पानगळ अशीही…. शिशिरातली

महाशिवरात्रीच्या उन्हाने तप्त झालेल्या धरणीचा उसवा लवकर निघावा, तिची तहान भागून ती तृप्त आणि थंड व्हावी असं वाटत असते. या उन्हामुळे स्वतःच्या जीवाची काहिली होत असते. झाडे मलूल होतात….. फुले कोमेजून जातात आणि पर्यायाने सुरु होते ती थकलेल्या, भागलेल्या, पिवळ्या पानांची पानगळ …..!!! झाडे त्यांचे दुःख जणू त्या पानगळी तून व्यक्त करतात. याच पानगळीच्या काळात उत्साहात बहरणारा गुलमोहर आणि पळस पाहिला की उन्हाच्या या तप्तेतेचे भानच राहत नाही. आपण हरवून जातो, ते या गुलमोहराच्या सौंदर्यात. पानगळीचे कसलेच सोयरसुतक या झाडांना राहत नाही.

हिवाळा संपत आला असताना, झाडांची पिवळी होऊन अलगद साथ सोडणारी पाने, पाहिली की आपल्याही मनाला हुरहूर लागते.उन्हाळ्यात या झाडांना, या वेलींना, या वृक्षांनानाही कदाचित या पानगळीचे अतीव दुःख होत असेल. पण वेळेला अडवणारे कोण असते???? जशी ही झाडे पानगळीचे दुःख सोसतात, तशीच वसंतात पुन्हा नव्याने फुलण्याचे ,बहरण्याचे नकळत वचन देखील ते फांद्यांना देतात.त्या हिरव्या कोवळ्या पालविने पुन्हा नटायचे असेल, फुलायचे असेल तर सोसावी लागेलच ही पानगळ!त्याग करावा लागेल…!!!

रस्त्याच्या दोन्ही बाजूला असणारी हिरवी घनदाट झाडी नकळत आपल्यावर असणाऱ्या परमेश्वराच्या आशीर्वादची जाणीव करून देतात.यातच होणारी पानगळ आपल्यावर झालेला एक अभिषेकच आहे की….!

धुक्यात होणारी थंड, रम्य आणि मोहक पहाट ! त्याच धुक्यातून वाट काढत असताना मिळणारा आनंद हा काही वेगळाच असतो. याच धूक्याला हळुवार आणि अलगद कवेत घेऊन छान समजावणारी ती केशरी, सोनेरी, कोवळी सूर्यकिरणे म्हणजे विधात्याला पडलेले गोड स्वप्नच जणू.. धुक्यात हरवलेली वाट आणि नागमोडी वळणे चालत असताना,पुढचं पाऊल टाकल्याशिवाय पुढचा रस्ता आहे की नाही,याचा अंदाज येत नाही. असच काहीसं माणसाच आयुष्य असावं का?? याच वाटेने जाताना आजूबाजूला झाडाझुडपातून डोकावणाऱ्या धुंद करणाऱ्या कुंदाचा सुवास जीवाला वेगळीच तृप्तता देऊन जातो.या कुंदांची झुडूपे स्वतः काट्याकुट्यात फुलतात,पण सृष्टी वर भरभरून सुगंध उधळतात, वातावरण धुंद करून टाकतात!!त्यातच या झाडाची होणारी पानगळ., पानांचे अलगदपणे वाऱ्याबरोबर वाहणे ,फेर धरून नाचने मनाला मोहून टाकते…

पळसदेखील लाल फुलांनी फुलून जातो.गुलमोहर बहरून जातो, याच पळसाचा आणि गुलमोहराचा त्याग काय बरं वर्णावा??? सावलीत विसावनाऱ्या वाटसरूला ते आपल्या फुलांचा सुंदर गालिचा अंथरून देतात…अगदीच कसलीच तमा न बाळगता… त्यागातच धन्यता मानून…

माणसाच्या आयुष्याचं असंच काहीस .आहे.समोर एखादा ऋतु असा येतो की, दुःख आणि नागमोडी वळणे यातून जाण्याचा तो परीक्षेचा काळ असतो. असं वाटतं त्यातून वाट काढण्यात आणि संघर्ष करण्यात एक वेगळी मजा येते. त्यामुळे दुःख न मानता ज्याप्रमाणे झाड पुन्हा सजायला फुलायला, बहरायला आणि वेलीला कवेत घ्यायला तयार होते,अशीच काहीशी पानगळ आपल्याही वाट्याला येते ,म्हणून खचून न जाता पुन्हा नव्याने सज्ज व्हावे पानगळ सोसायला….बहरायला…. फुलायला… आणि नटायला……

–. सुसिमा

मी स्वतःला विसरून जाते….

वळणावळणाची पाऊलवाट,

धुक्यातली ती सुंदर पहाट ,

दवबिंदुं चे लाजणे तृप्त नजरेला करते,

घडणावळ पाहून विधात्याची,

मी स्वतःला विसरून जाते….

