कहाणी वेगळी प्रत्येकीची…

मनोरंजनाचे एक साधन म्हणून आपण टीव्ही सगळेच बघतो. या टीव्ही ने घरातल्या प्रत्येक माणसाचा ताबा घेतला आहे. सिरीयलची वेळ झाली की, घरातली हातातली काम तिथेच ठेवून गृहिणी पासून, आबालवृद्धांपर्यंत सगळ्यांना त्या मालीकांचे वेड लागून गेलं. सध्या गेली चार वर्षे झी टीव्हीवर चालू असणारी ‘माझ्या नवऱ्याची बायको’ हि सीरियल सगळेच पाहतात. त्यानंतर स्टार प्रवाह वर चालू असणारी आई कुठे काय करते ही मालिका असो किंवा झी मराठी वर प्रसारित करण्यात येणारी,’ अग बाई सासुबाई !’ ही मालिका असो, प्रत्येक मालिकेतील प्रत्येक स्त्रीचा संघर्ष आपल्याला आयुष्याच्या वेगळ्या वळणावर आणून सोडतो.’ माझ्या नवऱ्याची बायको’ या सिरीयल मध्ये प्रचंड मानहानी आणि अपमान सहन करून, स्वाभीमानाने स्वतःच्या पायावर उभा राहणारी राधीका. त्याचवेळी समाजातील अनेक स्त्रियांना मदतीचा आणि आधाराचा हात देणारी राधिका. मुलगा सुनेला काडीची किंमत देत नसताना, बाहेरख्याली असताना, आईप्रमाणे तिला आधार देणारे तिचे सासू-सासरे हे एक उत्तम सासू- सासर्‍यांचे उदाहरण आहे, त्यानंतर राधिके प्रमाणेच फसलेली शनाया, राधिकाचा हात धरून नव विश्व निर्माण करते. राधिकाची धडाडी पाहून, स्वाभिमान पाहून घटस्फोटित असतानाही तिला मुलासह स्वीकारणारा सौमित्र, हा एक नवा आदर्श समाजाला घालून देतो.

‘आई कुठे काय करते’ या मालिकेमधील स्वतः च्या नवऱ्याची साथ नसताना सोशिक वृत्तीने, नेटाने संसार चालवणारी, धडाडीने उभा राहणारी, साधी – भोळी आणि सरळ स्वभावाची अरुंधती… , स्वतः च्या मुलाच्या चुका असताना त्याला पाठीशी घालून अरुंधति वर सासुरवास करून, तिच्यावर हक्क गाजवणारी तिची सासू कांचन… तसेच घटस्फोटित असूनही समाजातील इतर स्त्रियांना संकटावर मात करायला शिकवणारी अनघा.. स्वतः नवऱ्याच्या नाकर्तेपणामुळे व सुरक्षित होऊन अनिरुद्ध च्या प्रेमात पडणारी संजना…

‘शंभू राजे’ मालिकेतील स्वतःच्या कुटुंबातील वाद बाजूला ठेवून, शंभूराजांच्या पाठीशी पहाडा प्रमाणे, खंबीरपणे उभी राहणारी, त्यांची बहीण राणूबाई. तसेच ‘अग बाई सासुबाई’ या मालिकेतील सासूची मैत्रीण होऊन, तिच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणारी शुभ्रा… आपल्याला, समाजाला एक नवा आदर्श घालून देते.आपल्या मुलाच्या चुका समजून सुनेला समजून घेऊन तीच्या पाठीशी उभी राहणारी आणि पुन्हा नव्याने संसार उभा करणारी आसावरी… तिला साथ देणारा अभिजीत… सगळीच उदाहरण आपल्याला एक उत्कृष्ट, अक नवा आदर्श घालून देतात…याच आदर्शांचा आपण विचार करून वाटचाल केली पाहिजे…

