पण ती जपून ठेवा…

अगं मिने! अग, अगं शिवलीस का भांड्याला??? तुला कितींदा सांगितलं पूरीच्या जातीन भाईर बसल्यावर कशाला शिवूनी.. सगळा इटाळ झाला बघ!! कालवलीस सगळ. माती हुती अशान घराची….माणूस उगाच म्हणत न्हाई..

” श्यात गेल कटाळ्यान आन घर गेल इटाळान….’

“देवाच्या चालीरिती पहिल्यापस्न पाळाया पाहिजे…” “अग आये! काय हुतय त्याला???? देवीला नव्हतं का? तुझ आपलं कायतरी… देवी देवी हाय!आपूण माणूस, जा घरात, बस् कोपऱ्यात एका.. शिवू नको कशाला.”

हा संवाद मी दुरूनच ऐकत होते.अगदी माळावरच एका बाजूला झोपडीवजा घर होतं झोपडीत मीनाचे आई-वडील आणि तिचा छोटा भाऊ राम राहत होते. मी पुढे गेले, आणि म्हणाले ” मीनाची आई एम. सी. ही नैसर्गिक बाब आहे तिच्यासाठी एवढा अंधश्रद्धा पाळू नका.”.

” अहो बाई, कसल्या अंधश्रद्धां न कसलं काय??परक्याच धन ती!!! लोका घरी जायाची तर तिला वळण लागाया नको का?? लोक पुन्हा आमच्या तोंडात शान घालतील..”.

मुलगी परक्याचे धन म्हणता तुम्ही!!आणि मुलगा वंशाचा दिवा , पण मुलगी दोन्ही घर उजळून टाकते सुखा- समाधानाने आणि आनंदाने…

“एक तरी मुलगी बरी, प्रकाश देई दोन्ही घरी”

“गोठ्यात गाय जन्माला आली की आनंद मानतात तुम्ही… अंड्यातून कोंबडी बाहेर आली देव पावला म्हणता… शेळीला करडू शेळी झाली आनंदित होता, घरी मुलगी का नसावी??? आज तुम्ही रामला शाळेत पाठवतात मीनाला मात्र घरीच बसवले आहे. तिला शिक्षणाची गरज आहे. एम.सी. आली म्हणून शिक्षण बंद करणं बरं नाही,तिला शाळेत पाठवा आता उद्यापासून..”

“बाई तुमचं सगळं खरं हाय! म्या मान्य करते.. पोरीची जात ही.. समाज कसा लांडग्यावणी लचक तोडाय बसलाया!! पोरीला नको वाटत पाठवायला.. आई म्हणून मलाबी वाटतं की.. म्या शिक्षान घेतलं न्हाई, पोरींन तरी घ्याव… पण तिचा बा म्हणतो कुठे शिकून कलेक्टरिन व्हायची हाय?? या दिवाळीत तिचं लगीन लावून देऊ तिचं… करलं संसार न्हवऱ्याचा..नकुच हूत लेक, पोटातच मिली अस्त बर झाल अस्त… आता लगीन लाऊन दीवू….”

मी म्हणलं, “मीनाची आई, अजून तिचं वय खूप लहान आहे. 18 वर्षापर्यंत तुम्ही तिचे लग्न नाही करू शकत. तिला शाळेत पाठवा इतर मुलांबरोबर, राम बरोबर घरी येईल ती भीती नाही राहणार तिला.. आम्ही आहोतच की! मीना शिकली तर मोठी बनेल स्वतःच्या पायावर उभी राहिल.. तिच्या मुलांना शिकवेल..”.

” तेवढ्यात मीना बाहेर आली म्हणाली, “बाई मी साळत यील उद्यापस्न.., मला बी शिकून मोठे हुयाच हाय.”

मी म्हणाले, “हो नक्की ये.””मुलगा जरी वंशाचा दिवा असला, तरी मुलगी वंशाची पणती आहे. दोन्ही घरी प्रकाश देणारी तिला जपून ठेवा. तीच आपली वाट प्रकाशित करेल.”