ती हिरवी झाडे ,

गाणारी ती पाखरे ,

गर्द हिरवी सृष्टी,राई आंब्याची असते,

सौंदर्य पाहून निसर्गाचे,

मी स्वतःला विसरून जाते…

श्रावणात कोसळणारा पाऊस,

लख्ख प्रकाशित करणार ऊन,

हळुवार वाहणारा मंदवारा अनुभवते ,

अनुभवता थंडावा तो,

मी स्वतःला विसरून जाते….

पाखरांचा किलबिलाट ,

पक्षांचे ते मधुर गाणे ,

मोरांचे केकारव ते साद मला घालते,

ऐकुनी साद त्या मयूराची,

मी स्वतःला विसरून जाते…

करवंदाच्या जाळ्या ,फणसाची झाडे,

सुखद सावलीचे देतात माडांचे ताटवे,

कुरणावर सोबत गाईगुरांची असते,

सोबत त्यांची मिळता कोकणी,

मी स्वतःला विसरून जाते…..

-सुसिमा .

श्रावण आला नवजीवन घेऊनी….

पावसाळ्यात म्हणजे वर्षाऋतूत येणारा श्रावण महिना याची महती ती काय वर्णावी??? सर्वच परिसराला सर्वांनाच आपलं क्षणभर अस्तित्व विसरायला लावणारा आणि यथेच्छ पणे जीवनाचा आनंद घेण्यास भाग पाडणारा हा श्रावण महिना म्हणजे सर्वांसाठी पर्वणी ठरते.

श्रावणात ला आणखी एक उल्हासाचा विषय म्हणजे भरलेले गर्द निळे आभाळ आणि ऊन-पावसाचा पाठशिवणीचा खेळ…… चिंब भिजवणार्या आणि मन प्रफुल्लीत करणाऱ्या सरी तर घटकेत त्या भिजलेल्या सृष्टीला पुन्हा कोवळ्या किरणांनी न्हाऊ घालणारे कोवळे उन…. श्रावणातल्या या सरी आणि हे वेगळे वातावरण म्हणजे परमेश्वराचे वरदान जणू. या बरसणाऱ्या सरी आणि त्यांच्या जोडीला येणारा हा उन्हाचा कोवळा शिडकावा म्हणजे विधात्याला पडलेली भूल जणू. … एकमेकांसोबत अनाहूतपणे राहणाऱ्या या गोष्टीला सख्याची उपमा दिली तर त्यात नवल ते काय वाटावे???? फूला पानांना लतावेलींनी वृक्षवल्लींना आणि पर्यायाने सर्व निसर्गालाच वेडे करून सोडणारा हा श्रावण महिना….. आपल्यालाच नव्हे तर पशू पक्ष्यांनाही वेड लावून जातो…. प्रेम करणाऱ्या प्रेमिकांना एकमेकांना साद घालायला लावणारा हा श्रावण महिना धरित्रीला जणू हिरवा शालुच नेसवितो… हिरवाईने नटलेली सृष्टी पाहता आपणच मंत्रमुग्ध होऊन जातो, त्याच वेळी त्या चिंब पावसानंतर आकाशात सप्तरंगांची उधळण करत येणारे सप्तरंगी इंद्रधनुष्य यासृष्टीच्या सौंदर्यात अजुन भर टाकत त्याच वेळी मोराचे थुईथुई नाचणे तिचे सौंदर्य अजून वाढवते येणाऱ्या श्रावण सरी या धरणीची तहान पूर्णत्वाने भागवितात. माळावर येणाऱ्या हिरवळीत गाईंसाठी येणारे हिरवे हिरवे गवत…. डोळ्याला एक वेगळीच शांतता देऊन जाते.. पाखरांना, धुंद बागडायला लावणारा पशुपक्ष्यांची साधा एकूण प्रतिसाद देणारा, गाईगुरांना मुक्तविहार यायला लावणारा, फुला ,फळांना ,लतावेलीना न्हाऊ घालणारा, फुलाच्या त्या कळीला अलगत चुंबुन उमलायला लावणारा आणि प्रियकर-प्रेयसीचे नाते घट्ट करणारा हा श्रावण सर्वांसाठी नवजीवन घेऊन येतो नाही का???

धुंद होऊन बेभानपणे उंचावरून कोसळणारे धबधबे क्षणभर नजर स्थिर करायला लावतात त्यांचे ते फेसाळते पांढरेशुभ्र रूप नजरेची तहान निश्चितच भागवतात. त्यांचे उंचावरून कोसळणे आणि पुन्हा त्याच उत्साहाने नदीला भेटणारा धबधबा पाहिला काळजाची अलगद छेडली जाते ,हिरव्या हिरव्या छोट्या छोट्या गवतावर स्थिरावलेले पाण्याचे थेंब आणि काठावर अलगत पसरलेले हिरवे शेवाळ.. जणू सृष्टीच्या एका नव्या रुपाची आठवण करून देते, डोंगरमाथ्यावर त्यांचा आधार घेऊन सरकणारे पाण्याने भरलेले मेघ त्यांची वेगळीच ओळख निर्माण करतात.

