“आई हरवत चाललीय……”

“स्वामी तिन्ही जगाचा आईविना भिकारी”

आईविना जगणाऱ्या पोरक्या लोकांचं विदारक वर्णन कवी यशवंत यांनी खूप यथार्थपणे आपल्या कवितेत मांडलं. आईविषयी किती लिहावं?आत्म्यातील ईश्वर असणारी ही तीच, निस्वार्थी, निर्मळ मनानं असंख्य वेदना सोसून स्वतःच्या जीवात जीव असेपर्यंत लेकराला आधार देणारी आई….

कवी फ.मु.शिंदे म्हणतात,

‘आई म्हणजे काय असत?

घरातल्या घरात गजबजलेलं गाव असत.’

आई म्हणजे काय असते, दुधावरची साय असते, वासराची गाय असते, लंगड्याचा पाय असते, लेकराची माय असते….

आईविषयी खूप लिहलं गेलं… आईच नातं आहेही असंच. एक काळ होता ज्यावेळी श्यामची आई घडली, मॅक्सिम गऑर्कि ची आई झाली, त्या दोघींना शतशः नमन. साने गुरुजींनी खूप भाऊकतेने , हळुवारपणे आपल्या आईचे वर्णन श्यामची आई या पुस्तकात केले , अशी आई होणे विरळच.आपल्या मुलावर संस्कार करणारी, त्याला चांगले वळण लावावे म्हणून धडपडणारी, प्रसंगी कुंभारप्रमाणे वरून धपाटा घालून आत मायेचा आधार देणारी, मुलाच्या चुकांवर पांघरून न घालता, त्याला परखडपणे सूनवणारी ‘श्यामची आई’. ‘मातृदेवोभव:’ असे आपली भारतीय संस्कृती आहे. प्रसंगी स्वतः उपाशी राहून आपल्या मुलांना जेवायला घालणारी आई, मुलांसाठी तनमन अर्पण करणारी आई, कोंड्याचा मांडा करून खायला शिकविणारी आई, पाटी पेन्सिल घेऊन ‘श्री गणेशा’ शिकविणारी आई…अशी किती रूप सांगावी आईची. आई म्हणजे परमेश्वराचा अवतारच!!!

‘स्त्री ही क्षणाची पत्नी आणि अनंतकालची माता’

असं म्हणल जातं. आईची मुलगी , मैत्रीण, वडिलांची राजकुमारी, लग्न झालं की ती नवऱ्याची पत्नी बनते, प्रेयसी बनते, बहीण बनते, काळजी घेणारी आई बनते, सहधर्मचारिणी बनते, अर्धांगिनी बनते अशी कित्येक नाती ती एकावेळी निभावते. पण म्हणतात काळ बदलत चालला आहे , या बदलत्या काळाप्रमाणे आईचीही रूप बदलली तर त्यात नवल ते काय??? पर्यायाने आईचे प्राधान्यक्रम हि बदलले. खरच हि आई आहे का??कि कृत्रिम आई आहे याचा साकल्याने आणि प्रकर्षाने विचार करण्याची गरज वाटू लागली आहे.

मुलाला जन्म देणारी जन्मदात्री आज सुरवातीला आईपण नकोच म्हणतेय, नैसर्गिकरित्या मुलाचा जन्म नाकारतेय, आजची आई आईपण मिळवण्यासाठी वेदना सोसायला तयारच नाही, आयतच नावाचं मातृत्व तिच्या पदरात पडतंय. पुढची गोष्ट म्हणजे जन्म दिला सिझरीयन करून, तरी स्वतःच सौन्दर्य, फिगर आणि maintaince सांभाळण्यासाठी ती मुलाला दूधही पाजायला तयार नाहीये, मुलाला सांभाळायला हि तयार नाहीये.मुलाला संभाळण्यासाठी आया ठेवली जातेय, आजची आई मुलाच्या तोंडात दुधाची बाटली देऊन त्याला पाळणाघरात किंवा आयाच्या ताब्यात देऊन करियर करायला निघते.बाबा अगोदरच गेलेले असतात.अशी तंग कपडे घालून फिरणाऱ्या उथळ आईच आज आईपणच निसर्ग हिरावून घेतोय, तर त्यात नवल ते काय????

” बाळ म्हणत आई मला पदरात घे,

आईच्या टी शर्ट ला पदरच नाय….”