ही सगळी उदाहरण पाहता समाजात ही अशा कित्येक राधिका, शनाया, अरुंधती, अनघा, शुभ्रा आहेत. असंच आपल्याला दिसतं. यात प्रत्येक स्त्री च्या सुखाचे कारण एक असलं तरीही दुःखाची कारण मात्र वेगवेगळी असतात. प्रत्येक वळणावर अन्याय सहन करणारी ही फक्त स्त्रीच आहे. ती पेटून उठते जिद्दीने, धडाडीने आणि परिस्थितीला तोंड देऊन नामोहरम करून, पुन्हा आयुष्य जगते, स्वाभिमानाने…. सावित्रीबाई ने एक नवा आदर्श घालून दिला.. अशीच असते कहानी वेगळी प्रत्येकीची… स्वतःचे अस्तित्व निर्माण करणे, परिस्थितीवर मात करणे, अन्यायाला तोंड देणे, स्वतःच स्वतःशी केलेली प्रतारणा थांबवणे,

यातूनच निर्माण होते कहाणी वेगळी प्रत्येकीची….

https://susima.home.blog/2021/01/20/कहानी-वेगळी-प्रत्येकीची/

@all rights are reserved.

@Image source Google.

– सुसिमा

रूपे माणसांची…

आजची सायंकाळ थोडी वेगळीच आणि जीवाला हुरहूर लावणारी वाटत होती.सूर्यास्त पहावा असा विचार मनात आला.गच्चीच्या पायऱ्या चढून वर गेले, अस्ताला जाणारा तो दिनमनी थोडा उदास वाटत होता. माझे मन मात्र मनातील दुःखद आणि त्रास देणाऱ्या भावनांची निरवानीरव करत होते.आजच्या दिवसाचा निरोप घेत सगळ्या जगाची काळजी वाहणारा तो भास्कर सह्याद्रीच्या कुशिकडे विसावण्यासाठी सरकत होता…त्यालाही विसावा हवाच होता …या कंटाळवाण्या जगापासून…

आज कित्येक दिवसांनी लेखणी हाती घ्यावी म्हणले, बऱ्याच दिवसांच्या मनाला आलेल्या मरगळीला झटकुन टाकण्यासाठी आणि मनातील कडूगोड भावनाचा निचरा करण्यासाठी, त्यांना मोकळी वाट करून देण्यासाठी एक दुधारी शस्त्र म्हणजे लेखणी, कलम… कित्येक दिवसांत काहीच लिहिले नव्हते. पण अाज भरभरून लिहावेसे वाटले… माणसानं विषयी… माणसांच्या रुपांविषयी….

माणसाचे मन खूप चंचल असते नाही का??? क्षणात ते या टोकावरून त्या टोकावर उडी मारत असते.. विचारांच्या भवसागरात ते अष्टोप्रहर डुंबत राहते. या विचाराना एेलतिर असतो , पण पैलतीर नसतो. याच विचारांमध्ये, विविध रूपांची, आपल्या मायेची, प्रेमाची माणसे आपल्याला भेटतात… सुखदुःखाच्या धाग्यांनी विणलेल्या आयुष्यरुपी वस्त्रात आपल्यालाही काही माणसे सावरणारी, आवरणारी तर काही दुःखाच्या गर्तेत खोल लोटून देणारी, प्रचंड वेदना देणारी, दुःखासाठी कारण ठरणारी असतात… सर्वांच्या वागण्याचा मतितार्थ लावायला वेळ तरी कुठे असतो आपल्याला??? आयुष्याच अस असत की, आपल्याला चालत रहावं लागतं, अगदी काहीही झालं तरी…. जगरहाटी प्रमाणे…..

आपण म्हणतो, आपल्या आयुष्यात आपल्याला जी माणसं भेटतात, ती पूर्वसंचित म्हणून भेटतात.. त्यांचे आणि आपले नातेसंबंध कदाचित मागच्या जन्मीचे असू शकतात, स्वार्थाने बरबटलेली इतरांच्या दुःखात धन्यता माननारी, इतरांचा हवा तसा वापर करून घेणारी माणसं, स्वतः कधीच सुखाचे आयुष्य जगू शकत नाहीत, इतरांनाही देऊ शकत नाहीत.. पण आपल्या या छोट्याशा आयुष्यात आपल्या हाताला हात धरून चालणारी, इतरांच्या सुखासाठी धडपडणारी आणि सुखदुःखात साथ न सोडणारी माणसे जगण्याचा उद्देश सांगुन जातात. आपल्या आयुष्यात आपल्याला सावरनारी, सुख – दुःखात सोबत करणारी माणसे त्यांच्या आठवणींचे ठसे आपल्या स्मृतीपटलावर कायमस्वरूपी उमटवुन जातात… परमेश्वर अशा माणसांच्या रूपाने आपलं जगणं सोपं करत असतो..

