*धोंडा महिना…. पुरुषोत्तम मास*

यावर्षी 18 जुलै 2023 पासून अधिक श्रावण महिन्याला सुरुवात झाली व त्याची सांगता 16 ऑगस्ट 2023 रोजी झाली.या अधिक महिन्याला अधिक मास, पुरुषोत्तम मास, मलमास किंवा मराठवाड्यातल्या भागात या महिन्याला धोंडा महिना असेल म्हटले जाते….या महिन्यात जावयाला वाण देण्याची परंपरा फार वर्षापासून चालत आली आहे….मुलीच्या आई वडिलांना मुलगी व जावई हे लक्ष्मीनारायण वाटतात ,म्हणून त्यांना घरी बोलावून त्यांचा मानसन्मान करून त्यांना चांदीचे वाण दिले जाते ….

अधिकमासात जावई व मुलीला वाण देणे, त्यांना पोषाख घेणे ही परंपरा आजकाल आपल्याला सर्वत्र पाहायला मिळते …..काही वर्षांपूर्वी फक्त लग्न झाल्यानंतर पहिल्या अधिक महिन्यातच अधिकवाण दिले जायचे, परंतु आता प्रत्येक अधिक महिन्यात वाण देण्याची परंपरा सुरू झाली आहे….

सध्या लग्न समारंभ, वाढदिवस ,डोहाळे जेवण, बारसे असे अनेक कार्यक्रम समाजामध्ये खूप मोठे साजरे केले जातात..समारंभांमध्ये खूप पैसे खर्च केले जातात ,कपडे ,दागिने यांची वारेमाप खरेदी केली जाते व दिखावा करण्यासाठी लाखो रुपये खर्च केले जातात..त्यामुळे या समारंभाचा मूळ हेतूच नष्ट होतो…. लोकांचे, नातेवाईकांचे मानपान रूसवे-फुगवे यातच समारंभ संपून जातो …

आज काल शिकलेल्या, सुशिक्षित लोकांना हे सर्व अवडंबर समजते..पण आपणही त्याचा आवाका किती वाढवावा हे आपल्यावर अवलंबून असते…या सर्व अशा प्रथांमध्ये ज्या चांदीच्या सोन्याच्या वस्तू भेट दिल्या जातात ,त्यांचा आपण किती उपयोग करतो हे प्रत्येकालाच माहीत असते.समाजाची आर्थिक साक्षरता ही वाढवण्याची गरज आहे …भरमसाठ कपडे, दागिने खरेदी करण्यापेक्षा तेच पैसे थोडे काटकसरीने वापरले तर त्यांची बचतही होऊ शकते… गरजेच्या वेळी त्यांचा उपयोग होऊ शकतो…

समारंभ साजरे करणारे लोक फक्त समारंभ साजरे करत नाहीत, तर त्या सर्व समारंभाचे फोटो व्हाट्सअप, फेसबुक अशा सोशल मीडियावर अपलोड करतात..त्यामुळे स्टेटस बघून लोकांमध्ये मोठे समारंभ साजरे करण्याची स्पर्धा लागते त्यामुळे या गोष्टीचे प्रमाण अजूनच वाढत जात आहे. हे सर्व समारंभ साजरे करण्यासाठी ज्या लोकांची, ज्या मुलीच्या आई-वडिलांची परिस्थिती नसते त्यांना हे सर्व शक्य नसते…त्यावरून मुलीला सासरचे लोकही त्रास देतील, या भीतीपोटी कर्ज काढून मुलीचे आई वडील सासू-सासर्‍यांचे,जावयाचे मानपान करतात…मुलीच्या मनाची अशा पद्धतीने आयुष्यभर कुचंबना होत राहते…म्हणून सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी ,सध्या चालू असलेला अधिक मास अशा पद्धतीने न साजरा करता, या पुढचे अधिक मास अशा पद्धतीने साजरे न करता,अधिक महिन्यांमध्ये नात्यातील जिव्हाळा वाढावा, म्हणून मुलीला व जावयाला घरी ब बोलावून त्यांना शुभाशीर्वाद देऊन, त्यांचा माफक प्रमाणात मान सन्मान केला तरी पुरेसा असतो. त्यासाठी 33 अनारसे ,33 बत्तासे तसेच 33 म्हैसूर पाक वड्या अशा सच्छिद्र पदार्थांची व चांदीच्या भांड्यांची ,सोन्याच्या दागिन्यांची,कपड्यांची काहीच अपेक्षा, काहीच गरज नसते….

अधिक मास, धोंडा महिना या नावाने ज्वेलर्स वाल्यांचा, कापड दुकानदारांचा, बिझनेस भरभराटीला येतो. म्हणून अधिक महिना हा व्यवसाय वाढवण्यासाठी बहाणा ठरतो. सध्या चालू असणाऱ्या असणाऱ्या या अधिक श्रावण महिन्यात आपल्या सर्वांच्या जीवनात खूप सुबत्ता येवो..भरभराट होवो…. म्हणून अधिक महिन्यात सर्व अधिक न करता माफक प्रमाणात करावे हीच…हीच माफक अपेक्षा…

– सुसिमा थोरात.

18/08/2023.

@All rights are reserved.

*दिवस पहिला गणवेशाचा… *

शाळा सुरू होऊन एक महिना उलटला होता. नवीन वह्या, नवीन पुस्तके, वर्गात लावलेले रंगीबेरंगी तक्ते, चित्रे, नवे शिक्षक आणि या सर्वांना सामावून घेणारी नवीन शाळा….या सर्वांमध्ये नव्या नवलाईने इयत्ता पहिली मध्ये शिक्षणाच पहिलं पाऊल टाकणारा बालचमू…शाळेत खूपच खुश होता. नवी छत्री, नवा डबा, नवी बॅग सगळच कसं नवीन नवीन आणि छान छान !!!!या सर्व वातावरणात बालचमुचा उत्साह खूप होता. अगदी फुलपाखराप्रमाणे ही लहान मुले शाळेत बागडत होती….कमतरता होती, ती फक्त नवीन गणवेशाची..तो गणवेश मुलांना देण्यात आला .नवीन कोऱ्या गणवेशाची घडी सर्वच मुलांच्या हातावर देण्यात आली. सर्व मुले नवीन गणवेशाचा सुगंध घेऊन तृप्त होऊ लागली..गणवेशाच्या कापडाचा येणारा सुगंध अगदी महागड्या अत्तर पेक्षा सुद्धा खूप सुंदर आणि धुंद करणारा होता.