अशी आजच्या मुलाची अवस्था करून टाकली आहे, मोठे होऊन लग्न झाल्यावरही सुना बाळांना पोटच्या पोरीपेक्षा जास्त जपणारी, त्यांच्यावर आईपेक्षा जास्त माया करणारी आई एका बाजूला असते तर दुसरीकडं स्वतःच्या मुलाचे कान भरून, तिचा छळ करून,संसार मोडणारी, तिला शत्रू मानणारी आई असते.एकिकडे मुलींचा संसार सुखी व्हावा म्हणून मुलीला चार गोष्टी सूनावणारे आई बाबा असतात, तर दुसरीकडे मुलीच्या संसारात हस्तक्षेप करून सासरच्या गरीब माणसांना वेठीस धरणारी हि आईच.एकीकडे स्वतःचा मुलगा चुकला तरी त्याला च शिक्षा करणारी आई दुसरीकडे मुलाच्या चुकांवर पांघरून घालून इतरांना दोषी ठरवणारी आई…..अशी किती उदाहरणे द्यावी????

पुराणकाळात आईचे माहात्म्य खूप सांगितले आहे, मुलाला थोडं खरचटलं तरी काळीज पिळवटून जाणारी आई,…आज मुळात आई राहिलीच नाही, ती आता आधुनिक ‘मम्मी ,’मॉम’ झाली आहे,

‘आईची झाली मम्मी , बाबाचे झाले डॅड्डी,

कोण घडवणार आता पुढची पिढी???’

समाजाची आईविषयीची मानसिकता काळाबरोबरच बदलत चाललीय हेही खरच… मुलांसाठी सर्व सुखाचा त्याग करणारी आई हि आज फक्त आपल्या सोयीचा विचार करतेय, याला अपवाद काही आहेतही. पण वर मांडलेलं कटू आणि विदारक सत्य नाकारून चालणार नाही.आज मुलाच्या जखमेवर हळुवार फुंकर घालणारी, बाळाला चिऊ काऊ च्या गोष्टी सांगून दूध भात भरविणारी, मायेने संस्कार श्यामच्या आईप्रमाणे संस्कार घडविणारी, मुलाला कुशीत घेणारी, त्याला हाताला धरून पहिलं पाऊल स्वतंत्रपणे टाकायला शिकविणारी, जिजाऊप्रमाणे शिवबा घडविणारी आई, पैशांच्या मागे लोभी न बनता आहे त्यात धन्यता मानणारी, कोंड्याचा मांडा करून खायला शिकविणारी, ‘आई ‘ हरवत चालली आहे………

‘अंधार पडलाय एक पणती पाहिजे,

समाजाला घडविणारी जननी पाहिजे,

शिवबा घडविणारी जिजाऊ पाहिजे,

श्याम घडविणारी श्यामची आई पाहिजे’.

—-सुसिमा .

https://susima.home.blog/2019/05/12/आई-हरवत-चाललीय

‘जीवनसंगिनी’ : खूप छान आहे मी…..

साद घालणाऱ्या सख्यासाठी प्रतिसाद आहे मी,

कवितेत रमणाऱ्या कवीची सुरेल कविता आहे मी,

धुंद करणाऱ्या रातराणीचा सुगंध आहे मी,

आजमावून पहा, खरचं खूप छान आहे मी.

वाट पाहत्या चातकासाठी पावसाचा थेंब आहे मी,

तप्त धरणी तृप्त करणारी सर आहे मी,

होरपळल्या जीवाला सुख देणारा गारवा आहे मी,

आजमावून पहा, खरचं खूप छान आहे मी.

प्रतिबिंब स्वतःचे पाहणाऱ्या आईची प्रतिमा आहेमी,

सावळ्या त्या मुरलीधराची राधा आहे मी,

जीव लावणाऱ्या जिवलगाचा प्राण आहे मी,

आजमावून पहा, खरचं खूप छान आहे मी.

कुंजणाऱ्या कोकिळेची सुरेल तान आहे मी,

निराश झालेल्या मनासाठी वेडी आशा आहे मी,

एकट्याने वाट कंठणाऱ्याची सोबती आहे मी,

आजमावून पहा, खरचं खूप छान आहे मी.

मनाच्या वेदनेसाठी सुखद फुंकर आहे मी,

संघर्ष करणाऱ्या प्रत्येकासाठी प्रेरणा आहे मी,

पावलोपावली सोबत करणारी जीवनसंगिनी आहे मी,

आजमावून पहा, खरचं खूप छान आहे मी.