काही माणसे सुखद प्रेमळ आठवणी ठेवून जातात.. काही माणसे दर्दभरी आठवण ठेवून जातात. काही रोमांचकारी, अंगावर शहारे आणणार्‍या आठवणी देतात… ‘व्यक्ती तितक्या प्रवृती’ या न्यायाने माणसाची वेगवेगळी रूपे जीवन प्रवाहाच्या मार्गावर अनुभवायला मिळतात. जगण्याचे गूज तीच माणसे शिकवून जातात. त्यांच्या पाऊल खुणा ठेवून जातात. जीवनाला एेलतीरावरून पैलतीरावर जायला मदत करतात. आयुष्याची नाव वल्हवण्याठी मदत करतात. ती माणसे मनःपटलावर आयुष्यभरासाठी कोरली जातात, त्यांचे ऋणानुबंध कधीही न पुसले जाणारे असतात अगदी कायमस्वरूपी साठी…..

– सुसिमा

https://susima.home.blog/2020/12/19/रूपे-माणसांची/

*All rights reserved.

* घास भरवते…

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*●ओथंबलेले क्षण●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
* चित्रकाव्य *

*○घास भरवते○*

घास भरवते खाऊन घे दादा,
बहिनीच्या हातचा घास,

पुन्हा मिळेल,
याचा नाही विश्वास.

पोर आपण फुटपाथवरची,
नाही कोणा श्रीमंत घरची,

शिळे तुकडे कचऱ्यातले,
आपली गुजराण करती.

मिळाला आहे एवढाच तुकडा,
दोघं मिळून खाऊ,

अजुन काही कुणाकडून मिळालं,
तर सांजेला जेऊ.

माय आपली भटकत असल,
दारोदर मागण्या भीक,

मिळल की नाही भाकरी तिला,
याची माहिती नाही तीथ.

एवढाच घास म्हणून,
रुसू तू नको,

मतलबी या दुनियेत,
उपाशी राहू नको.

नाही कोणाचा कोण,
या स्वार्थी जगात,

परमेश्वराने धरले मौन,
आताच्या युगात.

डोळे बंद करून,
तो आपली परवड पहात आहे ,

माय मात्र रोज आपली,
आसवात नहात आहे.

खोट्या या फसव्या दुनीयेत,
उभ आपण राहू,

शिळा तुकडा खाऊन तरी,
अस्तित्व आपलं पाहू.

-सुसिमा
. 07/07/2020 https://susima.home.blog/2020/07/07/446/
🍃🌹🍃🌹🍃🌹 🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

नभं उतरु आलं….

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*●ओथंबलेले क्षण●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
*○नभं उतरु आलं….○*

उन्हाने अंगाची लाही होत असताना, अचानक काल आभाळ भरून आलं. दाही दिशांचे काळसर ढग भराभर जमले आणि पावसाच्या जोरदार सरी बेधुंदपणे बरसू लागल्या…. कित्येक दिवसानी एखाद्याने उरात दाबून ठेवलेले अनंत दुःख बाहेर यावं असं वाटलं… तसं पाहता कोकणातला पाऊस खूप हळवा वाटला मला…. कोसळायला लागला की कोणाचेही न ऐकणारा… एखाद्या हळव्या मुलीला अतीव दुःख व्हावे, नी काही केल्या तिचे अश्रू थांबुच नयेत… तसंच काहीसं या कोकणातल्या पावसाचं बरसन… काही औरच आहे…

सहज गॅलरीतून पाहू लागले, तर संततधार पावसाचा धारा कोसळत होत्या. नको, नको म्हणाल, इतका कोसळणारा पाऊस मलाही कळेना, त्याची समजूत तरी कशी घालावी?? तीन-तीन तास हा कोसळतोय… थकतो की नाही ??? पांढऱ्याशुभ्र पावसाच्या सरी सर्व डोंगरमाथ्यावर कोसळताना दिसत होत्या. उन्हामुळे धरणी कासाविस झाली होती, तिचा मात्र उसवा निघत होता… ती अजिबात दुखी नव्हती, उलट गालातल्या गालात हसत होती… पावसाच्या आगमनाची तृप्तता ती अनुभवत होती..