” पणती जपून ठेवा, अंधार फार झाला”

“पण ती.. म्हणजे दुसरी तिसरी कुणी नसून आज समाजाचा बेबंद फासात अडककेली मुलगी आहे…”

“तिला जपा, तिला शिकवा… तिला माया द्या..प्रेम द्या..”

“लेक वाचवा, लेक शिकवा..”

– सुसिमा.

All rights are reserved.

Image source – Google.

२१/०५/२०२०.

तिमिरातुनी तेजाकडे….

दोन मिनिट डोळ्यांच्या पापण्या बंद करून बघा… आपल्याला अंधार दिसतो, हीच अवस्था आपण थोडा काळ सहन करू शकतो, पण ती जर आयुष्यभर असेल किती भयानक कल्पना आहे ही???

पण काहींना मात्र दैवानं हे सुंदर जग पाहण्यापासून कायमच वंचित ठेवले आहे… आपण कवी होतो, लेखक होतो, लेख लिहितो, कविता करतो, ललित लिहितो, पद्य लिहितो, वर्णन करतो, रसग्रहण करतो…”डोळे हे जुलमी गडे”.. अस म्हणतो ही, हे सार करण्यासाठी देवाने दिलेली एक तेजस्वी देणगी म्हणजे दृष्टी!!!!

हे डोळे सगळं जग पाहतात, मनीचे भाव सांगून जातात. ते भाव सांगण्यासाठी कधी शब्दांचीही गरज नसते. पण हे डोळे एकमेकांना कधीच पाहू शकत नाहीत…मात्र सगळे जग पाहतात.. पण ज्यांनी हीच दृष्टी गमावली, त्यांना हातातल्या काठीचा आधार हे जग पादाक्रांत करण्यासाठी पुरेसा असतो का??? धडधाकट हात-पाय त्या काठीच्या साह्याने उभे आयुष्य जगतात.. अगदी निर्विकारपणे…कोणतीच तक्रार न करता. कारण, त्यांना माहित असतं आता हे असच जगावं लागेल …

आपण रेल्वेमध्ये सर्वजण प्रवास करतो, या प्रवासात हमखास भेटणारी व्यक्ती म्हणजे अंध व्यक्ती. आपल्या अंगावर वेगवेगळ्या वस्तूंचे दुकान थाटून, गाणी गाऊन, काही तरी कला सादर करून आपला उदरनिर्वाह त्या चालवतात…या सर्वांमध्ये अत्यंत जमेची बाजू म्हणजे लाचार पणाने लोकांपुढे भीक न मागता स्वकष्टाने आणि स्वाभिमानाने पैसा कमवून ही लोकं उदरनिर्वाह करतात…

काही माणसं देवाने एवढे सुंदर डोळे दिले असताना, हात पाय दिले असताना, मंदिरासमोर भीक मागताना दिसतात… या विधात्याने हे सुंदर जग ज्यांच्या प्रारब्धातून पुसून टाकले, त्यांचे पूर्वसंचित ते काय असावे बरं???

पण अशी माणसे खूप भावनाप्रधान असतात. वाऱ्याची मंद झुळूक ते खूप तन्मयतेने अनुभवतात. स्पर्शाची भाषा आत्मीयतेने समजून घेतात. तेजस्वी किरणांनी विश्वाची शोभा वाढविणारे हे लोभसवाणी रम्य सकाळ पाहणे त्यांच्या प्रारब्धात नसते…. नसतात त्यांच्या नशिबी रंगीबिरंगी फुले.. नसते सप्तरंगी इंद्रधनुष्य, नसतात ढगांचे वेडेवाकडे आकार, नसतो हिरवागार निसर्ग, नसत पाहण समुद्राच्या फेसाळत्या लाटा, नसत पाहण टिपूर चांदणं, नसतो पौर्णिमेचा चंद्र, नसते वसंतातील सृष्टीचे बहरणे, नसते मयुराचे सुंदर नृत्य पाहणे, नसतो कृष्णवर्ण आणि गौर वर्ण हा भेद, नसतो तो दृष्टी स्तब्ध करणारा सूर्यास्त, नसतं ठरवण रंगांची आवड नी निवड, आणि नसत पाहण जिवलगाच्या डोळ्यातील भाव जाणं न …….