– सुसिमा .

https://susima.home.blog/2019/05/12/जीवनसंगिनी-खूप-छान-आहे-मी/

Smile Please…..☺️

‘Smile’ हा फक्त पाच अक्षरी शब्द आहे,पण खूप मोठा गर्भित अर्थ या शब्दात सामावला आहे.जीवनाचं सारं सार हा शब्द आपल्याला थोडक्यात सांगून जातो.आजकाल व्हाट्स अँप, फेसबुक यासारख्या अनेक सोसिएल मीडिया मुळे ,संगणकामुळे, मोबाइलला मुळे जग खूप जवळ आले आहे.पण माणूस मात्र एकमेकांपासून दुरावला आहे.आयुष्य खूप वेगात जात आहे,कि कळतही नाही अखेरचा क्षण आला आहे.

प्रत्येकजण ताण-तणावात वावरत आहे, प्रेमाची, वात्सल्याची, जिव्हाळ्याची, विश्वासाची आणि आपुलकीची थंड गारवा देणारी हिरवळ आपल्यातून नष्ट होत चालली आहे. जो तो पैश्यांच्या मागे धावत आहे, पैश्यांमुळे सगळीच नाती, तत्व, नीतिमूल्ये पायदळी तुडवली जात आहेत, प्रेम हरवत चाललं आहे, विश्वास हरवत चालला आहे, तत्व नष्ट झाली, आत्मसन्मान संपला…

अशी परिस्थिती असूनही जीवन आनंदात जगण्यासाठी आणि आयुष्य एक छान संगीत बनवण्यासाठी खूप विश्वसनीय, गुणकारी आणि रामबाण उपाय म्हणजे ‘smile’ आपण आपल्या आजूबाजूला पाहतो लहान मुलं किती गोड हसत असतात, त्यांचं ते निरागस हसण सर्वानाच हवहवसं वाटत. दिवसभरात कितीतरी वेळा ती मनमोकळं हसतात आणि रडतातही.पण जसजसे आपण मोठे होऊ आपण वेगवेगळ्या गोष्टीचे टेन्शन घेत राहतो आणि आपल्या जीवनातील हास्य गमावून बसतो, आपलं आयुष्य दुखमय करतो.आयुष्य आनंदी करण्याचा उत्तम उपाय म्हणजे ‘हास्य’. दुःख असो व सुख, कुणी प्रेम करो वा राग, कुणी आदर करो वा अपमान, सर्वांवर एक परिपूर्ण आणि योग्य प्रतिक्रिया म्हणजे ‘smile😊’ ज्यामुळे आपली त्या सर्व कडवट भावनामधून आणि ताणामधून बाहेर पडण्यासाठी, तटस्थ राहण्यासाठी मदत करते. प्रत्येक बऱ्यावाईट प्रसंगांमधून सकारात्मक ऊर्जा मिळविण्यासाठी हि ‘smile’खूप मदत करते, चेहऱ्यावर येणारे हलकेसे हसू आपल्याला पुन्हा त्या प्रसंगातून सावरून नव्याने जगण्याचे बळ देते. एकट्यात असो वा कुणी अनोळखी व्यक्ती भेटल्यावरही त्यातून जाणवणाऱ्या ओळखीची ‘smile’ हि मनांमनाचा दुवा जोडून देते, आपलेपणा वाढवते.

म्हणून आयुष्यात कितीही संघर्ष ,दुःख ,बिकट वाट आली, तरीही त्याचा आनंदाने स्वीकार करा, कितीही दुःख देणारी, अपमान करणारी वाईट मांणस भेटली, तरी त्यांचा धिक्कार करू नका,त्यांची शिक्षा नियती त्यांना देत असते, या ना त्या रूपाने. चक्र पूर्ण होत असते,म्हणून हसत राहा.हसण हा एक सुंदर दागिना आहे जो विकत मिळत नाही आणि कोणाच्याही चेहऱ्यावर शोभुन दिसतो. जीवन सुंदर जगण्यासाठी, आनंदी राहण्यासाठी, आपल्यावर प्रेम करणाऱ्या माणसांना आनंदी ठेवण्यासाठी ,सतत हसत राहा खळखळून हसा,☺️.10 मिनिटे व्यायाम करून हृदयाला जेवढा व्यायाम मिळतो तेवढा एक मिनिट हसल्याने मिळतो, असे कुणीतरी म्हणले आहे ते खरेच आहे. हिटलरने सुद्धा सांगितले आहे “ज्या दिवशी आपण हसलो नाही तो आपल्या आयुष्यातील वाया गेलेला दिवस,” म्हणून हसत राहा. दुःखी कष्टी, सुतकी चेहऱ्याने दुःख देणाऱ्या माणसात राहण्यापेक्षा तिथून दूर राहा ,ताणतणाव, दुःख उगाळत बसण्यापेक्षा हसत राहा, आनंदी राहा.आजकाल हसण्यासाठी खूप ठिकाणी हास्य क्लब ची स्थापना केलेली असते, तिथे जॉईन नाही होता आलं तरी एक अस संगीत निर्माण करा जे आयुष्यभर आपल्याला हसवत ठेवेल,जसा दिवा तेवत ठेवण्यासाठी तेल मदत करते तसेच हा सुंदर हसण आपल्या आयुष्याचा दिवा अखंड तेवत ठेवेल…. स्वतः हसा इतरांनाही हसवा आणि नेहमी म्हणा… smile please……☺️

इस बात पे एक smile तो बनती है boss……☺️

– सुसिमा .

https://susima.home.blog/2019/05/07/smile-please-☺️/

मंगल देशा, पवित्र देशा…..