वातावरण थंड झाले. उन्हाने होणारी जिवाची तगमग थांबली. सगळी झाडेझुडपे, लतावेली, पर्यायाने सर्व सृष्टी न्हाऊन निघाली. फुललेला गुलमोहर पावसात न्हाऊन निघाला होता… तो खूपच मनस्वी , लाघवी आणि प्रसन्न वाटत होता. त्यातून ओघळणारे थेंबही वेगळीच तृप्तता अनुभवत होते… गॅलरीतून अंगावर उडणाऱ्या छोट्या तुषारांनी मीही थोडीशी भिजून गेले. ते पावसाचे थेंब गॅलरीच्या बार वरून अंगावर उडत होते, जणू काही तेच मला भिजायला बाहेर बोलवत होते. दूरवर नजर गेली दूरवरचा सारा परिसर पांढराशुभ्र होऊन धूसर झाला होता. पावसाचं काय? नी माणसाच काय?? पाऊस या धरित्रीला प्रफुल्लित करतो… हिरवा शालू नेसवतो. आपला बळीराजा पावसाची आतुरतेने वाट पाहतो, पण आज त्याच्या मनात वेगळेच काहीतरी होते, अवखळ मुलाप्रमाणे तो नको ,नको म्हणता बरसतच होता. आपण कितीही मोठे झालो तरी , आपल्यालाही कधी वाटतं एखाद्या गोष्टीसाठी छान हट्ट धरावा कोणाजवळ तरी….. असंच काहीसं कोणाजवळ तरी रुसावं, फुगावं, अबोल व्हावं… असाच काहीसा हट्ट याचा… माझ्या मनात आठवणींचा पाऊस दाटत होता… त्यात च मी काही क्षण हरवून गेले….लहानपणीच पावसात भिजणं, येरे येरे पावसा म्हणत गोल गोल स्वतःशीच फिरण….ओठांवर अलगद ते पावसाचे थेंब झेलण… मन नकळत भूतकाळात गेले.. अंगावर वाऱ्याच्या वेगाने, झुळूक आल्यामुळे अचानक पावसाच्या पाण्याचा शिडकावा झाल्याने मी भानावर आले…

उडणाऱ्या तुषारांनी आणि थंडगार वाऱ्याने एक हलकासा शहारा अंगावर येत होता.. पाऊस धारा तनमन फुलवत होत्या.. हवेची हलकेशी झुळूक त्यांना स्पर्श करून गुदगुल्या करत होती… तरीही त्या बरसतच होत्या… वसुंधरा तृप्त होत होती. हे दृश्य सलग दोन-तीन दिवस मी माझ्या मनात साठवत होते….धरित्री पुन्हा नव्याने हिरवा शालू नेसली होती… उचंबळणार्‍या मनाने गाणे गात होती..

“नभं उतरू आलं…

चिंब थरथर वलं…

मन झिम्माड झालं.

हिरव्या बहरात….”

_-सुसिमा

03/06/2020

@All rights are reserved.

*Image source – Google.
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

पोशिंदा जगाचा महान…

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*●ओथंबलेले क्षण●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃
*○पोशिंदा जगाचा महान○*

घामामधून ज्याच्या, पिकत मोत्याचे रान,

पोशिंदा जगाचा, तो आहे थोर महान.

तांबडं फुटताच, लगबग सुरू होते त्याची,

घाई असते त्याला, शेतावर जाण्याची.

ऊन नाही, तहान नाही, पाहत कधीच,

जुगार आयुष्याचा, असतो नेहमीच.

पेरलेल्या दाण्यांचा, कधीच भरोसा नसतो,

पीक येईल तरारून, या आशेवर जगतो.