त्यांना कळतो स्पर्श फक्त आधाराचा, प्रेमाचा, विश्वासाचा, पावित्र्याचा आणि कटू तेचा…. कधी त्यांच्या नशिबी असतो आवाजातला गोडवा… परमेश्वराने एक जरी गोष्ट त्यांच्याकडून काढून घेतली असली, तरी सुद्धा दुसऱ्या बाजूला बऱ्याच गोष्टी परमेश्वर त्यांना भरभरून देतो… जगणं सुसह्य करतो…. जगण्याची उमेद देतो….

म्हणून भाग्यविधात्याला एवढेच मागणे ते मागत असतात,हे अंधकारमय आयुष्य त्यानेच सावरावे, आयुष्य उजळवावे…. एक आशेचा नंदादिप त्यांच्या जीवनात परमेश्‍वराने जरूर लावावा…. म्हणूनच म्हणावेसे वाटते..

“तिमिरातुनी तेजाकडे प्रभु आमुच्या ने जीवना…..”

– सुसिमा.

@All rights are reserved.

Image source – Google.

19/05/2020

हरवलेले दिवस…*

मी सुसिमा,

“ऋणानुबंधाच्या गाठी”

आजच्या बदलेल्या जीवनशैलीतून मला ही कविता सुचली, समीक्षण करावे… “ऋणानुबंधाच्या गाठी” या शीर्षकात स्वतःचे लेखन करते. थोड उशिरा पाठविलेली कविता….

विषय – कुठे गेले ते दिवस..

*तो एक काळ होता,

मामाच्या गावाला जायची आतुरता असायची,

मामीच्या हातची पोळी भाजी,

अमृतासमान लागायची.

झोपाळा , सूरपारंब्या,

शेतात मैफल जमायची,

पाण्यात डुंबण्याची मजा,

आकाश ठेंगणं करायची.

सागर-गोटे वडाच्या सावलीत,

पटकन जागा बळकावायचे,

रंगीबिरंगी काचाकवड्या,

लक्षवेधून रंगायचे.

आता मात्र तसे नाही,

गेलेले दिवस परत येत नाही…

प्रत्येकाच्या हातालाही,

आता मोबाईल शिवाय करमत नाही.

छोटा भीम, डोरेमॉन

लहान मुलांना खेळवू लागला,

पोहणे ,लपंडाव, सायकलींना,

कायमचा रामराम मिळाला.

छोटी छोटी मुलं आता ,

लठ्ठ होऊ लागली,

फास्टफूड खाऊन,

आजारांशी सलगी करू लागली.

मुलांना गोष्टी सांगणारे आजी-आजोबा,

आता गोष्टीतही दिसत नाहीत,

आजी-आजोबानाही आता,

नातवंडाचे अप्रुप वाटत नाही.

मामाच्या गावी जावं कोकणात,

तर तोही उरला नाही,

चिल्या – पिल्यांच्या गाण्यात,

मामाचा गाव कुठे दिसत नाही.

नाही सांगावं वाटत,

दुःख मनीच कुणा,

मनाचा प्रत्येक कोपरा,

होऊन गेला सूना.

नाही उरला प्रेम जिव्हाळा,

नाही राहिली ओढ,

मनामनात साचून राहिली,

नात्यांबद्दल तेढ.

समजाव लेकरांना देवा तुझ्या,

करीन मी नवस,

सांगा येतील का परत माझे,

सोनेरी हरवलेले दिवस?????

– सुसिमा

@All rights are reserved.

Image source – Google.

महाराष्ट्र देशा….

सुजलाम् सुफलाम् सजला हिरवाईने छान,

प्रिय आमचा एकमेव महाराष्ट्र देश महान.

सह्याद्रीचे कडे करिती, रक्षण सभोवती,

अरबी सागर धुतो चरणकमल, राहून सांगाती.

कळसुबाई शिखर करी, टेहळणी वरूनी,

कृष्णा, भीमा, गोदावरी नमिती शेती फुलवूनी.