बहू असोत सुंदर संपन्न कि महा,

प्रिय अमुचा एक महाराष्ट्र देश हा.

महाराष्ट्राबद्दल,आपल्या या जन्मभूमीबद्दल गौरवोद्गार काढण्यासाठी असे कितीतरी शब्द, अशा किती ओळी आणि अशी कित्येक गीते अपुरीच पडतील. संत ज्ञानेश्वर, संत एकनाथ, संत तुकाराम , संत मुक्ताई, संत जनाबाई यांच्या महान विचारांचा आध्यात्मिक वारसा आपल्या या महाराष्ट्राला लाभला आहे.

सह्याद्रीच्या कुशीत निवांतपणे पहुडलेला महाराष्ट्र, कोकणच्या निसर्गरम्य निसर्गसौन्दर्याने नटलेला महाराष्ट्र, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमाने आणि पावन पदस्पर्शाने पवित्र झालेला महाराष्ट्र, छत्रपती संभाजी महाराजांच्या अतुलनीय पराक्रमाने उत्तुंग असा इतिहास निर्माण झालेला महाराष्ट्र.

अजिंठा वेरूळ लेणी, कृष्णा, येरळा अशा नद्या विविध गड , किल्ले, रायगड, राजगड , समुद्री किल्ले अशा विविध ऐतिहासिक पर्यंटनस्थळांनी आपला समृद्ध वारसा आपल्या मराठमोळ्या महाराष्ट्रात जपला आहे. मराठी ही आपली मातृभाषा कोसाकोसावर वेगळं वेगळं बोलीभाषेच रूप दाखवते.

१ मे १९६० या दिवशी महाराष्ट्र राज्याची स्थापना झाली.तोच दिवस कामगार दिन म्हणून साजरा केला जातो. विविधतेत एकता आपल्या महाराष्ट्राने जपली आहे, विदर्भ , मराठवाडा , खानदेश, कोकण, मध्य महाराष्ट्र या भागातील वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये वेगवेगळी जीवनशैली असूनही एकोपा आणि माणुसकी खूप प्रकर्षाने जाणवते…..

म्हणूनच म्हणावेसे वाटते

जय जय महाराष्ट्र माझा ,

गर्जा महाराष्ट्र माझा.

-सुसिमा

https://susima.home.blog/2019/05/02/मंगल-देशा-पवित्र-देशा/

सांग कधी येशील???

पाहते आहे वाट तुझी सख्या, किती अंत पाहशील?

घेण्या कवेमध्ये मला, सांग कधी येशील??

आगीत एकटेपणाच्या आहे होरपळत मी,

विरहात तुझ्या क्षण क्षण कंठते जीवन मी.

जीवलगांची झाली वाणवा दुनियेच्या दारात,

नाहीच द्यावस वाटत स्थान कोणाला उरात.

फिरवून हात डोक्यावर, डोळ्यात पाहशील का??

दुःख मनीचे माझ्या हृदयाने जाणशील का??

चुंबूनी कपाळ माझे, जवळच राहशील का??

देउनी पाठीवर थाप , बळ मला देशील का??

नको जगात दुसरे काही , आधार देशील का??

साद घालते आर्त राधा प्रतिसाद देशील का,??

प्रेमाने जिंकते जग , फक्त प्रेमच देशील का??

नको काही प्रलोभने, फक्त जवळ घेशील का???

-सुसिमा .

https://susima.home.blog/2019/04/26/सांग-कधी-येशील/

बॅड पॅच हवाच……

खूप वाईट वाटत आपल्याला जेंव्हा आपल्या मनाला दुःख होत..मनाविरुद्ध आणि हवं तस लोक आपल्याला वापरतात…आपली मानहानी करून ,आपला आत्मसन्मान धुळीला मिळवतात, आपल्याला गृहीत धरतात,…..आपल्यावर मोठी संकट कोसळतात, खूप प्रयत्न करूनही अपयश पदरात पडत, कुणीतरी अचानक फसऊन जात….