सणावारांचा, उत्साहाचा आणि आनंदाची उधळण करणारा हा श्रावण महिना. याच महिन्यात नागपंचमी हा सण येतो या सणांसाठी होणारी त्यांची लगबग लाह्या, नागपंचमीची गाणी आणि या सर्वांसाठी लहान मुलींपासून आबालवृद्ध पर्यंत एक वेगळाच उत्साह संचारलेला असतो, यासाठी धरला जाणारा भावाचा उपवास ही एक रूढ परंपराच आहे, नागपंचमीच्या उत्साहानंतर याची सर्व बहिणी आतुरतेने वाट पाहत असतात तो सण म्हणजे रक्षाबंधन आणि नारळी पौर्णिमा दर्याचे ऋण व्यक्त करण्यासाठी दर्यावर्दी रत्नाकराला श्रीफळ अर्पण करतात जेणेकरून वर्षभर मासेमारी करून उदरनिर्वाह करता येईल.. त्यानंतर वेध लागतात ते बाप्पाच्या आगमनाचे..

असा सणावारांनी नटलेला, उत्साहाने भरलेला विधात्याने निर्मिलेल्या या सृष्टीची नवी रूपे उलगडून दाखवणारा, या वसुंधरेला नटवू पाहणारा तिला सजवणारा पर्यायाने सर्व प्राणिमात्रांना आणि निसर्गाला तृप्त करणारा, सुखावू पाहणारा श्रावण सर्वांना हवाहवासा वाटतो… हसत हसत येणारा , नाचत येणारा, लाजत येणारा, हा श्रावण सृष्टीला नवजीवन चा देतो….नाही का??

सुसिमा .

वचन दे…

वाटत कधी फुलांनी भरलेली ओंजळ घेशील तू हातात,

अलगद त्या कुसुमांचा सुवास साठवशील उरात.

झालं कधी थोडं जरी दुःख

देशील तुझ्या खांद्याचा आधार,

अश्रुंचे पाट वाहण्यासाठी,थोपटून करशील साधार.

खूपच काही मागत आहे, दुःख माझे सांडत आहे.

खूप हलकं वाटतं आवाज जरी ऐकला तुझा,

उरात हुंदका दाटतोय हवा सहवास तुझा.

खूप बळ देशील तू आहे माहित मला,

अंतरीचे दुःख फक्त जाणवते तुला.

नको देऊ प्रलोभने ती फक्त जवळ रहा,

एकटेपणाच्या याक्षणी फक्त सोबत राहा.

हात फिरवून पाठीवर डोळे तेवढे पूसून घे,

डोक्यावर ठेवून हात साथ देण्याचे वचन दे.

सुसिमा .

रिमझिम पाऊस….

उन्हाळा ऋतूच्या रणरणत्या उन्हातून मुक्तता मिळविण्यासाठी आपण अगदी चातकाप्रमाणे पावसाची वाट पाहत असतो, जस कि एखादा प्रियकर प्रेयसीची उत्कंठतेने वाट पाहतो.वैशाख ऋतूतील वैशाखवणवा जीवाची अगदी काहिली करून टाकतो, ती तृष्णा शमविण्यासाठी येतो तो पावसाळा म्हणजे वर्षा ऋतू.

शेतकरी पेरणीसाठी पावसाची वाट पाहत असतात, त्यांचा तर तो अगदी जीव कि प्राण आणि जिवलग असतो, तो आहे तर सर्व आहे असेच सर्वस्व काहीसे… आणि हाच पावसाळा प्रत्यक्षात जेंव्हा सुरु होतो, तेंव्हा पहिल्या पावसाची आणि एकंदरीत या वर्षा ऋतूची मजा काही वेगळीच असते.पावसात भिजताना ती अनोखी क्षणांची माळ एक सुखद आणि अविस्मरणीय अनुभव देते.चिंब भिजवणारी ती हलकीशी सर आणि या बरसणाऱ्या सरीत भिजल्यावर हातात जर आलं घालून केलेला वाफाळलेला चहा मिळाला तर त्याचा आनंद आणि चव हि काहि न्यारीच असते. अशाच पावसात एखाद्या लोणावळ्या सारख्या हिल स्टेशन ला भेट द्यावी, आणि नाश्त्याला गरम भज्यांची डिश असावी, ती चव एक वेगळीच तृप्तता देऊन जाते.