बळीराजा देवाला साकडे घालतो मनी,

सोनं व्हाव दाण्यांच, असते आस ध्यानी.

पांदितली वाट तुडवत, सांजेला येतो घरी,

कस होईल पिकाचे,धाकधूक हीच ऊरी.

लेकरे उपाशी त्याची, दिवस काढतात वेळी,

काळजी वाहे जगाची साऱ्या,तो सर्वकाळी.

पोशिंदा तो लाखांचा, ठरला जगात महान,

माय जमीन त्याची, पडली सावकाराकडे गहाण.

बैलजोडी त्याची, साथ देत राहील,

सुखदुःख आयुष्यातलं, तीच वाटून घेईल.

नाही सोडत धीर,पडला जरी दुष्काळ,

संयमाने होतो आयुष्यात, यशाचा सुकाळ.

-सुसिमा

01/06/2020
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

राधा बावरी…

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*●ओथंबलेले क्षण●*
*╰═══════════════════╯*
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃

*○कवितेचे नाव – राधा बावरी..….○*

पैंजनाचा आवाज तुझ्या, येता माझे कानी,

आलीस तू राधा, या विचारात सुखावतो मी मनी.

रंगावर गोऱ्या तुझ्या, भाळला श्रीहरी,

आहे तूच सर्वस्व माझे, जपतो तुला उरी.

ओठ तुझे आहेत ग, गुलाबासम,

ओढला जातो मी, तुझ्याकडे प्रत्येक क्षण.

मिठी तुझी वाटे मला, स्वर्ग सुखाहून महान,

राहावे वाटते कवेत तुझ्या, विसरून भूक तहान.

लाडक्या या सख्याची तुझ्या, होऊन जा सखी,

राहशील काळजात माझ्या, काय सांगू आणखी??

स्वभाव तुझा, आहे ग खूपच प्रेमळ,

तना-मनाने सर्वार्थाने, आहेस तू निर्मळ.

किती गुणी आहेस तू, प्रिय सखी छान,

तूच माझे आयुष्य आहेस, वाटतो मला अभिमान.

पारिजात निस्वार्थीपणे, उधळतो जसा परिमळ,

तशीच आयुष्यात माझ्या, घेऊन आलीस दरवळ.

म्हणतात जिंकते जग प्रेमाने, प्रेमाचाच कर कहर,

जिवापाड करतो प्रेम तुझ्यावर, हा वेडा मुरलीधर.

करताना लाड तुझे , उचंबळून येते उरी,

भोळी-भाबडी परी हट्टी, माझी राधा बावरी…

सुसिमा

३०/०५/२०२०

@All rights are reserved.

*Imge source – Google.
🍃🌹🍃🌹🍃🌹🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

*मला माझं बालपण परत हवय….

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*●ओथंबलेले क्षण●*
*╰═══════════════════╯*
🌷🍃🌹🍃🌷🍃🌹🍃🌷
*○मला माझं लहानपण परत हवंय○*

मला माझं लहानपण परत हवंय…!

दिवस खूप भकास चालला होता. पण वातावरण हळूहळू बदलायला लागलं, पांढरेशुभ्र आकाश पक्षाच्या थव्याप्रमाणे ढगांनी दाटून आलं. मातीचा सुगंध येऊ लागला आणि जाणवलं. आता पाऊस येणार..!

मातीला सुगंध देणारा पहिला पाऊस….! उन्हाळ्याच्या गरमीतून सुटका करून देणारा पहिला पाऊस….! सगळ्यांची तारांबळ उडविणारा पहिला पाऊस…! आणि माझ्या मनाला हवाहवासा वाटणारा पहिला पाऊस…! मग काय!! मी आज मनसोक्त भिजायचं ठरवलं. सर्वकाही विसरून, मी पावसात भिजू लागले. पावसाचे थेंब अंगाला स्पर्श करत होते. माझ्या बागडणाऱ्या मनावर ,शरीरावर अजून आनंदाचा वर्षाव करत होते.