असे बॅड पॅच आयुष्यात सारखे नाहीत, पण येत असतात, कुणाच्या आयुष्यात जास्त वेळा तर कुणाच्या आयुष्यात ते कमी वेळा येऊन जास्त काळ राहतो…त्याच काळात आपली खरी परीक्षा असते. त्या काळात आपण त्या बॅड पॅच बरोबर कसा सामना करतो हे ज्याचे त्याचे कौशल्य आणि आत्मविश्वासाचा भाग आहे…

पण हाच आपल्या आयुष्यातील संघर्षाचा क्षण असतो, जो स्वतःला सिद्ध करून दाखवायला , झुंजायला शिकवतो, स्वतःची स्वतःला ओळख नव्याने पटवून द्यायला कारणीभूत ठरतो, आत्मविश्वास वाढवतो व पुन्हा एकदा जगण्याचं बळ देतो….

बॅड पॅच माणसाच्या आयुष्यात यावा असं मला तरी वाटत, तरच माणूस प्रगती करेल.. या काळात माणसाला आपलं कोण व परक कोण याची ओळख होते, आपण संकटात असताना कोण आपल्यासोबत उभे राहते याची जाणीव होते, आपला कुवतीची कल्पना येते, आपण एक उंच भरारी करण्यासाठी हाच संघर्षाचा काळ आपल्याला मदत करतो , जगात स्वतःची ओळख निर्माण करून देतो, जीवनाला कलाटणी देतो, म्हणून खरच वाटते, आजपर्यंत जे मोठे आदर्श लोक घडले ते फक्त आणि फक्त त्यांच्या आयुष्यातील बॅड पॅच मूळे,’ संघर्षाविना जीवन निरस,पठारावस्थेसारखे व बेचव होईल’…… म्हणून बॅड पॅच हवाच, या काळात स्वतःशी प्रामाणिक राहा,… त्याच्याकडे नकारात्मकतेने पाहू नका, सकारात्मकतेने पहा,……एक दीर्घ श्वास घ्या, बाहू थोपटून संकटांचा सामना करण्यास उभे राहा आणि म्हणा ‘B positive’…… ‘Yes I can do it’..…

–सुसिमा पाटील, पुणे

बॅड पॅच हवाच……

तो पहिला पाऊस होता…..

अश्रूंचा माझ्या बांध फोडणारा,

जखमेवर हळुवार थंड फुंकर घालणारा,

तो पहिला पाऊस होता…..

वेदना मनाची जाणवून देणारा,

कुठेतरी विसावा शोधायला लावणारा,

तो पहिला पाऊस होता…..

तप्त धरणी तृप्त करणारा,

होरपळल्या जीवा त्या न्हाऊ घालणारा,

तो पहिला पाऊस होता…..

मनाचं मळभ दूर करणारा,

तनमन तृप्त करणारा,

तो पहिला पाऊस होता……

सखीस मूक साद घालणारा,

सजनाची याद करून देणारा,

तो पहिला पाऊस होता…..

मुखकमलास या हळुवार चुंबणारा,

डोळ्यातील आसवे वाहून नेणारा,

तो पहिला पाऊस होता…..

हात सखीचा हातात घेणारा,

सोबत तुझी हवीच म्हणणारा,

तो पहिला पाऊस होता……

-सुसिमा .

https://susima.home.blog/2019/04/14/तो-पहिला-पाऊस-होता/

स्त्री जन्मा हि तुझी कहाणी…

‘स्त्री’ परमेश्वरानं निर्माण केलेली अप्रतिम आणि सुंदर कलाकृती. तिच्याविषयी किती लिहावं आणि किती नको हाही मोठा यक्षप्रश्नच आहे??? तीच आई , तीच पत्नी, तीच बहीण, तीच सखी, तीच मैत्रीण, तीच संसाराचं चाक, तीच अर्धांगिनी आणि तीच सहधर्मचारिणी…. असं असतानाही हा समाज, हि कुटुंबव्यवस्था तिला कोंडमारा करून मारण्याचा प्रयत्न करते, चूल आणि मूल या रिंगणात तिला नाचवते. पूर्वीच्या काळी परिस्थिती बिकट होती, तीच जगण म्हणजे क्षणोक्षणी मरण असायचं, तिला शिक्षणाचा हक्क नव्हता, सतीप्रथा होती, तिला घरात, समाजात कोणतंच स्थान नव्हतं..तिला मान वर करून बघण्याचा देखील अधिकार नव्हता..त्या पुरुषप्रधान संस्कृतीत तिला एक उपभोगाच साधन यापलीकडे काहीच किंमत नव्हती पर्यायाने ती सुरक्षित नव्हती.