जेंव्हा पाऊस येतो तेंव्हा हि तहानलेली, उन्हात भाजून व्याकुळ झालेली धरित्री तृप्त होते, अगदी चातकाप्रमाणे…सगळा निसर्ग कसा प्रफुल्लित होऊन मोहरून जातो, वसंत ऋतूत फुटलेली पालवी, बहरलेली झाडे, फुललेले वृक्ष जेंव्हा पावसात न्हाऊन निघतात त्यावेळी ती अगदी गोड लाजून, शहारून जातात.एकच वाऱ्याच्या झोतात त्यांच्या फांद्या- पानातून मोत्याप्रमाणे पडणार पाणी…अगदी वेड लावून जातं. अगदी गुलमोहर , झेंडू, गुलाब, पारिजातक हि फुले नवे तर वड ,पिंपळ सुद्धा खुलून जातात. भिजलेल्या जमिनीवर पडलेला सुगंधी पांढऱ्या व केशरी देठ असलेला पारिजातकाचा सडा मनाला मोहून टाकतो. वसंतातल्या पालवीने नवी नवलाई घेऊन नटलेला हा निसर्ग पावसाळ्यात मात्र हिरवळीच्या हिरव्या गालीच्याने व्यापून जातो.

नटलेल्या या झाडांना हा पाऊस एक नवसंजीवणीच ठरतो, हि वसुंधरा हिरवागार शालू नेसते, अगदी नववधू लग्नासाठी तयार होते तशीच नाही का?? या हिरव्या धरणीलाल पावसाला बिलगण्याचे जणू काही वेडच लागते ती पुन्हा पुन्हा त्याचे ते रिमझिम बरसणे, आणि ते टपोरे थेंब झेलायला सजून धजून तयार राहते अगदी आनंदाने…

हा अथांग पसरलेला जलधी खूप आनंदून जातो पावसाळ्यात आणि येणाऱ्या प्रत्येक सरीला प्रत्यक्षात, नदीच्या रूपाने का होईना स्वतःमध्ये निःसंकोचपणे सामावून घेतो…एकरूप होतो..त्याच्याच पाण्याचा अंश असलेल्या त्या वाफेचे ते एक प्रतिरूप आणि त्या वाफेची हि वेगळी भेट तो हर्षाने स्वीकारतो… उगीच नाही उधाण येत…..त्याला तो परका कसा करेल???

निसर्गाचं काय आपल्या मनालाही पावसाच्या येण्याची उत्कंठा लागलेली असतेच कि..उन्हाचा ते भयाण रूप पाहून कीतीदातरी मनाला विचार स्पर्श करतोच कि एकदा तरी येना वरुणराजा..किती अंत पाहशील??? ये एकदाच आणि थंड कर सगळं…आणि जेंव्हा तो येतो तेंव्हा वाटत किती दिवसांनी येतोय हा भेटायला ??अगदी लहान मुलं आईला पाहिल्यावर ते धावत आईला जाऊन कवटाळत, आईही त्याला उराशी कवटाळते.. अगदी तसेच या पावसाळा उराशी कवटाळावं, तो सुखाचा क्षण अनुभवावा.आकाश आणि धरणीमध्ये थेंबाच्या रूपाने आपलं नातं निर्माण करणारा हा पाऊस आपल्याला हवाहवासाच वाटतो.

लहान मुलांनाही हा पाऊस हवाहवासाच वाटतो ,पावसाच्या वाहणाऱ्या पाण्यात छोट्या नाव करून सोडायला किंवा शाळेतून भिजत येऊन भाजलेला कणीस खायला, येता येता रस्त्यावरील डबक्यात उड्या मारायला, लहान मुलांना खूप आवडते, त्यांच्यासाठी ती पर्वणीच असते नाही का???? हे सगळं पाहून लहानपणीच गाणं आठ्वल्याशिवाय राहत नाही.

” येरे येरे पावसा तुला देतो पैसा,

पैसा झाला खोटा पाऊस आला मोठा,

येग येग सरी माझे मडके भरी,

सर आली धावून मडके गेले वाहून..”

पावसाने काही ठिकाणी खूप बरसला आणि कहर केला तर पूर येतात, जनजीवन विस्कळीत होते.पावसाच्या रौद्र रूपाने प्राणहानी होते , वित्तहानी होते, तो कोपतो आणि सगळंच बिघडवतो, हे एक बाजू थोडी बाजूला ठेवली तरी आनंदाचे उधाण आणून सृष्टीला थंडावा देणारा हा पाऊस … जसेकी प्रियकर- प्रेयसीचे नाते खूप दिवसांनी एकमेकांना भेटल्यावर ती दोघे एकमेकांना घट्ट बिलगून जातात, तो क्षण कधी संपूच नये तो क्षण अत्तराच्या कुपीत बंद करून ठेवावा, अगदी कायमस्वरूपीसाठी….असे त्यांना वाटते..तसेच खूप दिवसांनी पाऊस आल्यावर त्याला बिलगावे आणि म्हणावे” वेड्या किती दिवसांनी भेटतोस खूप वाट पाहायला लावलीस…”असेच त्याला कवेत घेऊन ते सुख अनुभवतच राहावे..अगदी कायम.

