल मी जपून टाकत होते. डोक्यावर हेल्मेट…. पावसासाठी रेनकोट… तशीच गाडीही चालवत होते…आता मला कसलीच घाई नव्हती ….कोणाच्या पुढेही जायचं नव्हतं.. कोणाला ओव्हरटेक करायचा नव्हतं …. अशा पद्धतीने राईट इंडिकेटर दाखवून लेफ्टला ही वळायचं नव्हतं, जेणेकरून मागची व्यक्ती फसेल..मागच्या आरशात जास्त वेळ पाहण योग्य ठरणार नव्हत.. भूतकाळ फक्त एक मार्गदर्शन करण्यासाठी अनुभवाचं गाठोड होत. … एकदम सावकाश ,जाणीवपूर्वक खड्डे पाहून, प्रसंगी दुसरी गाडी जाईपर्यंत,थोडं थांबून, मला फक्त सुरक्षित ध्येयापर्यंत पोहोचायचं होतं….आयुष्य सुरक्षित जगायचं होतं…
घाई-गडबडीत काही चुकीचे निर्णय घेऊन, ते निस्तरण्याची ताकद आता माझ्यातही नव्हती.. आता मला प्रत्येक पाऊल सावधपणे टाकायचे होते…कोणाच्या पुढे जाण्याने किंवा कोणाच्या ओव्हरटेक करण्याने मला काहीच फरक पडणार नव्हता.कोणाच्या पुढे जाण्याचे आणि कोणाच्या मागे राहण्यानचे मला कसलेच दुःख होणार नव्हते….आयुष्याचे ही तसेच काहीसे कोणी प्रगती करून पुढे गेले म्हणून ईर्षा वाटत नव्हती… आणि कोणी माझ्या मागे राहिले म्हणून त्या मागे राहण्याचा असुरी आनंदही मला नव्हता….
मला आता फक्त माझे आयुष्य जगायचे होते ….शांतपणे…. निवांतपणे….कोणताही अपघात न होता अगदी शांत असलेला पाण्याचा प्रवाह छोटासा दगड टाकल्याने त्यावर जसे हळुवार तरंग उमटतात ना अगदी तसे… भरभरून जगायचे होते.. मोकळा श्वास घ्यायचा होता… तो रिलॅक्स ,निवांत ,मोकळा श्वास मला जगण्याचा आनंद मिळवून देईल, याची मला खात्री होती… कोणासाठी मला पॅनिक व्हायचे नव्हते..आणि कोणी आपल्यासाठी पॅनिक झाले तरी मला त्याचे सोयरे- सुतक नव्हते… आयुष्याने मला दिलेल्या खूप सगळ्या धड्यानंतर मला मिळालेला हा खूप मोठा lesson होता…आता मला या आयुष्याच्या प्रवासात आजूबाजूच्या निसर्गाचा आनंद घ्यायचा होता…
आपण आपला मार्ग सुरक्षितपणे, सावकाशपणे, विचारपूर्वक, सारासार विचार करून, मार्गक्रमण केल्यास आयुष्यात बरेच अपघात टाळता येतील…. इतरांशी तुलना करून , चुकीच्या पद्धतीने ओव्हरटेक करून घाईत जाऊन,अपघात होण्यापेक्षा आपण आपल्या स्पीड मधे गेलो तर जास्त सुरक्षित ध्येयापर्यंत निश्चितच पोहोचू यात तीळ मात्र शंका नाही …
– सुसिमा थोरात.
19/07/2024
@All rights reserved.
@Image source – Google.