आता मनात विचार येतो कि आज तरी स्त्री सुरक्षित आहे का??तर प्रश्नाचं उत्तर मी तरी नाही असेच देईन..कारण आपण नाण्याची एक बाजू पहा, आज स्त्रियांनी कित्येक क्षेत्रे पादाक्रांत करत अवकाशात झेप घेतली आहे… महिला आज राष्ट्रपती झाल्यात, डॉक्टर झाल्या, इंजिनीअर आहेत, शिक्षिका आहेत, अंतराळवीर झाल्या , कलेक्टर झाल्या, पायलट झाल्या एवढंच नव्हे तर जगातील प्रत्येक क्षेत्रात आपला ठसा उमटवला तोही सर्व संकटावर जिद्दीने मात करून. अशी जरी नाण्याची एक बाजू असेल तरी दुसरी बाजू खूप दयनीय आणि खूप साकल्याने विचार करण्यासारखी आहे. आज स्त्री मुक्ती वर भाषण केली जातात, रॅली काढल्या जातात, व्याखान दिली जातात पण तरीही आजची स्त्री स्वतंत्र आहे का?? आज समाजात तिचे स्थान सुरक्षित नाही…’पिता रक्षते: कौमार्य, पती रक्षते: यौवन , पुत्र रक्षते: वार्धक्य’ असे म्हणले जाते.

आज सावित्रीबाई फुले आणि ज्योतिबा फुले यांच्या अथक परिश्रमाने आज स्त्रियांना शिक्षणाचा मूलभूत हक्क प्राप्त झाला. कुमारवयापर्यंत तिला चांगले सांभाळून तिचे शिक्षण पूर्ण करून विवाह करण्याची जबाबदारी हि वडिलांकडून पार पाडली जाते..तोपर्यंत वडीलच तिची सर्व जबाबदारी घेतात, पण जेव्हा ती विवाहाच्या बोहल्यावर चढते तेंव्हा ती तिच्या पतीची जबाबदारी बनते.पण लग्न झाल्यावर सासरच्या माणसाकडून तिला कशी वागणूक दिली जाते, त्यावरच तीच संपूर्ण तारुण्य अवलंबून असते.. आज आपण समाजात पाहतो कि कित्येक हुंडाबळी आजही जात आहेत, कित्येक विवाहिता सुशिक्षित असूनही त्यांना घरात कसलच स्थान नसत, तिचा काही ना काही कारणावरून सतत शारीरिक व मानसिक छळ केला जातो, तिचा कोंडमारा होतो, तिला लवकर स्वीकारलं जात नाही, तिचे पंख छाटून तिला उडायला सांगितलं जातं. घरात सासू पटवून घेत नाही, एक स्त्रीच एका स्त्रीची शत्रू बनते, तिच्या आईवडिलांना वेठीस धरले जातं, असा तोंड दाबून बुक्क्यांचा मार सुरु होतो. जेंव्हा सासरचे लोक तिचा छळ करतात आणि त्याचवेळी जर तिचा नवरा तिच्या बरोबर नसेल तर त्यासारखे मोठे दुःख नाही. त्यावेळी तिचे हाल कुत्रे हि खात नाही. तीचं जगणंच अवघड होऊन बसत..आजही स्त्रीला,तिच्या शिक्षणाला सन्मान दिला जात नाही..तिला समजून घेतलं जातं नाही, सासुरवास केला जातो, तिच्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी तिला संघर्ष करावा लागतो, सगळ्यांचा विरोध पत्करून ती सासरच्या उंबऱ्याबाहेर पडते, हे असे जरी असेल तरी अजून स्रीयांवरील अत्याचार कमी झाले नाहीत, समाजात तिचे स्थान सुरक्षित नाही, तिचा फायदा घेण्यासाठी हजारो लांडगे टपून बसलेले असतात. तिथेही ती त्यांचा प्रतिकार करू शकत नाही. आज कायद्याने स्त्रीला सर्व संरक्षण दिले असले तरी स्त्री त्याचा आधारही ती घेऊ शकत नाही. हा सगळा प्रकार पाहता आज समाजात सर्व स्तरात मुलगी नको अशी मानसिकता तयार झाली तर त्यात नवल ते काय?? मुलगी ला जन्म देऊन, तिला मोठं करून शिक्षण देऊन तिला स्वावलंबी बनवून जर अशी तिची अवस्था असेल तर तिचा जन्मच नकोस वाटतो. आज गोठ्यात गाय जन्माला आली तर आनंद साजरा करतात, अंड्यातून कोंबडी बाहेर आली तर देव पावला म्हणतात, मग मुलगीचा जन्म नको का?? पूर्वी जात्यावर दळण दळणाऱ्या आणि ‘स्त्री जन्म म्हणुनी न व्हावे उदास’ असं सांगणाऱ्या संत जनाबाईपासून ते ‘स्त्री पुरुष तुलना’ लिहणाऱ्या ताराबाई शिंदे पर्यंत प्रगल्भ आणि परिपक्व विचारांचा वारसा आपल्या भारतीय समाजाला लाभला आहे, आज विचार केला की समाजात स्वतःच स्थान निर्माण करणाऱ्या कित्येक स्त्रियांना खूप वाईट वागणूक त्यांच्या घरच्या लोकांनी दिली यामध्ये सिंधुताई सपकाळ यांचं जिवंत उदाहरण देता येईल. यमुची कादंबरी लिहणाऱ्या ‘ह. ना. आपटे नि स्त्री च्या केल्या जाणाऱ्या विदारक छळाच वर्णन त्यांच्या कादंबरीत खूप आत्मीयतेने केलं आहे, तसेच ‘चितेवरच्या कळ्या’ या कादंबरीत वसंत गायकवाड यांनीही स्त्रीच अत्यंत वाईटपणाने मिळणार मरणाच्या कहाण्या लिहल्या आहेत. समाजात आदर्श निर्माण करणाऱ्या महिलांमध्ये मदर तेरेसा, पी.टी. उषा, लक्ष्मी स्वामिनाथन, प्रतिभाताई पाटील,कल्पना चावला, सुनिता विल्यम्स अशी खूप मोठी यादी यशस्वी स्त्रियांची तयार होईल…