मुंबई नगरी वसली ती, बनुनी राजधानी,

उद्योग आणि व्यवसायांची ठरली ती जननी.

ज्ञानेश्वर, तुका, एकनाथ, जना ओवी गाई,

संत परंपरा महाराष्ट्राची, मानाची पुण्याई.

मातीत जन्मलो महाराष्ट्राच्या, आहे आम्हा अभिमान,

उत्तुंग यश मिळवूनी आम्ही, वाढवू त्याची शान.

नित्य राहिल श्रद्धा आमची, या माय भूमी वर,

तेजाचा प्रकाश पसरो अखंड धरतीवर.

शिव-शंभुने केली महाराष्ट्राची, जगात उंच मान,

स्वराज्य रक्षूनी गोरगरीब, रयतेस दिला सन्मान.

डंका महाराष्ट्राचा जगात वाजतो चोहीकडे,

महतीचे पोवाडे गातील तोफांचे चौघडे….

– सुसिमा.

@All rights are reserved.

Image source- Google.

“उन्हातली पायवाट….”

रानावनातून जाता, खडकाळ पाय वाट,

पायी तुडवीत रस्ता, डोई प्रपंचाचा भार.

पोटापाण्यासाठी वितीच्या, करतो वणवण,

नाही रहात शुद्ध ,आहे रात्र की दिन.

ठाऊक असूनही सारे, दुःख दडपले उरी,

पोरं माझी मागतात, शाळेसाठी नादारी.

नाही दागिन्यांचा सोस , नाही कशाचीच हौस,

पितळेच्या पाटल्या देतील, जगण्याची सारी मौज.

डोईवरचा पदर, नाही ढळू आम्ही देत,

किती संकटात, नाही मोडावी चालरीत.

पाऊल पडते ,पुढे नाही वळून पहात,

आयुष्याचा आनंद, आम्हा राही खुणावत.

ओझी सावरून डोई, निघतो डौलात,

नाही तमा कशाची, आम्ही बाळगत.

संघर्षातून संसाराच्या, ठावे हसत राहावे,

डोईवरील उन्हाळे, ओझ्याने सोसावे…

– सुसिमा

फिरुनी नवी जन्मेन मी….

रात्री अस्वस्थ मनस्थितीत अंथरूण घातलं… थोडावेळ विचारात असताना डोळे मिटून केव्हा झोप लागून गेली समजलेच नाही…… सकाळी जाग येताच मनात विचार येऊन गेला, किती क्षुल्लक गोष्ट होती ती…. मी उगाच जिवाचा त्रागा करून घेतला…..आळस देत उठले आणि घरातून बाहेर आले, पूर्वेला तो भास्कर नुकताच वर डोकावत होता त्याच्या आगमनाच्या आनंदाने आकाशाची लालिमा लाजून लाल झालेल्या नव्या नवरी प्रमाणे दिसत होती…. ते अप्रतिम सौंदर्याने नटलेले आकाश पाहून मी मनोमन सुखावले किती सकारात्मकता होती त्या सूर्योदयात….रात्रीचा गर्द काळोख संपून होणारी ती एक नवी सुरुवात होती…..