माझा मुलगा विवान ,त्याच्यासाठी सुद्धा सगळा हा अनुभव नवीनच होता ..अगदी सर्व मुलांप्रमाणे !!!घरी आल्या आल्या वर्दी मिळाली, “आई उद्या गणवेशात शाळेत जायचे आहे, “मलाही ऐकून खूप बरे वाटले,.गणवेश नव्हता तोपर्यंत रंगीबेरंगी कपड्यात शाळेत जाताना त्यालाही अनकम्फर्टेबल वाटणारे ड्रेस, यातून त्याची सुटका होणार होती…गणवेश घालून शाळेत जायचा दिवस उजाडला.. विवानने सातच्या अगोदर सर्व वैयक्तिक उरकले आणि विचारले ,”आई गणवेश घालू ??मी म्हटलं थोडं थांब शाळेत जाताना दहा मिनिट आधी गणवेश घाल.नाही तर तो खराब होईल.तोपर्यंत नेहमीचे कपडे घाल.शाळेत जाताना गणवेश घालायला घेतला, आरशासमोर उभा राहून महाशय गणवेश घालू लागले… सर्व बटणे लावली, आणि मला दाखवली तर सर्व बटनांचे अगदी वरपासून खालीपर्यंत Parajumble झाले होते..मला थोडे बघून हसू आले, त्याने मला सांगितले तू बटण लाव. मी सांगितले, “तुला स्वतःला बटणं लावता यायला हवीत “.मग दहा मिनिटांनी सर्व व्यवस्थित लावलेली बटणे मी पाहिली. बेल्ट बक्कल सर्वांचा सराव सुरू झाला. …डोक्याला तेल लावायला घेतले, तर त्याने मला अलमंड ऑइल लावण्याचा आग्रह धरला..”माझ्या केसांचा छान सुगंध आला पाहिजे ना!!!”.

मी विचार केला ,एवढ्या लहान वयात आपण रुबाबदार दिसावं, छान दिसावं, ही भावना लहान मुलांच्या मनात रुजते…किती छान वाटते!!!लहान मुलांची मने व वय संस्कारक्षम असते..”लहान मुल म्हणजे मातीचा गोळा आकार द्यावा तशी मूर्ती घडते. “अशाच कित्येक मूर्ती मी समोर घडताना पाहत होते..ते माझे परम भाग्यच होते .घरी माझ्यासमोर घडणारी ही मूर्ती पाहून मलाही बरे वाटले..

नवीन गणवेश म्हणजे मुलांचा खूप आनंद असतो. सर्वांच्यात समानता, सारखेपणा दिसतो, एकोपा दिसतो, शिस्त दिसते, समूह भावना दिसते, श्रीमंती आणि गरिबी यातील दरी नाहीशी करणारा, हा गणवेश ….सर्वांमध्ये समानता निर्माण करणारा हा शालेय गणवेश, माझ्या लहानपणी सुद्धा माझ्या बालपणाचा खूप मोठा आधार होता …हे मला इथे प्रकर्षाने लिहावेसे वाटते, आवर्जून सांगावेसे वाटते ….

असा हा पहिला दिवस गणवेशाचा…खूप उत्साहाचा आणि आनंदाचा…..

-सुसिमा थोरात. 12/08/2023

@All rights are revesred.

@Image source – Google.

*माणसाने माणसाशी माणसासम वागणे… *

आज खूप दिवसांनी मनातलं काही लिहिण्यासाठी लेखणी हातात घेतली. सहज काहीतरी शोधण्यासाठी म्हणून पंधरा-वीस दिवसांनी बेडचा ड्रॉवर उघडला.पाहून थोडं धक्काही बसला आणि थोडं विचारातही पडले….सहा वर्षांपूर्वी नवीन घेतलेला मोबाईल, सध्या बॅटरी खराब झाली, बंद पडला, म्हणून नवीन मोबाईल घेतला आणि जुना ड्रॉवरमध्ये ठेवून दिला.त्याची अवस्था खूपच वाईट झाली होती.मोबाईलची बॅटरी फुगून त्याचे बरेच पार्ट वेगळे झाले होते. आता माझ्या हातात त्याहीपेक्षा छान आणि नवीन मोबाईल होता. मला त्या मोबाईलची बिलकूल गरज नव्हती..तो अडगळीत पडून होता, मी माझे काम नवीन मोबाईलवर कंटिन्यू करत होते..मनात विचार आला माणसाच्या आयुष्याचे हे असेच असावे नाही का??

कधीकाळी किंवा वीस दिवसांपूर्वीच नवीन मोबाईल घेण्याआधी, त्या जून्या मोबाईलला मी जीवापाड जपायचे ,पावसात भिजू नये ,हातातून पडू नये ,एवढेच काय कोणाच्या हातून चुकून जरी पडला ,तरी खूप चिडचिड व्हायची …..कारण माझे बरीच ऑनलाईन काम मोबाईलवर असायची …त्याला काही होता कामा नये..तो खराब होईल, तर खूप अडचणी येतील, म्हणून मी त्याला जपत होते..तो माझ्या सवयीचा भाग होता….सगळच त्याच्यावाचून अडत होत..