“स्त्री जन्मा हि तुझी कहाणी

हृदयी अमृत नयनी पाणी”

असं म्हणलं जात..प्रत्येक स्त्रीची अशी एक कहाणी आहे ज्यामध्ये प्रचंड दुःख , वेदना आणि एक आर्त किंकाळी आहे, जी फक्त मनातल्या मनात आहे, ती तडफडत आहे , घुसमटत आहे मनातल्या मनात, तिची ती आर्त हाक कुणी ऐकायला हवी.

जुन्या काळातही अहिल्या, सीता , तारा, मंदोदरी , सावित्री , मीरा ..अशा स्त्रियांची उदाहरणे दिली जातात, आजच्या काळात स्त्री जर खऱ्या अर्थाने स्वतंत्र बनवायची असेल तर तिला कौटुंबिक,सामाजिक सर्वच स्तरात मानाचं स्थान मिळायला हवे.तिच्यावर अन्याय करणारांना कठोर शिक्षा मिळायला हवी. संसाराचं एक चाक म्हणून तिला जपायला हवं, समजून घ्यायला हवं, पर्यायानं तिच्यावर होणारे अत्याचार थांबायला हवेत, तरच मुलगी हवी अशी समाजाची मानसिकता तयार होईल.

स्त्री ही वात्सल्याचा अखंड वाहता झरा आहे तो अखंड वाहतच राहील, फक्त त्याचा आनंद आपल्याला घेता यायला हवा.’जिच्या हाती पाळण्याची दोरी ती सर्व जगाते उद्धारी’ असेही तिच्या आदरासाठी म्हणले जाते. तिला न्याय द्यायला हवा, एक मैत्रिण, एक सखी, एक बहीण, एक अर्धांगिनी वाचवायला हवी…तरच समाधान नांदेल..आणि सावित्रीचा वसा जपला जाईल, सीतेला न्याय मिळेल मीरेला मान मिळेल आणि अहिल्येचा उद्धार होईल……

_सुसिमा .

https://susima.home.blog/2019/04/12/स्त्री-जन्मा-हि-तुझी-कहाणी/

रे जीवना

घेशील किती रे जीवना परीक्षा,

पापाची कुठल्या आहे हि शिक्षा??

नाही सोडत पाठ वेदना हि मनाची,

बरसतो कहर मिळते जेंव्हा जखम तनाची.

वाटते राहिले किती उन्हाळे डोईवर?

असे यातच अपार संकटांचा कहर.

रात्रीलाही आता नाही लागत डोळा,

सांग माझ्या नशिबी आहेत का चांगल्या वेळा??

वाईट विचारांचं सतत होतय अपचन,

आलबेल होईल माझ्याशी सगळं दे मला वचन.

नको करू रे जीवना मिजास घे माघार आता,

नाही हरणार तुझ्यापुढे तोच माझा त्राता.

चंद्र भाकरीचा कष्टानेच मिळवीन,

तुझ्या या संकटाना जिद्दीनेच नमविन.

नको बघू माझा अंत आता तू,

फिनिक्सप्रमाणे झेप घेईन पाहशीलच तू.