आजू बाजूच्या झाडावर पाखरांचा किलबिलाट ऐकू येत होता. सहजच पेरूच्या झाडाकडे लक्ष गेले,कालच अगदी भरपूर पाणी दिल्याने त्यांचा टवटवीतपणा मन प्रफुल्लित करत होता, त्याच पेरूच्या छोट्या पानातून पांढरी छोटी फुले गालातल्या गालात हसत होती, कुठेतरी छोटी फळे डोकावत होती,अति उंचावर नजर गेली तिथे एक चिमणी एक काडी आणून कुशलतेने घरटे विणत होती. ती एका काडीसाठी ती कितीतरी अंतर पार करून जात होती, पुन्हा येत होती….किती तिचा त्रास किती ते कष्ट?????एवढ्या उन्हाळ्यात अनंत वेदनांची पानगळ सोसून पळस ही मनापासून फुललेला होता… शेजारीच एक पारिजात पाणी जास्त झाल्याने अचानक करपून गेला. मखमलीची फुले भरभरून फुलली होती, तीचा बहर खूप आनंद देऊन गेला. घराजवळच एक फेरफटका मारू म्हणलं.पाच मिनिटाच्या अंतरावर एक आंब्याचं झाड होतं अक्षरशः फळांनी वाकुन गेलं होतं… त्याच्याच बुंध्याशी अडचणीत दहा फूट लांबीचा एक मोठा धामण सळसळत होता, मी विचार केला काय झालं असेल?? तर लक्षात आलं की तो कात टाकत होता…. बापरे! कात टाकतानाही एवढा त्रास व्हावा तिथेच बसून राहिले… दगडाचा ढीगा शेजारी मुंग्यांचे वारूळ दिसले, खूप मोठे… बारकाईने निरीक्षण केलं तर त्या मुंग्यांनी एक मोठे झुरळ घट्ट पकडले होते… आणि झेपत नसतानाही त्या ओढत त्याला वारुळात नेत होत्या..त्यांची ती जगण्यासाठीची धडपड होती… वारुळा जवळच आजूबाजूला सर्व काटे असतानासुद्धा त्याच्यापासून उंच अलगत गुडघे मोडीची फुले फुलली होती स्वतःला ती काट्यापासून जपत होती…

हे सगळं पाहिल्यानंतर मनात नकळत विचार आला किती सोप असत ना एखाद्या गोष्टीतून बाहेर पडणं… बाहेर पडेपर्यंत त्रास होतो नंतर मात्र सगळं सोपं होऊन जातं… एखाद्या झाडाला पाणी नाही मिळालं तर त्याच्या मुळ्या हजारो मैल जातात पाणी मिळवण्यासाठी… आंब्याच्या झाडावर वाढलेले बांडगुळ सुद्धा किती तोऱ्यात उभे असते….

त्या आजूबाजूच्या प्रत्येक गोष्टीत मला तेवढं जाणवलं की एखाद्या गोष्टीतून बाहेर पडेपर्यंत त्रास होतो.. आणि ती प्रत्येक गोष्ट निसर्ग मला नव्याने होता शिकवत होता… मी मात्र अमुक एका व्यक्तीकडून अमूक एवढ्या गोष्टी मिळाल्याच पाहिजेत असा अट्टाहास धरून बसले होते. जगात खूप सुंदर गोष्टी असतात आयुष्य म्हणजे तरी काय असतं???? एक दीर्घ श्वास घेणं आणि सोडण… आपण नको त्या गोष्टीसाठी अटी तटी ठेवतो, जगाच्या साच्यात आपल्याला बसवायला बघतो आणि नाहक जीवाला त्रास करून घेतो… प्रत्येक सादाला प्रतिसाद मिळतोच असे नाही… कित्येकदा अनंत दुःख सोसून छान ,गोड हसणं हेच खरं जगणं आहे.प्रत्येकाची दुःखाची कारण वेगळी असली तरी, परिभाषा मात्र एकच असते….आपण त्याची सकारात्मक बाजू शोधून त्यातच आनंद शोधायचा असतो…

या क्षितिजाची लालिमा…त्या सापाचे कात टाकण्यासाठीची धडपड… त्या चिमण्या जीवाची घरटं बांधण्यासाठीचे कष्ट…फुलांचे काट्यातल फुलणं…. मुंग्यांच ते अपार कष्ट, पण तेवढे सहन केल्यानंतर मिळतो तो फक्त आनंद…कोषातून बाहेर पडेपर्यंत त्रास नंतर मात्र फक्त आनंद…. इतके दिवस विचार करत मी माझं अनमोल जीवन निरर्थक घालवत होते… एक दीर्घ श्वास घेतला, आणि माझा पुन्हा नवा जन्म झाला अस वाटलं मला…मी पुन्हा नव्याने आयुष्य जगणार होते… स्वतःवर प्रेम करणार होते… स्वतःला समजून घेणार होते… आयुष्यावर प्रेम करणार होते…जणू काही तिचा नवा जन्म झाला होता असा विचार करत घरी येताना आकाशवाणीवरील एक धून कानावर पडली… एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी…. हे गाणं गुणगुणत मी स्वतःशीच एक छान गिरकी घेतली आणि ते गाणं गाऊ लागले लहरेंन मी, बहरेन मी… शिशिरातूनी उगवेन मी….. एकाच या जन्मी जणू फिरूनी नवी जन्मेन मी…..