आपल्याला मदत करणारी ,आपल्याला आधार देणारी, माणस आपण जोडून ठेवतो..आपल्याला उपयोगी पडणारी माणसं आपण जपतो…पण जेव्हा आपली एखाद्याकडून गरज संपते किंवा आपली दुसऱ्याकडून गरज संपते तेव्हा आपणही त्याच्यासाठी अशीच एक अडगळ असतो किंवा आपल्या सुखदुःखाचं त्यांना काही देणंघेणं नसतं…आताच्या कलियुगात जग गरजेवर चाललंय..किंबहुना गरजच माणसाला जोडून ठेवते असेच म्हणूया ना..निकडच माणसाला सर्व गोष्टी करायला भाग पाडते ..आजकाल जग चालले ते गरजेवर चालले असं म्हणावं का??

आजकाल प्रेम, जिव्हाळा, माणुसकी हरपत चालली आहे…संपलीच म्हणू ना!!!!उरली आहे ती फक्त गरज! एखाद्याला आपली गरज असेल तर ती व्यक्ती आणि प्रेमाने बोलते, वागते, पण गरज संपली, की त्याच व्यक्तीला ओळख ही दाखवायला नकोसे वाटते….हा अडगळीत पडलेला मोबाईल या कलियुगातल्या गरजेचे मूर्तीमंत उदाहरण आहे..विश्वात सर्वच गोष्टींचा जन्म गरजेतून झाला आहे, हे जरी खरे असले तरी माणसाच्या आयुष्यात प्रेम, जिव्हाळा, माणुसकी, आपुलकी या गोष्टी माणसाच्या आयुष्याला जगण्याचं कोंदन देत असतात.भौतिक गोष्टींबरोबरच आयुष्य सावरण्यासाठी प्रेम, जिव्हाळा,माणुसकी या भावनिक गरजा ही खूप महत्त्वाच्या आहेत. या आपल्या भावनिक गरजा पूर्ण करण्यासाठी आपल्याला आपल्या जिवाभावाची माणसं असतात..जी आपल्या आयुष्याच्या पाऊलवाटेवर अलवार कुसुमांचा सडा अंथरतात..आपल्याला दुखावत नाहीत..जपतात..अगदी आयुष्यभरासाठी….माणुसकी जपणे महत्त्वाचे आहे, जिव्हाळा जपणे महत्त्वाचे आहे , …

असा विचार करत असतानाच, मला माझ्या जवळच्या शाळेतील प्रार्थना चे शब्द कानावर पडले…

“हीच आमची प्रार्थना अन हेच आमचे मागणे,

माणसाने माणसाशी माणसासम वागणे”….

अगदी या प्रार्थनेप्रमाणे… आयुष्याच्या शाळेत माणुसकीचा धडा शिकणे महत्त्वाचे…

– सुसिमा थोरात, रत्नागिरी.

15/07/2023

@All Rights are revesred,

@Image source – Google.

शुभेच्छा समारंभ निमित्त पत्र….

आदरणीय वरुडे मॅडम,

खरं तर सुरुवात कशी करावी, हेच समजत नाही.तुमच्या सेवानिवृत्ती, शुभेच्छा समारंभानिमित्त प्रथम तुम्हाला खूप खूप शुभेच्छा!! तुमचा आलेला एक कॉल हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. प्रत्यक्षात येणे शक्य नसले तरी, मी याक्षणी मनाने तुमच्या सोबतच आहे…

मॅडम, एवढ्या प्रदीर्घ काळ तुम्ही ज्ञानदानाचे पवित्र कार्य केलेत.. अनेक पिढ्या तुम्ही घडवल्यात.. तुमच्या हातून अनेक घडणाऱ्या मडक्यांपैकी मी एक मडके….. तुमची विद्यार्थिनी..तुमची विद्यार्थिनी या नात्याने मला तुमचा सार्थ अभिमान आहे….माझ्या नववीच्या वर्ग शिक्षिका, ‘वरुडे मॅडम’, माझा आदर्श तुम्ही आहात..नववीच्या रिझल्ट दिवशी माझा पहिला नंबर आल्याबद्दल तुम्ही खूप प्रेमाने मला पेढा भरवला, तो जिव्हाळ्याचा क्षण मी अत्तराच्या कुपीत बंद करून ठेवला आहे… त्या सर्व क्षणांचा सुगंध अजुन दरवळत आहे.मनाला सुखावत आहे…

सुकलेल्या निर्जीव रोपट्याला पाणी घातल्याने ते कसे टवटवीत होते.. असच माझ्या कोमेजलेल्या आयुष्यात तुम्ही ज्ञानरूपी , संस्कार रुपी पाणी घातल्याने ते अगदी टवटवीत झाले, सर्वार्थाने ते बहरले.. पुलकित झाले…तुमच्या अनमोल मार्गदर्शनामुळे मी आज एक शिक्षिका झाले, संघर्ष करून उभी राहिले…

मला आठवते मॅडम, माझ्या बालपणी इयत्ता तिसरीत असताना, मी एक भाषण केले होते…….’माझे गुरुजी ‘ …आमच्या गुरुजींची महती सांगणारे ते भाषण आणि मला धपाटे देऊन भागाकार शिकविणारे जाधव गुरुजी… प्रेमळ आणि समजूतदारपणे शिकविणारे मुख्याध्यापक माळी गुरुजी.. आज प्रत्येक क्षणी मी माझ्या विद्यार्थांना शिकवताना मला आठवतात… अगदी तसेच इंग्रजी विषयाचा प्रत्येक घटक शिकवताना , प्रत्येक तासाला मला तुमची आठवण प्रकर्षाने येते….

अजुन एक गोष्ट सांगावीशी वाटते, पुस्तकातले धडे गिरवायला, आशय सगळेच शिकवतात.. पण तुम्ही आम्हाला आयुष्याचा धडा गिर वायला शिकविले. नवीन वहीच्या पहिल्या पानावर एक वाक्य लिहायला तुम्ही नववीत सांगितलेले… “I will be successful in my life…” आजही माझ्या प्रत्येक वहीच्या पहिल्या पानावर हे वाक्य लिहिलेले असते. मी यशस्वी होत आहे मॅडम… अजुन होईल.