कधी रिमझिम तर कधी सरीवर सरी तर कधी प्रचंड गडगडाटासह वीजा आणि वारे यांच्यासोबत कोसळणारा पाऊस….विविध रूपाची जाणीव करून देतो.असा हा पाऊस सतत पडू लागला तर मात्र कंटाळवाणा वाटतो, कुणी म्हणले आहे की सासुरवाशीण सुनेसारखा हा पाऊस सून जोवर येत नाही तोवर कधी येतेय असे वाटते मात्र आल्यावर जास्त दिवस झाले की नको नकोसे होते…

असे सर्व काही असेल तरीही पावसाळ्यात, आषाढात कार्तिकि एकादशीला या आषाढी वारीमुळे एक वेगळे महत्व प्राप्त होते. उभ्या पावसात विठ्ठलनामाचा गजर करीत दिंड्या, पताका घेऊन पंढरीची वाट चालणारे वारकरी आणि तो प्रचंड मोठा पालखीचे दर्शन घेण्यासाठी जमलेला भक्तांचा,विष्णुदासांचा मेळा एक अनमोल ठेवा उरात जतन करून ठेवतात…त्यांना विठ्ठल माउली पावसाच्या रूपाने साद घालत असते.

याच पावसाळ्यात श्रावण महिन्याने एक नवे सौन्दर्य लाभते, ते निळेशार मेघ, मेघांचे डोंगरावरून धावणारे काफ़िले, शिखरावरून कोसळणाऱ्या शुभ्र झऱ्यांच्या धारा ते छोटे छोटे झरे सृष्टीच्या सौन्दर्यंत भरच घालतात,तो सप्तरंगी इंद्रधनुष्य पाहत राहावंसं वाटते. उनसावलीचा पाठशिवणीचा खेळ आणि लपंडाव अगदी मनास भावणाराच असतो.पावसाळ्याच्या सुरवातीला सुरु असनारी लग्नसराई हि पावसाची एक वेगळी आठवण आणि साठवण निर्माण करते, माणसाच्या पर्यायाने सर्वच नात्यात एक वेगळे वलय निर्माण करणारा , आठवणींचा सुंदर मुकुट धारण करून सजलेला , गोड क्षणांची अनमोल भेट देणारा, सुखद गारवा निर्माण करणारा, मनाला विसावा देणारा, उसंत देणारा, आल्हाद देणारा हा पाऊस ,धुंद करणारा,चिंब भिजवणारा, नवसंजीवनी देणारा आहे यात शंकाच नाही…. म्हणून मला वाटते,

येशील ना तू वाट मी पाहीन,

बरसशील जर तू कवेत तुला घेईन.

हळुवार स्पर्श करेन नको घाबरून जाऊ,

अलगद चुंबूनी तुला जीवन नवे देऊ.

पहिल्या पावसाचे ते थेंब अलगद ओठांनी चुंबूनी घ्यावेसे वाटतात, हा पाऊस आसमंतात एक नवं चैतन्य फुलवतो, सर्वांची तहान भागवितो, मातीत थेंब पडल्यावर पसरणारा तो मृदगंध अगदी उरात साठवावासा वाटतो.. पावसाचे वर्णन करताना बालकवी त्र्यंबक बापूजी ठोंबरे म्हणतात,

“श्रावणमासी हर्ष मानसी हिरवळ दाटे चोहीकडे,

क्षणात हिरवे सरसर शिरवे क्षणात फिरुनी ऊन पडे.”

-सुसिमा .

संसार वाहून गेला….

कष्टाने दिवसभराच्या गेलो होतो थकून,

अधीन झालो निद्रेच्या दमून भागून.

नव्हते माहित आम्हास रात्र आहे शेवटची,

मुलालेकरांची नि माझी भेट आहे अखेरची.

खेकड्यांचे निमित्त झाले, तिवरे धरणाच्या फुटीला,

भ्रष्ट कारभार शासनाचा नाही सुख गाठीला.

अचानक आला चालून काळ लोंढ्याच्या रूपाने,

मोडला डाव सारा काळाने पाण्याच्या साथीने.

मोडले घर, मोडला संसार, पडली मोडून झाडे,

नशिबी उरले पाहण्या उध्वस्त झालेले वाडे.

होत्याचे नव्हते झाले चुलही विझून गेली,

बळच सारे घेऊनि माझे अश्रू ठेऊन गेली.

व्हावे सुरळीत सारे म्हणून आक्रोश किती केला,

मुलं बाळासाहित माझा संसार वाहून गेला…..

-सुसिमा .

https://susima.home.blog/2019/07/09/संसार-वाहून-गेला/

पर्यावरण दिनाच्या निमित्ताने….