-सुसिमा .

https://susima.home.blog/2019/04/11/रे-जीवना/

जीवनगाणे गातच राहावे…

आपल्याला वाटत त्याच्यापेक्षा खूप वेगळंच आयुष्य आपल्या वाट्याला येत…असा अनुभव खुप प्रसंगातून येतोच आपल्याला नाही का? सरगाठीची निगरगाठ होते आणि आयुष्य जगणंच कठीण होऊन जात.. अगदी दिशाहीन, भरकटलेल्या तारूप्रमाण…

खूप छान ,सुरेख स्वप्न रेखाटतो आपण आपल्या आयुष्याची पण नको असलेले अत्यंत कटू अनुभव वाट्याला येतात, काय करावं सुचतच नाही…पण एक आहे अशाच प्रसंगात आपल्या प्रेमाच्या आणि खऱ्या माणसांची परीक्षा असते..त्यातच एखाद्याचा आधारचा हात आपल्याला मिळाला तर , अगदी म्हणतात ना..’बुडत्याला काडीचा आधार’ तसच काहीसं. हाच आधाराचा हात शेवटपर्यंत हातात राहावा असं निरंतर वाटत राहतं, पण असा सोबती मिळण हीच भाग्याची गोष्ट आहे.

आयुष्याचा वळणावर चढ उतार हा येतच राहतात, कधी प्रचंड दम लागणारा नकोसा वाटणारा चढ, तर कधी खूप छान आणि अलगद निभावून जाणारा उतार. असच आयुष्य हे प्ररमेश्वरांन सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेल वस्त्र आहे ते भरजरी वस्त्र आहे , ते जर एकदा फिसकल तर ते कधीच आपली लज्जारक्षण करू नाही शकतं. म्हणून ते फिसकू नये म्हणून काळजी घ्यायला हवी. जी माणसं आपल्याला पटत नाहीत, जपत नाहीत , मन जपत नाहीत, ती काय करणार आपल्या आयुष्यात….?

पण जीवनगाणे हे असे आहे की ते सगळ्यांना गावच लागत, मंगेश पाडगावकरांनी किती सुंदर शब्दात सांगितल आहे..’या जन्मावर या जगण्यावर शतदा प्रेम करावे’, आयुष्यात कितीही दुःख आले तरी आपल्या या आयुष्याचा सुंदर पावा चांगल्या सुरात वाजवण्याचा प्रयत्न आपण करायला हवा. मग कुणी साथ देणार असो वा नसो, नको त्या माणसांकडून नको तितक्या अपेक्षा ठेवल्या तर पदरात मानहानी , अपमान, दुःख, अश्रू आणि निराशा यापलीकडे काहीच पडत नाही. जिथं सूर गवसतच नसेल तिथं जाऊच नये आपला सुर जुळवायला…स्थिरच राहावं अगदी निश्चल दगडाप्रमाण..

यातून बाहेर पडणं खूप गरजेचं आहे, हा संथ वाहणारा वारा, या डोलणाऱ्या लता वेली, हा नवपल्लवीत होणारा निसर्ग, आणि हि जीवाला कातर लावणारी कातरवेळ पुन्हा संकटात खचून न जाता पुन्हा नव्याने जगण्याची उमेद देते. खरच इतकं कठीण आहे का हे जगणं?? का इतकेही कठीण नाहीये जितकं आपण समजतो? ठरवायचं कि छान जगायचं स्वतःसाठी जिवाभावाच्या माणसांसाठी, या सुंदर आयुष्यासाठी जे परमेश्वरान एक भेट म्हणून आपल्याला दिलय, ते असच न दवडता फक्त भरभरून जगायला हवं..खूप छान जगायला हवं, दुःख विसरून जगायला हवं.. मग कुणी बरोबर असो व नसो….अगदी एकट्यानं…..आणि मनमुराद आनंद लुटायला हवा त्या एकटेपणाचा आणि खूप मनापासून प्रेम करायला हवं त्याच एकटेपणावर…आणि हसाव स्वतःशीच या जगाच्या वेडेपणावर. त्यातला आनंद काही वेगळाच असतो. जगावं आशेनं आणि खूप उत्साहाने, जे प्रेम करतात आपल्यावर त्यांच्यावर प्रेम करण्यासाठी….. चांगले गुण जपण्यासाठी… त्यांची कदर करण्यासाठी जे आपली कदर करतात… आपल्याला जीव लावतात…..आणि असे हे ‘जीवनगाणे गातच राहावे….झाले गेले विसरून जावे पुढे पुढे चालावे’…….

– सुसिमा.