तुम्ही एक विद्यार्थिनी नव्हे, तर एक शिक्षिका घडवली आहे…जी पुढील येणाऱ्या प्रत्येक पिढीला तुमच्या ज्ञानाचा व संस्कारांचा वारसा देत राहील… तुम्ही दिलेले ज्ञान अमृत मी माझ्या विद्यार्थ्यांना देईल.. ती रोपे बहरतील यासाठी नक्की प्रयत्न करेन… अशी खात्री देते…तुम्ही खूप चांगले संस्कार माझ्यावर केलेत.. ..माझ्यात जे काही चांगले आहे ते सर्व तुमचे आहे…. खूप मोठ्या मनाच्या आहात तुम्ही… तुम्ही मला परिस्थितीच जाणीव करून दिलीत… आयुष्याची संकल्पना स्पष्ट केलीत…आज माझ्या आयुष्याचे रोप तुमच्या मुळे बहरले आहे… यामध्ये सिंहाचा वाटा तुमचा आहे… आज तुमचा सेवानिवृत्ती समारंभ आहे…ऐकून डोळ्यात पाणी तरळले….तुमच्या सोबत विद्यार्थिनी म्हणून केलेला सर्व प्रवास आपसूकच डोळ्यासमोरून गेला….

तुम्ही फक्त माझ्या मॅडमच नव्हे एक छान मैत्रीण झालात ,एवढच काय प्रसंगी एक आई झालात..यापलीकडे अजुन कोणता मोठा आनंद असणार आहे,???माझ्या आयुष्याला दिशा दिलीत. तुमचा पाठीवरून फिरणारा हाताचा आश्वासक स्पर्श मला खूप मोठे बळ देऊन गेला …

फक्त अध्यापन न करता आयुष्यातल्या बऱ्या ,वाईट परिस्थितीत एक चांगल्या मार्गदर्शिका तुम्ही बनलात…त्याच बरोबर प्रत्येक संकट क्षणी मला खूप आधार दिला , ऊर्जा दिलीत, कधीही न संपणारी संस्कार शिदोरी दिलीत.आयुष्यात ज्या वळणावर कलाटणी मिळते, तो क्षण तुमच्या मुळे माझ्या जीवनात आला…मला परिस्थिती ची जाणीव झाली… तो क्षण तुम्ही सावरला… त्याचमुळे मी आज कोणत्याही संकटात कोलमडून न जाता, सामर्थ्याने उभी आहे , उभ्या वादळात पाय रोवून धीराने न डगमगता उभी आहे…

तुमचे आभार कसे मानू,??? मी तुमच्या ऋणात राहणं पसंत करेन…ते जास्त आवडेल मला..तुमच्या सारख्या मार्गदर्शिका मिळाल्या… मी खूप भाग्य वान आहे.

“लाभले गुरु तुम्हासम मला या जन्मी,

आहे भाग्यवान मी राहीन तुमची ऋणी…”

आजही एवढेच सांगेन, आजही तुमचा आधार हवाच वाटतो…संकट खूप येतील , संघर्ष खूप आहे.. तुमचे मोलाचे मार्गदर्शन मिळत राहो.. अगदी याच जन्मी नाही, तर पुढचे सर्व जन्म मला तुम्ही शिक्षिका असाव्यात हीच एक आकांक्षा…

“आहात तुम्ही थोर, उपकार अनंत तुमचे,

लाभाल तुम्हीच शिक्षिका, हेच सदभाग्य माझे…”

तुमच्या विषयी किती लिहावे .. शब्द अपुरे पडतील…. यापुढे सेवानिवृत्ती नंतर जीवनात एक छान नवी सुरुवात असते.. तुम्हाला खूप दीर्घायुष्य लाभो.. आरोग्य ,सुख, समृद्धी, समाधान लाभो..आनंद लाभो… हीच ईश्वर चरणी प्रार्थना…

तुमची विद्यार्थिनी ,

सुसिमा थोरात.

28/01/2023

शुभेच्छा समारंभ निमित्त पत्र….

@ All rights are reserved.

श्रावण मासी हर्ष मानसी…

“श्रावण मासी हर्ष मानसी,

हिरवळ दाटे चोहिकडे,

क्षणात येते सरसर शिरवे,

क्षणात फिरुनी ऊन पडे.”

असे श्रावण मासाचे विलोभनीय व सुंदर वर्णन बालकवींनी केले आहे.. श्रावणमास आहेच असा.. सर्वत्र सृष्टी हिरवागार शालू नेसून अगदी नववधूप्रमाणे लाजून उभी असते.. संपूर्ण धरतीवर हिरवा गार गालीचाच अंथरलेला असतो जणू…. श्रावण मास म्हणजे सणांची रेलचेल असणारा महिना.अगदी सगळ्याच आबाल वृद्धांना हवाहवासा वाटणारा….

सृष्टी हिरवळीच्या नव्या नव्याने नटलेली असतानाच, त्या हिरवळीवर उमललेली निळसर, पिवळसर,लाल – गुलाबी,विविधरंगी फुलं मनमोहून घेतात.प्राजक्त, रातराणी, अनंत अशी कित्येक फुले मनापासून उमलतात …. पावसाच्या सरीवर सरी झेलून ती फुले अगदी लाजून चूर होऊन जातात… ती नाजूक लाघवी फुलं, गालातल्या गालात हसताना पाहून मन सुखावून जाते… त्याच नाजूक नाजूक, रंगबिरंगी फुलांवर विविधरंगी फुलपाखरे अगदी आनंदाने बागडताना पाहून मनाला एक विलक्षण सुख मिळते….