– सुसिमा.

@All rights are reserved.

Image source – Google.

थोडं घरीच राहू…..

नको लाँग ड्राईव्ह, नको पिकनिक,

नको त्या पार्ट्या, नि नको ती कीटकिट,

शांततेत अंतर्मुख होऊन स्वतःलाच पाहू,

टाळण्यासाठी कोरोना थोड घरीच राहू…..

नको पाणीपुरी, नको भेळ-मिसळ,

घरीच खाऊ झुणका-भाकर नि आईच्या हातची उसळ,

कसा जातो दिवस आईचा जवळून पाहू,

टाळण्यासाठी कोरोना थोड घरीच राहू….

नाही जाणे ऑफिसला, नाही बॉसची कटकट,

नको तो सिग्नल , नि नको ट्रॅफिकची दगदग,

घरीच बसून अपुल्या कादंबरीत रमून जाऊ,

टाळण्यासाठी कोरोना थोड घरीच राहू….

काढू सापशिडी, खेळू बुद्धिबळ, नि व्यापार,

सूरपारंब्या, आट्यापाट्या चां करू विचार,

लहानपणीच्या विश्वात पुन्हा रमून जाऊ,

टाळण्यासाठी कोरोना थोडं घरीच राहू…..

नको ती लोकल, टाळू गर्दीचा प्रवास,

शांतपणे जगू थोडं, सोडु पैशांचा हव्यास,

काढून जुना अल्बम त्या विश्वात रमून जाऊ,

टाळण्यासाठी कोरोना थोडं घरीच राहू…..

असेल सर्दी, खोकला थोडा जरी,

घेऊन उपचार करून घेऊ बरी,

जपण्या सामाजिक बांधिलकी प्रबोधन करून पाहू,

टाळण्यासाठी कोरोना थोडं घरीच राहू…..

नको बाहेर पडणे, नको स्पर्श कुणाचा,

एक मीटर अंतरावरून घ्या रामराम आमचा,

नाही परकेपणा वाटत, स्वतःला थोडं जपू,

टाळण्यासाठी कोरोना थोडं घरीच राहू……

– सुसिमा

अपुली गावाकडची माती…

आज काल आपण पाहतोय सगळ्या जगावर कोरोना व्हायरसच्या भीतीचे सावट पसरले आहे. चीनमधून सुरू झालेल्या या रोगामुळे सर्व जगच भयभीत झाले आहे. ती कोरोनाची लागण आणि त्याचा प्रसार ही एक खूप भयंकर समस्या निर्माण झाली आहे… ज्यावर अजून उपाय सापडलेला नाही… सार्स, mers नंतर प्लेगासारखाच पसरत जाणारा साथीचा आजार म्हणजे कोरोना..! जोकी सगळ्यांनाच जीव मुठीत धरून जगायला लावत आहे.आता सगळीकडेच टिव्ही चैनल,न्यूज,वर्तमानपत्र, व्हाट्सअप, फेसबुक यासारख्या सर्व सोशल मीडियावर फक्त कोरोनाची चर्चा चालू आहे .सर्व शाळा, सरकारी कार्यालये यांना सुट्ट्या दिल्या आहेत. बरीच ठिकाणे लॉक डाऊन कडून केली आहेत. खाजगी कंपन्यांनी त्यांच्या एम्प्लॉइज ना वर्क फ्रॉम होम दिले गेले…

