हिंदू मराठी नववर्षाचा प्रारंभ म्हणजे , चैत्र शुक्ल प्रतिपदा अर्थात ‘गुढी पाडवा’. असं म्हणल जात कि हजारो वर्षांपूर्वी राम रावणाचा पराभव करून वनवासातून परत आल्यावर त्याचे स्वागत, तो आल्याचा आनंद म्हणून प्रत्येकाच्या दारात गुढी उभारून ‘गुढी पाडवा’ हा सण साजरा केला जातो.
निसर्ग सौंदर्यांने नटलेला असतो, सगळ्या निसर्गात चैतन्य फुललेले असते, सर्व झाडांना पालवी फुटलेली असते, वसंत ऋतूच्या आगमनाने सृष्टी प्रफुल्लित झालेली असते, बहरून आलेलं ते निसर्गाचं रूप गुढी पाडव्याच्या सणाने अजूनच रम्य होते, ती थंड पहाट, तो पक्षांचा किलबिलाट ते कोकिळेचे कूजन हा अनुभवच हवाहवासा वाटणारा आहे….
गुढीला नवी साडी, साखरेची माळ, ते कडूलिंबाचे पान त्याचा तो मान, तो कलश ती फुलांची माळ, ती काठी, ती उंच उभारली जाणारी गुढी हे विजयाचेच प्रतीक मानले जाते. हे मराठी नववर्ष सर्वाना सुखाचे, समाधानाचे ,आरोग्याचे आणि आनंदाचे जावे, जुने दुरावे आणि रुसवे फुगवे विसरून एक नवी सुरुवात अगदी निसर्गप्रमाणेच आपणही करण्यासाठी हि एक छान वेळ आहे. हा एक असा सण आहे की जो चैतन्य घेऊन येतो आणि मरगळहि दूर करतो, उत्साहाला उधाण आणणारा ‘गुढी पाडवा’ हा सण आपल्या सर्वांच्या आयुष्यात खूप सुखसमृद्धी आणि भरभराट घेऊन येवो. हि ईश्वराला प्रार्थना…
सुसिमा