फुललेल्या पारिजाताकाचा सुंदर सडा अवनीवर पसरलेला असतो. पावसाच्या सरी वर सरी अंगावर झेलून तो प्राजक्तही अगदी धुंद होऊन जातो… पावसाच्या हलक्या सरी नंतर पडणारे कोवळे ऊन आणि त्या कोवळ्या उन्हासोबत अंगावर, तनामनावर शहारा आणणारी, वाऱ्याची अल्लड झुळूक मनाला किती सुखावून जाते ना!!!! ऊन पावसाचा सुंदर लपंडाव चालू असतो… निर्झर खळाळून वाहत असतात, आनंदाचे गाणे गात असतात…. खुल्या मनानं वाहतात…उंचावरून कोसळणारे फेसाळते,पांढरे – शुभ्र धबधबे मनातील भावना उचंबळून आणतात…मन तृप्त करतात.

पानाफुलांना फुटलेला हा बहर आणि पावसाच्या तुषारां बरोबर आकाशात साकारलेले, सप्तरंगी इंद्रधनु म्हणजे, एक अलवार नात्याची सप्तरंगी सुरुवातच नाही का??! सृष्टीचा हिरवा पेहराव अगदी मनाला मोहून टाकतो. याचवेळी उमललेली सुंदर, निरागस फुले गालातल्या गालात खुदकन हसताना पाहून किती निरागस वाटतात… अगदी पाळण्यात हसणाऱ्या निरागस बाळासारखी..!!.

सणसमारंभाची रेलचेल असणाऱ्या या महिन्यात नागपंचमी, नारळी पौर्णिमा, स्वातंत्र्य दिन, गोपाळकाला, गणपती उत्सव असे सण पाठोपाठ येतात.. याच महिन्यात माहेरवाशीनी मंगळागौरीची पूजा देखील करतात. सौंदर्याने आणि लावण्याने नटलेल्या या श्रावण महिन्यात निसर्गाची प्रीती अशी फुलून येते की निशब्द भाव दिसतो… मन स्तब्ध होते, सृष्टीचे सौंदर्य पाहण्यातच दंग होते…..

निळसर रंगाचा बरसणारा निळा घन मनाला खूप आनंद देऊन जातो…. रंगांची उधळण करणारा रंगारी श्रावण महिना अगदी हवाहवासा वाटतो.. वर्षा ऋतूत आनंदाची उधळण करणारा श्रावण , ओल्या धुंद सरी बरसवून सृष्टीला अक्षरशः प्रेमाने आणि वात्सल्याने न्हाऊ घालतो…. म्हणूनच मंगेश पाडगावकर म्हणतात,…

” श्रावणात घननिळा बरसला,

रिमझिम पाऊस धारा…”

– सुसिमा थोरात.

11/08/2022.

@All rights are reserved.

@Image source – Google.

*हरवलेली अंगणं*

*हरवलेली अंगणं*

आज माझ्या आजीचे एकविसावे पुण्यस्मरण.. आजीच्या आठवणीने डोळ्यात नकळत अश्रू तरळले….. त्याचबरोबर प्रकर्षाने आठवण झाली ती घरासमोरच्या अंगणाची… माझी आजी आणि आमचा नातवंडांचा बराचसा वेळ अंगणात जात असे. आमची आजी आम्हाला वेगवेगळ्या गोष्टी- गाणी या अंगणात बसून शिकवायची… स्वभावाने कडक शिस्तीची आणि करारी असणारी आजी, पूर्ण कुटुंबासाठी, घरादारासाठी राबली..नातवंडांवर संस्कार करायला राबली. अंगणात वेगवेगळी झाडे कडेने लावली होती… झाडांच्या सावलीत आम्ही खेळत असू.एकत्र कुटुंब पद्धतीमुळे, आम्ही आठ जण भावंड होतो. या अंगणाचा सहवास आम्हाला खूप काळ मिळाला. शाळेचा वेळ सोडला तर बराच काळ… उन्हाळ्यात जेवायला,अगदी झोपायला सुद्धा घरचे सारे लोक अंगणात असत.. छान शेणाने सारवलेल्या अंगणात मऊ स्पर्श आजही मला जाणवतो..अंगावर शहारे आणतो.या सुंदर अंगणात पावित्र्याचे प्रतीक असणारी सुंदर रांगोळी,माझी आई रोज तुळशी वृंदावना समोर रेखाटत असे… नंतर कित्येक दिवस ते काम मी खूप आनंदाने करत होते….कदाचित या रांगोळीत रंग भरण्याच्या सवयीमुळे मी माझ्या आयुष्यात छान रंग भरू शकले…

आज फ्लॅट संस्कृती आली, नोकरी कामाच्या निमित्ताने शहरात स्थायिक व्हावे लागते. तिथे कुठून येणार अंगण??? आजकाल म्हणून अंगणं हरवत चालली आहेत… काही वर्षांपूर्वी अंगण हे घराची शोभा असायचं.. खेडेगावात अजूनही अंगणाचे महत्त्व तेवढेच आहे. घरातील गृहिणी लवकर उठून सडा – रांगोळी करतात…

“फूठे क्षितिज तांबडे जोन थोडे,

तोच जागे होतसे सर्व खेडे,

उठून गृहिणी लगबग अंगणात,

सडा-सन्मार्जन करीत राहतात..”

या उक्तीप्रमाणे अंगणाचे महत्त्व आहे… पहाटे उठून सर्व मंडळी आपले आन्हिक उरकून कामाला लागतात. शहरात मात्र सूर्य केव्हा उगवतो? हेच समजत नाही.