हे सगळं चालू असताना एक गोष्ट खूप प्रकर्षाने जाणवली मित्रहो, आपल्यापैकी बरेच जण आपण जिथे राहतो त्याठिकाणाहून उदरनिर्वाहासाठी नोकरीसाठी दूर कुठेतरी मुंबई ,पुणे ,परदेशात गेलेलो असतो, नोकरी किंवा व्यवसायाच्या निमित्ताने बाहेर पडलो, तरी एवढी मोठी राष्ट्रीय आपत्ती आल्यानंतर ती सर्व पाखरे परत येत आहेत..आपल्या घरट्याकडे म्हणजेच आपल्या गावाकडे जिथे आपला जन्म झाला, जिथे आपली छोटसं गाव आहे, जिथे आपल्या छोटसं घर आहे, त्या घराची ओढ आपल्यापैकी सर्वांनाच लागली, जिथे आपला जन्म झाला.जिथं आपलं घर आहे ,जिथे आपण लहानाचे मोठे झालो.. ज्या मातीत खेळलो, जिचा सहवास आपण कधीच विसरू शकत नाही,… तिच्या स्पर्शाने आपण गदगदून जातो. तिचा सहवास आपल्याला जगण्याचा नवा हुरूप देऊन जातो….. पंख फुटल्यावर बरीच पाखरे घरटं सोडून अवकाशाला गवसणी घालण्यासाठी उंच उडून गेली… पण एवढं मोठं संकट आल्यावर ती पुन्हा परत आपल्या गावाच्या मातीकडे परतली… तिच्या पंखांचा आधार घेण्यासाठी, तिच्या कुशीत शिरली, आपले संरक्षण करण्यासाठी …..ज्या वेळी आपल्याला एखाद्या संकटाचा सामना करणं शक्य नसतं तेव्हा आपण आधार शोधतो, तो फक्त गावाकडच्या मातीचां आणि जिवाभावाचा माणसांचा… आपल्या घरट्याकडे परतणारी पाखरे पाहून त्यांना भेटायला , त्यांना कवेत घ्यायला , ….ती माती, ती माणसे,तो परिसर, आसुसून गेला आणि ती येताच एक वेगळाच आनंद या मातीला, त्या जन्मभूमीला झाला…. ती भावना शब्दात वर्णन करणे कधीच शक्य नाही… आपल्या घराकडे ओढ लावणारी ती छोटी पाऊलवाट पटकन संपून जाते… पुन्हा नव्याने आपले बालपण आपल्याला आठवते….

या राष्ट्रीय आपत्ती च्या निमित्ताने एकजूट झालेली माणसे आणि आपल्या घरट्यात जमलेली पाखरे, पिल्ले,पाहून हृदय भरून आले…. म्हणूनच म्हणावेसे वाटते खरा अर्थ प्राप्त होतो तेंव्हा घरट्याला जेंव्हा ते परिपूर्ण होते… या आपत्तीच्या निमित्ताने का होईना ईश्वराचे स्मरण आपल्याला आवर्जून होतं.यासारख्या आपत्तीचे परमेश्वर लवकर निराकरण करून सर्वांना चांगले, आरोग्य समृद्धी प्रदान करो.. हे जग पुन्हा एकदा आरोग्यपूर्ण,शांत, सुंदर आणि छान होवो.. सर्वांना सुख, समाधान मिळो.., परमेश्वर सर्वांचे कल्याण करो, रक्षण करो आणि आयुष्यभराची आठवण सदैव स्मरणात राहो.. हीच विश्वप्रार्थना….!

-सुसिमा

बहरला ऋतुराज असा….

असं मानलं जातं की मराठी वर्षातील माघ महिन्यातील शुक्ल पंचमीला वसंत ऋतूची सुरुवात होते.फाल्गुन चैत्र महिन्यात वसंत ऋतु येतो, मराठी वर्षाचा शेवट व पुढच्या मराठी नववर्षाची सुरुवात म्हणजे वसंत ऋतू. इंग्रजी महिन्यातील फेब्रुवारी व मार्च महिन्यापर्यंत महिन्यापर्यंत येणारा ऋतू येणारा ऋतू म्हणजे वसंत….