“वृक्षवल्ली आम्हा सोयरे वनचरे।”

असे संत तुकाराम महाराज खूप वर्षे झाली सांगून गेले, पण आजही दुर्दैवाने परत तेच सांगण्याची वेळ आली आहे.आज 5 जुन जागतिक पर्यावरण दिन याच निमित्तानं काय काय सांगावे हाही यक्षप्रश्नच आहे! आणि कसं सांगावं हाही संशोधनाचा विषय आहे…. सध्या आपण आपल्या आजूबाजूला पाहिलं तर लक्षात येत कि उन्हाळा प्रचंड आहे, पारा रोजच 41℃ पार करतोय.. आणि अशाच जीवाची काहिली करणाऱ्या रणरणत्या उन्हात आपण शोधतोय गारवा……. जो आपल्याला देतात ‘वृक्ष’. झाडे पर्यावरणाचा अविभाज्य भाग आहेत, त्यांना जपलं पाहिजे, त्यांचे संवर्धन केले पाहिजे, अशा गोष्टी फक्त पर्यावरण शिक्षण या विषयात अभ्यास करून उत्तर लिहण्यापूरत्या मर्यादित राहिल्या आहेत. अंमलबजावणी शून्य आहे.

हा हिरवा निसर्ग मानवाने बेचिराख करून टाकला आहे…सगळी झाडे नष्ट होत चालल्याने पर्यावरण ओक ओक दिसत आहे…काल रस्त्याने येताना सहज बाजूला लक्ष गेल, तर सलग दोन मोठ्या वखारी दिसल्या उंच मोठ्या टेकड्याएवढ्या. ती कापलेली छोटी मोठी झाडे, त्यांची अमानुषपणे केलेली कत्तल, त्यांचे निष्प्राण झालेले अवयव पाहिले आणि काळजात धस्स्स झालं! आणि मनात विचार आला हा असच चालू राहील तर………?????? उत्तर एकच भविष्यात सजीवांचा पर्यायाने मानवाचा सर्वनाश निश्चित आहे…

सकाळीच पेपर ला एक बातमी वाचली, उच्च तापमान असणाऱ्या जगातील पहिल्या पंधरा शहरांपैकी 10 शहरे हि भारतातील आहेत… वाचून धक्का बसला. चंद्रपूर हा महाराष्ट्रातील जिल्हा जगातील सर्वात जास्त तापमान असणारा जिल्हा म्हणून घोषित करण्यात आला आहे. यावर्षी चंद्रपूर चा पारा 48.7℃ पर्यंत गेला आहे.चंद्रपूर बरोबरच अनेक शहरे तापमान वाढीने भाजून निघाली आहेत.वळवाचा एक पाऊसही बऱ्याच जिल्ह्यात पडलेला नाही….हि अशीच परिस्थिती राहिली तर माणसाला जगता येईल काय???अशा या तापमान वाढीमुळे global warming ची मोठी समस्या निर्माण होत आहे..झाली आहे.

झाडे नाहीत – पाऊस नाही, पाणी नाही, दुष्काळ, तापमान वाढ , प्रदूषण , जागतिक तापमान वाढीमुळे हिमालयातील नद्या वितळून पूरपरिस्थिती निर्माण होण्याचा धोका वाढला आहे, प्रदूषणामुळे ओझोन पडद्याला छिद्र पडली आहेत, त्यातून विषारी अतिनील किरणे आत येऊन कॅन्सर सारख्या रोगांचे तसेच इतर त्वचा रोगांचे प्रमाण वाढले आहे..प्रचंड पाणी उपस्यामुळे भूजल पातळी खालावली आहे, जमिनीची धूप होऊन पहावे तिकडे वैरान माळ दिसत आहे..अविघटनशील प्लास्टिक चा वाढत वापर, वाहनातून निघणाऱ्या धुरामुळे विषारी वायू वातावरणात सोडले जात आहेत.या सर्वांच्या मुळाशी वृक्षतोड हे एक कारण आहे, या समस्यांमुळे आज आपली वसुंधरा ऑक्सिजन वर आहे, गुदमरत आहे….

झाडे तोडल्याने अनेक सजीवांच्या प्रजातींची निवासस्थाने नष्ट झाल्याने त्या प्रजातीच नष्ट झाल्या आहेत. रासायनिक खतांचा बेसुमार वापर, कीटकनाशके, बुरशीनाशके यांचा बेसुमार वापर यामुळे पर्यावरण दूषित झालेच पण ती सर्व औषधे पोटात गेल्याने , कॅन्सर सारख्या रोगांचे प्रमाण खूप वाढले आहे.श्वसन संस्थेचे रोग हि प्रदूषणाने वाढले आहेत.