बालपणीचे माझ्या अंगणाच्या आठवणी माझ्यासाठी अविस्मरणीय आहेत. मी त्या आठवणी अत्तराच्या कुपीत बंद करून ठेवल्या आहेत. माझ्या या अंगणाच्या आठवणींचा सुगंध नेहमी आयुष्यभर माझ्याभोवती दरवळत राहील.. वेगवेगळे खेळ आम्ही अंगणात खेळत असू. चंद्रप्रकाशात गाणी, गप्पा होत असतात. गाण्याच्या भेंड्या, कथा,पाढे पाठांतर, अशा किती आठवणी आमच्या अंगणा सोबत आहेत…. आमची आजी आम्हाला विविध संस्कार कथा सांगत असे. अंगणात छान तुळशी वृंदावन होते. त्याच तुळशी वृंदावनातील दिव्यासमोर आम्ही शुभंकरोती, गणपती स्त्रोत, मारुती स्त्रोत, पसायदान आणि रामरक्षा म्हणत असू. माझ्या घरच्या अंगणाने मला किंबहुना आम्हाला खूप काही दिले… माझ्यावर संस्कार केले, मला सोबत दिली. आमचं अंगण आमच्यासाठी एक शांत विसावा होतं…अंगण हे घराचं आभूषण होत…

आताच्या काळात ना एकत्र कुटुंब पद्धती राहिली, ना अंगणं…. फ्लॅट संस्कृतीत होणार कोंडमारा असह्य होत आहे.. तिथेच गॅलरीत छोट्या कुंड्या ठेवून, तुळस लावून,आम्ही अंगण शोधण्याचा प्रयत्न करतो.. पण घरच्या त्या अंगणातले सुख होते, ते जगातल्या कोणत्या फ्लॅटमध्ये मिळणार नव्हते.. हे कळून चुकले मला….

भविष्यात अंगणं किती उरतील?? हा ही एक संशोधनाचा प्रश्न!! पण अंगण हरवत चालले आहे! हे मात्र निश्चित.ती व्यक्ती खरच नशिबान असेल जिच्या घराला छान अंगण आहे….. तिच्यासाठी असणारा तो शांत विसावा आहे… घराची आणि कुटुंबाची सोबत असणारे,घराची शोभा असणारे व घराचे पावित्र्य जपणारे हे अंगण, प्रत्येकाच्या नशिबी असो हीच ईश्वर चरणी प्रार्थना!….

– सुसिमा थोरात.

28/07/2022.

@Image source – Google.

@All rights are reserved.

*हर घर तिरंगा*

*हर घर तिरंगा*

राष्ट्रध्वज आहे राष्ट्रीय प्रतीक, भारत देशाचे,

सन्मान राखून तिरंग्याचा, महत्त्व वाढवू तयाचे.

तिरंगा ध्वज संहितेचे, पालन आपण करूया,

झेंडा फडकविण्याचे नियम, सगळे मिळून पाळूया.

केशरी रंग प्रतीक त्यागाचे, वरती सर्वात असावा,

चुरगळलेला, फाटलेला तिरंगा कधीच नसावा.

सन्मानाने फडकवू तिरंगा, सलाम तयाला करूया,

सूर्योदयापासून – सूर्यास्तापर्यंत, फडकता ध्वज ठेवूया.

तिरंगा ध्वज आहे, सन्मान आपल्या भारताचा,

नका करू अच्छादनासम इमारतीच्या, वापर तयाचा.

‘हर घर तिरंगा’ अभियान आपूले, अभिमान तिरंगा आपूला,

राष्ट्रभक्ती अंगी बाणविने, आहे बाणा आपुला.

आदर्श या अभियानात, सामील सगळे होऊया,

उंचावेल भारताची जगात मान, कार्य असे करूया.

प्रत्येक घराघरात तिरंगा, अभिमानाने फडकवू या,

अमृत महोत्सव स्वातंत्र्याचा, साजरा आनंदाने करूया.

– सुसिमा थोरात.

24/07/2022

@Image source – Google.

@ All Rights are reserved.

*सांजवात*

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*●सांजवात ●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
*○सांजवात○*

तिन्हीसांज झाली होती. घरातल्या देवाला निरांजन लावले आणि मी गॅलरीत थोडा वेळ जाऊन उभी राहिले. अंधार पडायला सुरुवात झाली होती. गॅलरीतून समोर एक बंगला दिसत होता, त्या बंगल्यासमोर एक सुंदर वृंदावन होते. एवढ्या मोठ्या बंगल्याची शोभा ते वृंदावन वाढवत होते. छोटेसे असूनही रुबाबात उभे असणारे वृंदावन; त्या बंगल्याच्या असण्याला अर्थ प्राप्त करून देत होते.

दररोज वृंदावनासमोर एक दिवा तेवत असायचा… वाऱ्याची झुळूक आली की, त्याची ज्योत हळुवार हलत होती… रोज तिन्ही सांजेला तो दिवा पाहत राहणे; हा माझा नियमच झाला होता.. एवढ्या वाऱ्या- पावसातही आडोशाला तो तेवत होता… मला त्याच्या या गुणाचे कौतुक वाटले… दिव्यातील तेल असेपर्यंत अगदी निस्वार्थीपणे, निर्विकारपणे तो जळत होता.. आणि वृंदावनाची शोभा वाढवत होता.. अंधाराचे साम्राज्य नष्ट करून प्रकाश आणत होता….

माणसाच आयुष्य काहीस असच असावं नाही का? इतरांच्या आयुष्यात सुख- समाधान आणण्यासाठी अखंड प्राणज्योत मालवेपर्यंत कष्ट करावे, त्याच वेळी माणसाचा जन्म सार्थकी लागतो. जन्म आणि मृत्यू या दोन क्षणांमधील आयुष्य आपण स्वतःपेक्षा जास्त इतरांसाठी जगावं… अगदी या दिव्याप्रमाणे…. इतरांच्यासाठी आयुष्य वेचणारे कित्येक जण आज देशाच्या किंबहुना, जगाच्या इतिहासात अजरामर झालेत…असेच आयुष्य असाव इतरांच आयुष्य प्रकाशित करणारं….. स्वतःसाठी सारे जगतात, पण थोडं इतरांसाठी जगून पाहिलं, तर तो आनंद काही वेगळाच असतो… त्यासाठी अंतरीचा दिवा सतत ठेवायला हवा..

तुकाराम महाराजांनी म्हटलेच आहे नाही का..

” जे का रंजले गांजले,त्यासी म्हणे जो आपुले,

तोचि साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा.”