मी पावसात फक्त उभी होते, पण पावसाच्या थेंबांनी मला चिंब भिजवून टाकलं होतं. जसजशी भिजत चालले होते, तस तसे माझे विचारचक्र मला भूतकाळात नेत होतं. माझ्या आठवणीतल्या प्रत्येक पहिल्या पावसाची आठवण करून देत होते. मला आता हे प्रकर्षाने जाणवायला लागलं होतं, की मी आज मुद्दामून पहिल्या पावसात भिजते आहे. असं का?? मला भीती का वाटत नाही?? निसटून पडण्याची, वादळाची व सर्दी होऊन आजारी पडण्याची!!!! आणि याचे उत्तर माझ्या मनाने शोधले होतं. त्याचं कारण असं आहे की मला आनंद घ्यायचा आहे.

जसजसे विचार चक्र फिरत राहिलं, तसे मला आत्तापर्यंतचे पावसाळे आठवत गेले. कधी मी शाळेतून घरी परतत असताना दप्तराचं ओझं चिखलात उड्या मारीत घरी आलेले. कधी शेतात काम करीत असताना पावसात भिजत घर गाठलेले… तर कधी गुर चारायला गेल्यावर पावसात सापडलेले.. असं मला मुळीच आठवत नाही की, मी मुद्दाम पावसात भिजलेले… मग आजच का???

बऱ्याचदा मी घरी असतानाही पहिला पाऊस आला, पण त्यानं देखील मला न भिजवता सोडलं नाही.. काहीतरी पसारा आवरण्याचा निमित्तानं का होईना मी पावसात भिजत जायचे आणि मग चिंब भिजायचे. पाऊस चालू असताना चिखलाचा पाण्यात पायांचे ठसे उमटवने, इतरांना पाडण्यासाठी सरका तयार करने, गढूळ पाण्यात उड्या मारणे, जर गारा पडल्या तर त्या वेचून हावरे पणाने वेचणे आणि खाणे… या सर्व गोष्टी मला आठवू लागल्या.

मला आजही त्या सर्व गोष्टी कराव्या वाटताहेत. गढूळ पाण्यात उड्या माराव्या वाटताहेत.. पुन्हा या मातीत पावसाने पावलांचे ठसे उमटवावे वाटताहेत… असं शांत उभा राहून भिजण्यात काहीतरी आनंद कमी झाल्यासारखा वाटतोय… मला पुन्हा पाण्यात बागडायचे आहे ,मला पुन्हा पाण्यात नाव सोडायची आहे. पाण्यात ठिकऱ्या उडवायचे आहेत…
मला पुन्हा पावसात तसेच भिजवायचे आहे… चिखलात ठसे उमटवायचे आहेत… त्यासाठी मला माझं बालपण परत हवंय… मला माझं लहानपण परत हवंय…..

_-सुसिमा

३०/०५/२०२०

@All rights reserved
🌷🍃🌹🍃🌷🍃🌹🍃
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

तो आम्रवृक्ष होता….

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
*● ऋणानुबंधाच्या गाठी●*
*╰═══════════════════╯*
🌷🍃🌹🍃🌷🍃🌹🍃🌷

*○तोआम्रवृक्ष होता○*

वाटसरूला सुखावून,आशिष घेतले त्याने,

क्षणांची जपत माळ, मी बिलगते त्याला प्रेमाने.

नाही झाली अडचण त्याला, माझ्या सहवासाची,

अनंत दुःखे माझी सोसतो, वर्षानुवर्षाची.

कधी नाही लोटले दुर, दिली मायेची सावली,

देवी ही कोणती इतकी, मला नाही पावली.

माझ्याशी हितगूज करताना, तो आनंदून जायचा,

चुकले पाहून कधी, तर पदरात घ्यायचा.

म्हणाला सदैव आहे, मी तुझ्यासोबत,

एकटे राहण्याची तुला, नाही येणार नोबत.

वाटलं कधी एकट तरी, ये मला भेट,

नाही घेतले समजून कोणी, बिलग मला थेट.

भल्याबुऱ्या आयुष्यातील घटनांचा, ठरला साक्षीदार,

सुखदुःख माझ ऐकणारा, प्रामाणिक साथीदार.