या सर्वांवर आता उपाय करण्याची वेळ आली आहे, झाडे प्रदूषण दूर करतात, जमिनीची धूप रोकतात, पाऊस पडायला मदत करतात, ऑक्सिजन देतात, तापमान संतुलित ठेवतात, पाणी अडवण्यासाठी मदत करतात, यासाठी आपण झाडे लावायला पाहिजेत, बांध घालायला पाहिजेत. बंधारे बांधायला हवेत.आपण भारतीय असूनही आपण पाश्चात्त्य संस्कृतीचं अनुकरण करतो. दरवर्षी आपल्याकडे आपल्या आप्तेष्टांचे वाढदिवस साजरे केले जातात, पूर्वी कस उत्सवमूर्तीला ओवाळण, औक्षण करणं आणि त्या व्यक्तीने देवाचा ,घरातल्या मोठ्यांचा आशीर्वाद घेणं अशी संकल्पना होती, भेटकार्ड हि दिले जायचे, पण आता मात्र पाश्चात्य संस्कृतीनुसार रात्री 12 वाजता केक कापले जातात, ते भरवले जातात, तोंडाला लावले जातात, परत पार्टी केली जाते, परत मग त्या निमित्ताने फिरायला जायचे असे बरेच कन्सेप्ट असतात.हि अशी एन्जॉयमेन्ट केली जाते, पण हे सर्व करण्यापेक्षा आपण भारतीय परंपरेनुसार त्या व्यक्तीला सकाळीच शुभेच्छा देऊन शुभ भावना व्यक्त केल्या व भेट म्हणून एक छोट रोप दिल आणि त्याला वाढविण्याची पर्यावरणीय बांधिलकी जोपासणारी जबाबदारी दिली तर किती छान होईल. पार्ट्या , फिरणं ह्या सर्वावर केला जाणारा खर्च आपण जर आपण ती झाडे वाढवण्यासाठी करू शकतो किंवा मग एखाद्या अनाथाश्रमाला किंवा वृद्धाश्रमाला देणगी देऊ शकतो, त्यांच्या गरजेच्या वस्तू घेऊ शकतो. शेवटी वाढदिवस म्हणजे काय ??? वाढत जाण संस्कारानं, गुणान,अनुभवानं आणि चक्क लहान होणं वयानं!!

आज पर्यावरण दिनाच्या निमित्तान आपण एक रोप लावूया, पोटच्या मुलाप्रमाणे जोपासूया आणि दर वाढदिवशी एक अशी रोप लावूया , भेटही रोपच देऊया, आणि हि धरित्री पुन्हा हिरवीगार करण्याचा संकल्प करूया.पाणी जपून वापरुया, प्रदूषण टाळूया, अपारंपरिक उर्जास्रोतांचा वापर करूया,आपण या समाजाचे जसे देणं लागतो तसे पर्यावर्णाचेही लागतो, सामाजिक बांधिलकी जोपासण्याबरोबरच, आपण पर्यावरणीय बांधिलकी जोपासण्याचा आपण प्रयत्न करूया, “Try is our best God” आपण प्रयत्न करूया.

आज पर्यावरण दिनाचे औचित्य साधून स्टेटस , डीपी ठेवण्याबरोबरच एक झाड लावूया , पर्यावरण दिन साजरा करूया, सुरवात स्वतःपासूनच करूया…… चला पर्यावरण वाचवूया…..

– सुसिमा .

किनारा तुला पामराला…..

वसंत ऋतू संपताच, ग्रीष्म ऋतूच्या सुरवातीला असा वैशाखवणवा पेटला आहे. प्रचंड रखरखत ऊन, याच रखरखत्या उन्हात आभाळाला साद घालणारा हा अथांग पसरलेला समुद्र…. अखंड आपल्या लाटेच्या रूपाने किनाऱ्याला येऊन भेटत असतो. दिवस असो वा रात्र, सकाळ असो वा संध्याकाळ, ऋतू कोणताही असो, भरती असो वा ओहोटी, सुख असो वा दुःख अनादी अनंत काळापासून हा जलधी कशाची तमा न बाळगता, लाटेच्या रूपाने किनाऱ्याला भेटतच आहे. हा किनाराही कशाचे सोयरसुतक न मानता अखंडपणे त्या लाटांना कवेत घेतच राहतो अगदी न थकता, त्या समुद्राचे ते उचंबळणे तो झेलतच राहतो.अगदी प्रत्येक क्षणाला त्याचा राग, प्रेम, आनंद, दुःख, संकोच, शोक अगदी निर्विकारपणे सोसत राहतो.

याच किनाऱ्याला प्रत्येक लाट थोडीतरी झिजवते, तिचा प्रत्येक वार, प्रत्येक भावनेचा क्षण तो किनारा अनुभवत असतो, आपल्या कुटुंबवत्सल आई वडिलांप्रमाणे तो त्या लाटांना एक मर्यादेची सीमारेषाच आखून देतो.काहीवेळा मर्यादा सोडून त्या लाटा किनाऱ्याबाहेर जातातही, पण किनारा हीच त्यांची लक्ष्मणरेषा असते. हा किनारा हाच त्यांचा सर्व काळातला खरा सखा आणि सोबती असतो.