अंधार पडल्यावर प्रकाश आणण्यासाठी दिव्याप्रमाणे तेवणारे जीवन असावे… जसे की ‘बाबा आमटे’ ,’मदर तेरेसा , सिंधुताई सपकाळ…..अशी कितीतरी नावे आपल्याला सांगता येतील.. आपण आपल्या परीने प्रयत्न करत राहायचे, करता करविता परमेश्वर आपल्या प्रयत्नांना यश दिल्याशिवाय राहणार नाही…..

-सुसिमा थोरात.
12/07/2022.
@Image source – Google.
@All rights reserved.

🍃🌹🍃🌹🍃🌹 🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

*सुंदर हात…*

मागच्या आठवड्यात वर्गात सुंदर हातांच्या स्पर्धा होणार असे सांगितले होते. स्पर्धेची तारीख जवळ येत चालली… गुरुवारी स्पर्धा होणार होत्या माझी तर काहीच तयारी नव्हती… पहाटे लवकर उठले एकदा स्वतः स्वतःच्या हाताकडे पाहिले आणि मनात विचार केला… बाकीच्या माझ्या मैत्रिणीची तयारी झाली असेल का?? ‘सुंदर हातांच्या स्पर्धेसाठी’ …..

क्षणभर विचार केला आणि पटकन उठून अंगणात सडा सारवण टाकण्यासाठी शेण घेऊन आले आणि अंगण स्वच्छ झाडले, शेणाने सारवून घेतले, त्यावर सुंदर रांगोळी रेखाटली…अगदी मनाला हवे तसे मनाला भावतील असे सुंदर रंग रांगोळीत भरले…

आईचे जेवण बनवून झाले होते…चूल उकनली होती. ती व्यवस्थित लिंपली आणि सारवून घेतली. आईने जेवण बनवून खरकटी भांडी बाहेर आणून ठेवली. राखेने भरभर भांडी घासून ,धुवून घेतली… आईलाही मजुरीला जायचे होते. आंघोळ, देवपूजा वगैरे सर्व आवरून झाल्यावर सारवलेल्या चुलीला हळद-कुंकू वाहिले… अंगण किती छान दिसत होते आता..अंगणाच्या बाजूला असणारी चूल साक्षात अन्नपूर्णेचे चे प्रतीक होती….

आवरून, भाकरी – पिठले डब्यात भरून घेतलं.. आईने दोन छान वेण्या बांधून दिल्या चप्पल पायात सरकवली, दप्तर पाठिवर टाकून मी धावतच शाळेत निघाले… मनात विचारांची खूप गर्दी होत होती. स्पर्धेसाठी माझी काहीच तयारी नव्हती.. पंधरा मिनीटात शाळेत पोहोचले … वर्गात जाताच कानावर आवाज पडला… “माझी मेहंदी बघ ना! किती सुंदर आहे? नंबर तर माझाच येणार” वीणा बोलत होती. तोपर्यंत मुग्धा म्हणाली.. “माझे नेलपॉलिश बघ फॉरेन वरून मागवले आहे, माझ्या दीदीने पाचशे रुपयांचे! आहे, किती छान आहे नंबर तर माझाच येणार”!! अशी चर्चा चालू असताना, रोज पहिल्या बाकावर बसनारी मी आज शेवटच्या बाकावर कोपऱ्यात जाऊन बसले….

प्रत्येक मुलीने आपल्या हातावर सुंदर मेहंदी रेखाटली होती. छान नेल पॉलिश लावले होते. मी मात्र माझ्या काळवंडलेल्या हाताकडे बघतच राहिले.. नकळत माझ्या डोळ्यात पाणी उभे राहिले…. बाई वर्गात आल्या आणि त्यांनी स्पर्धा लगेचच होईल असे सांगितले.बाईंनी पहिल्या बाकापासून हात बघायला सुरुवात केली… सर्वांचे हात बघून झाल्यावर बाई माझ्या जवळ आल्या, माझ्या दोन्ही हातांनी मी चेहरा झाकून घेतला आणि स्फुंदू लागले …. बाई म्हणाल्या अनघा तुझे हात दाखव बरं… काय झालं??? मी उभे राहिले बाईनसमोर हात धरले ….माझे उन्हाने काळवंडलेले परिस्थितीने कृश झालेले हात बाईंनी बघितले आणि विचारले,” तू काहीच नाही का तयारी केली सुंदर हातांच्या स्पर्धेसाठी??”

मी धीर एकवटला,डोळे पुसले… मी बोलू लागले, “बाई आम्ही परिस्थितीने खूप गरीब आहोत, आम्ही छपरात राहतो,आई-बाबा मजुरीचे काम करतात. माझी आई मजुरीचे काम करत असल्याने मलाही घरी काम करावे लागते. जिथे आम्हाला पोटभर अन्न मिळत नाही, तिथे या सगळ्या वस्तू आम्ही कशा विकत घेणार?? शाळेत येण्यापूर्वी, शाळेतून गेल्यावर मला कामात मदत करावी लागते..मग अभ्यास करावा लागतो.. सकाळी लवकर आवरून सडा-सारवण करावे लागते. राखेने भांडी घासावी लागतात. परिस्थितीने काळवंडलेल्या सडा-सारवण करणाऱ्या, काम करणाऱ्या माझ्या हातांना लावायला मला कसं मिळणार नेल पॉलिश आणि मेहंदी??”

एवढे बोलल्यावर पुन्हा माझ्या डोळ्यातील अश्रुंचे थेंब पटापट माझ्या हातावर पडू लागले…. बाईंनी माझ्या खांद्यावर हात ठेवला. खूप आश्वासक स्पर्श होता तो…बाई पुढे गेल्या आणि म्हणाल्या या स्पर्धेचा निकाल आता मी जाहीर करणार आहे. सगळेजण शांत बसले. मुख्याध्यापिका मॅडम वर्गात आल्या सगळ्या मुली आतुरतेने निकालाची वाट पाहू लागल्या. प्रत्येकीला वाटत होते माझाच नंबर येणार ,मी स्पर्धा जिंकणार. मी मात्र यामध्ये कुठेच नव्हते. थोड प्रास्ताविक उरकून बाईनी निकाल जाहीर केला…” या स्पर्धेची विजेती आहे अनघा अनिल जाधव” सगळ्या मुली डोळे विस्फारून, आश्चर्याने पाहू लागल्या.. बाईने मला पुढे बोलावले आणि स्पर्धेचा चषक मुख्याध्यापिका मॅडम कडून मला बहाल केला.