मोहरलेला आंबा, फुललेला पळस, बहरलेला गुलमोहर, नटलेली अासावरी, पिवळ्या आणि पांढऱ्या फुलांनी सजलेला चाफा, पांगरी, शाल्मली , दाही दिशांत सुगंध उधळणारा मोगरा, आपल्या सुवासाने धुंद करून सोडणारा कुंदा, फुलांनी नटून गेलेला आणि लाजून लाल झालेला जास्वंद, तुळशीच्या शेजारी दबकुन उभी असणारी मखमल, पिवळ्या फुलांनी डवरलेली शेवंती, राजाच्या तोऱ्यात दिमाखात मनभरून फुलनारा गुलाब अशी फुलझाडे. त्याचप्रमाणे लडिवाळपणे आपल्या बाळांना कडेवर घेऊन उभा असणारा, कुटुंबवत्सल भासणारा फणस, काजू ,झुडपातून डोकावणारी करवंदे , टरबूज कोवळ्या काकड्या, चिंचा, झाडांच्या पानातून डोकावणाऱ्या हिरव्या कैऱ्या, कलिंगड अशा रसदार फळांचा हंगाम म्हणजे वसंत… ही सर्व सृष्टीची रुपये पाहून मन मोहून जाते ना???

या सर्व सृष्टीच्या रूपांची प्रचिती आपल्याला वसंतात येते, म्हणूनच ऋतूंचा राजा वसंत ऋतुराज शोभतो! वसंत म्हणजे नवचैतन्य ,नवप्रभात, नवीनतेच्या नव्या नवलाईने सजलेली वसुंधरा… वसंत म्हणजे निसर्गाची युवावस्था …..वसंत म्हणजे रसरसते लावण्य… वसंत म्हणजे चिरतरुण यौवन , आपल्या मोहक सौंदर्याने साऱ्यांनाच भुरळ पाडणारा असा हा वसंत….या बरोबरच सुरु होणारा कडक उन्हाळा… त्यात जीवाची काहिली करून सोडणाऱ्या उन्हातही पूर्णांशाने बहरलेला गुलमोहर, पळस, आपल्या सुंदर फुलांचा गालिचा सृष्टीवर अंथरतो. सर्वार्थाने सजलेली सृष्टी म्हणजे ईश्वराचे प्रेम जणु!!!!! एवढी पानगळ सोसूनही फुलझाडांचे जोमाने बहरणे मनाला आणि डोळ्याला थंडावा देऊन जाते, छान जगण्याची आशा पल्लवित करते… मोगऱ्याचे परिसर सुगंधित करून फुलणे, जाईजुईचे ते वाकुल्या दाखऊन साद घालने, काश्मिरी फुलाचे वाऱ्याबरोबर डोलणे, पर्यायाने सगळ्या निसर्गाचे नव पालविणे पल्लवित होणे, मनाला एक वेगळीच तृप्तता देऊन जाते…. सृष्टी वसंतोत्सव साजरा करते, निसर्गाचे लावण्य अनोखी वाटते, म्हणून की काय पौराणिक कथेत वसंताला कामदेवाचा पुत्र म्हटले जाते..

अशाच मन प्रसन्न करणाऱ्या वातावरणात होणारी थंड, रमणीय पहाट त्याचबरोबर कोकीळेला फुटलेला कंठ, आपल्या सुरेल स्वरात आंब्याच्या झाडावर बसून ती आपल्या सख्ख्या साद घालते , तोही तिच्या सादेला प्रतिसाद देतो.सर्वच पशुपक्षी, प्राणी आणि वनस्पती तसेच माणसांसाठी सुद्धा वसंत म्हणजे पर्वणी नाही का??सोन्यासारख्या धान्याच्या राशी घरात भरलेल्या असतात, त्याचबरोबर या महिन्यात येणारे होळी, रंगपंचमी, वसंतपंचमी, गुढीपाडवा असे सण सृष्टीच्या सौंदर्यात भरच घालतात …चैत्राची सुरवात चैत्राच्या स्वागतासाठी दारात रेखाटले जाणारे चैत्रांगण ,म्हणजे जणू स्वर्गच अंगणात अवतरल्याचा भास करुन देते…हेच चैत्रांगण परिपूर्णतेने वसंताचे आगत-स्वागत करते… म्हणून म्हणावेसे वाटते आला वसंत ऋतू आला….

-सुसिमा