आकाशाच्या निळ्याशार रंगातून त्याची निळी नवलाई घेऊन निळाशार बनलेला हा रत्नाकर आपला निळेपणा च जणू काही किनाऱ्याला देऊ पाहतो. त्याला सतत भेटून.समुद्राच्या त्या पाण्याच्या वाफेची मऊ दुलई पांघरून घेऊन शांत आणि निःशब्द पहुडणारा किनारा. बंदरात जहाज नांगरतानाहि त्यांना किनाऱ्याचा आधार असतो. पोहणाऱ्या माणसालाही ठराविक वेळाने किनाऱ्याचीच ओढ लागते. प्रत्येकाच्या आयुष्यात हा किनारा खूप महत्त्वाचा असतो, सावरतोही तोच, तारतोही तोच, आधार देतो. सायंकाळी समुद्रकिनाऱ्यावर तो तांबडा गोळा अस्तास जात असताना पसरलेला तो मंद केशरी प्रकाश त्या रत्नाकराच्या पाण्यावरून निवांत पहुडलेल्या किनाऱ्याच्या अंगाखांद्यावर अलगद पसरतो.अस्तास जाणाऱ्या त्या मित्राला पाहून खगजन हि आपापल्या घरी परतीच्या प्रवासाला लागतात, त्या तांबूस प्रकाशातून ,तेही रांगेने. किनाऱ्यावर उभा राहून ते विहंगम दृश्य पहायला खूप बरे वाटते. हा किनारा सर्वाचाच साक्षी, त्याचे आगळे वेगळे रूप ते काय वर्णावे????

प्रेम करणाऱ्या जोडप्याला असो वा प्रेमभंग झालेल्या प्रियकराला, आबालवृद्धापासून साऱ्यांनाच आपलं दुःख विसरायला लावणारा हा किनारा. कधी क्षणोक्षणी अखंड सोबत करणारा जिवलग वाटेत हरपतो आणि जीवनाचा सूर हरवतो पण हा किनारा आपला एकटेपणा दूर करून, साथ न सोडता आपले कर्तव्य बजावतो, तेही न थकता.

त्या निळ्या उंच लाटेला अनामीकपणे एक बंधन घालणारा किनारा…त्या लाटेची फेसाळती पांढरी शुभ्र किनार त्या किनाऱ्याला स्पर्श होताच एक शहारा अंगावर येतो, त्याच लाटेला मातेप्रमाणे कोंदण प्राप्त करून देणारा किनारा…लहरींचे यथावकाश अस्तित्व सावरणारा, आपली महती निःशब्द राहून पटवून देणारा, कुटुंबवत्सल माता पित्याप्रमाणे सागराच रक्षण करणारा किनारा…

असा एक किनारा प्रत्येकाला हवा असतो, आधार देण्यासाठी , क्षणभर विसवण्यासाठी, तो कुणाच्या तरी रूपाने भेटतोच, अगदी नाहीच म्हणलं तरी परमेश्वराच्या रूपाने…. सागराशी सानिध्य ठेऊन , आकाश पांघरून घेतलेला हा किनारा. कुसुमाग्रजांनी त्यांच्या ‘ कोलंबसाचे गर्वगीत ‘ या कवितेत खूप छान सांगितले आहे, सागरालाही कोलंबस आव्हान करतोय,

” अनंत आमुची ध्येयासक्ती अनंत अन आशा किनारा तुला पामराला.”

-सुसिमा पाटील, पुणे

https://susima.home.blog/2019/05/23/किनारा-तुला-पामराला/

दहशतवाद

सोडूनी संसार सारा,

पाश तोडले मायेचे,

नष्ट करण्या दहशतवाद,

सुपुत्र दौडले भारतभूचे.

रात्रंदिनी घालून तेल डोळा,

रक्षिले जन्मभूमीला,

अन्न, पाणी विसरून मौजा,

वाहिले देशसेवेला.

अडकला फास दहशतवादाचा,

गेला गुदमरून जीव,

घेऊन मुठीत प्राण जवान,

राखत असती शीव.

हल्ला झाला पुलवामावर,

बळी गेले जवान,

माघार नाही घेतली,

राहिली जगात ताठ मान.

नष्ट व्हावा दहशतवाद भयंकर,

टाकू उपटून पाळेमुळे,

कठोर शासन तयास व्हावे,

हिंसाचार हा ज्यामुळे घडे.

-सुसिमा .

https://susima.home.blog/2019/05/21/दहशतवाद/

शंभू अमर झाला…

नाही स्वीकारली हार,

नाही घेतली माघार,

न करता तह कोणताच,

दिला रयतेस आधार.

लिहिला बुधभूषण बालपणी,

शिकला भाषा सोळा,

पराक्रम पाहण्या शम्भूचा,

झाली दुनिया गोळा.

इतिहास घडला शौर्याने,

हरला नाही लढाया,

शम्भूच्या पराक्रमावर,

महाराष्ट्र मारतो बढाया.

पोरकी झाली रयत,

जेंव्हा मिळाला मृत्यू दंड,

शिवबाच्या छाव्याचे ,

स्मरण राहील अखंड.

घडविला शिवबा जिजाऊने,

आदर्श शिकवण दिली,

जन्म देउनी शंभूला,

माउली धन्य झाली…

रयतेस सुखी करुनी,

स्वराज्य विस्तार केला,

बलिदान देउनी स्वतःचे,

शंभू अमर झाला……

-सुसिमा .