बाई बोलू लागल्या,” नेल पॉलिश आणि मेहंदी लावून हात कधीच सुंदर होत नसतात, सुंदर हात होण्यासाठी कष्ट करावे लागतात… सडासारवण करणारे हात.. सुंदर रांगोळी काढणारे हात.. चूल लिंपणारे हात.. अन्नपूर्णेची पूजा करतात.. सुंदर हस्ताक्षर काढतात.. तेच हात सुंदर असतात.. अशा सुंदर हातांचे स्पर्धेत अनघा विजय ठरली आहे ,तर त्यात नवल काहीच नाही.. तिचे मनापासून अभिनंदन.. आपण प्रत्येकाने सुंदर हात बनवायला हवेत… कष्ट करून… बाई थांबल्या,टाळ्यांचा कडकडाट झाला. आज खऱ्या अर्थाने किंबहुना सर्वार्थाने सुंदर हात कसे असतात ,हे मला समजले होते आणि उमगलेही…..

– सुसिमा थोरात

@Image source – Google

@ All rights are reserved.

https://susima.home.blog/2022/06/17/सुंदर-हात/

*ती अबोली…*

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*● *ललित लेख*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹

मागच्या पावसाळ्यात मी माझ्या अंगणातल्या परसात अबोलीच एक छान रोप लावलं….परसबागेत अनेक रोपे लावली, पावसाळ्यात त्या रोपट्यांना पाणी देण्याची गरज भासली नाही… पावसाच्या पाण्यावर ती रोपे छान तरारून वर आली… पावसाळा संपल्यावर मात्र त्यांना पाणी घालण्याची गरज भासू लागली..त्यानंतर मात्र एक आड एक दिवस पाणी घातल्यावर ते कुंडीतील रोपटे चांगले वाढू लागले… वाऱ्याची झुळूक आली की ते वाऱ्याबरोबर भुर भुरायचे, वाऱ्याबरोबर डोलायचे…. या वर्षीच्या उन्हाळ्यात त्या अबोलीच्या बारीक कळ्या वर दिसू लागल्या.. काही दिवसातच खूप छान पिवळ्या रंगाची नाजूक फुले त्या रोपट्याला आली…

उन्हाच्या झळा वाढत होत्या.. उन्हानं अंगाची काहिली होत होती… उन्हाच्या झळामुळे ते रोपटे मलूल होऊ लागले.. उन्हाच्या तडाख्याने ती फुलेही कोमेजू लागली… पाने पिवळी पडू लागली.. मी त्या रोपाला हलकासा पाण्याचा शिडकावा दिला…तसे ते रोप एकदम शहारुन निघाले.. गार पाण्याच्या थेंबाच्या होणाऱ्या शिडकाव्याने ते खुप खुप सुखावलं.. पुन्हा टवटवीत झालं ..आणि ते छान गालातल्या गालात हसू लागल…आता मात्र मी ठरवलं होतं त्या रोपाला दिवसातून दोन वेळ पाणी घालायचं…परसातील सर्व झाडांना पाणी घालून झाल्यावर पुन्हा मी त्या रोपाला पाणी घालायचे… दिवसातून दोन वेळा पाणी दिल्यावर ते रोपटे अधिकच तरारू लागलं, बहरू लागलं…. एक दोन म्हणता-म्हणता फुलांनी बहरून गेलं.. सुखावलं.. या रोपालाही आपली फुलं पाहून मनातून खूप आनंद झाला.. ते रोपही आपली फुले पाहून सुखावल…

मनात विचार आला माणसाच्या आयुष्याचही असंच काहीसं असावं नाही का??? माणसाच्या आयुष्याला ही प्रेमरूपी पाण्याचा शिडकावाची मायेची आपुलकीची आणि जिव्हाळ्याची गरज असते.. तरच ते मानवी आयुष्याचे रोपटे बहरेल… आपण लावलेल्या रोपाला आपण दिलेल्या प्रेमरूपी पाण्याने, आपुलकीच्या निगराणीमुळे आलेली सुंदर फुले खरच खूप सुंदर आणि मनमोहक … असतात..आनंद देणारी असतात.. असच काहीसं असतं माणसाच आयुष्य.. त्याला दिलेल्या प्रेमरूपी पाण्याच्या शिडकाव्याने, निगराणीमुळे माणसाच्या आयुष्याचे रोपटे बहरेल.. सर्वांना आनंद देईल..बघणाऱ्यालाही आनंद देईल… दाही दिशांना सुगंधाची उधळण करेल… मनाला प्रसन्न बनवेल… तरच त्या रोपाला सुंदर आणि मनमोहक फुले येतील आणि सर्वांना आनंद देतील.. अबोल आणि शांत राहून ती अबोली किती मदमस्तपणे आयुष्याचा आनंद घेत होती… तसाच आनंद आपल्या आयुष्यात आपल्याला घेता येईल…अगदी मनमुरादपणे… पण त्यासाठी हवे असणारे प्रेम परमेश्वराने कोणाच्या ना कोणाचा रूपाने आपल्या प्रत्येकाच्या आयुष्यात नक्की पाठवावे.. मग सर्वांचेच आयुष्य किती सुंदर आणि शांत होईल, छान होईल…अगदी त्या मनमोहक अबोलीप्रमाणे…..

-सुसिमा थोरात.

*ती अबोली…*

@All rights are reserved

19/04/2022
🍃🌹🍃🌹🍃🌹 🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