सतत बळ देत राहिला, मला लढण्याचे,

आयुष्यातील संघर्षांना, तोंड देण्याचे.

त्याची शिकवण, छाया ठरली पित्रवत माझ्यासाठी,

आठवण त्याचीच छळते, मला दर दिवसाकाठी.

घरापासून माझ्या जवळच, तो वसला होता,

त्याला भेटल्या वाचून, सांज सकाळ जात नव्हता.

म्हणाल तुम्ही कोण असे, तो तुझा जिवलग सखा,

दुसरे तिसरे कोणी नसून, तो एक आम्रवृक्ष होता…

_-सुसिमा

२९/०५/२०२०

© All rights reserved.

Image source- Google.
🌷🍃🌹🍃🌷🍃🌹🍃🌷
*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

*नाती ऋणानुबंधाची….*

*✤______________________________✤*
*╭═══════════════════╮*
* ●ओथंबलेले क्षण●*
*╰═══════════════════╯*
🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷🍃🌷
*○नाती ऋणानुबंधाची○*

दिवसभर उन्हामुळे घराबाहेर पडता येत नव्हते. मात्र सायंकाळी उन्हाच्या झळा थोड्या कमी झाल्या,असं वाटलं.नी गच्चीवर मी फिरायला गेले…असा माझा नियम होऊन गेला होता. पश्चिमेला लक्ष गेलं सुर्यास्त होण्यास अजुन वेळ होता.. मंद वारा वाहत होता. उन्हं बरीच कलंडून गेली होती. आकाशात थोडीशी लालिमा पसरली होती.. कुठेतरी एखादा ढग येत होता नी सूर्याला पाठीमागे लपवत होता.पुन्हा सूर्यदर्शन होत होते. सहज क्षितिजापर्यंत नजर गेली अखंड पसरलेला सह्याद्री चारी बाजूंनी खुणावत होता, सूर्याचा प्रकाश त्या दूरवर पसरलेल्या सह्याद्रीच्या रांगेवर अलगत पसरला होता. थोडा वेळ जाईल तसे, आकाशाची लालीमा अजून गडद होत होती. घरट्याच्या ओढीने पाखरे थव्यांनी परतत होती. अशा वातावरणाने मन पुलकित होऊन गेले. तरीही कातरवेळ होती ती.

माझ्याही मनात या कातरवेळी विचारांचे काहूर निर्माण झाले. मन कधी भूतकाळात जात होते, तर कधी वर्तमानात येत होते,मी दूर उभी होते, माझा भूतकाळ, वर्तमानकाळ आणि भविष्यकाळ यांचा खेळ दुरूनच पाहून मी समीक्षण करू लागले…

आपल्या आयुष्यात आजपर्यंत कितीतरी माणसे आली. वेगवेगळ्या स्वभावाची वेग वेगळ्या विचारांची आणि वेगवेगळे पैलू पाडलेली-सुद्धा….. आपली रक्ताची नाती ही काही वेळेस साथ देत नाहीत, पण रक्ताची नसतानाही आपलेपणाने आयुष्याच्या प्रत्येक वळणावर साद घालणाऱ्या नात्यांनी माझ्या आयुष्याच्या रोपट्याचे रुपांतर एका सुंदर वृक्षात होत आहे…हे प्रकर्षाने जाणवले. त्यांना कदाचित नाव नसेलही, पण अशी नाती प्रत्येकाच्या आयुष्यात खूप महत्त्वाची भूमिका निभावतात. त्यांना ‘ऋणानुबंधाची नाती’अस आपण म्हणतो.

कोणताही स्वार्थ न ठेवता, एक निर्मळ, निखळ आणि पराकोटीचा प्रेम देणार, आधार देणार, प्रसंगी धीर देणारे, सुखदुःखात साथ देणारे, उभ्या वादळातही आपल्याला कोलमडून न देणार नातं….. या नात्याला कोणत्याही नात्याची सर नाही, कोणत्याही नात्याची तोड नाही.. आपसूक जोडले गेलेले हे नातं, कधीच आपल्याला परक करत नाही.. साथ ही सोडत नाही. मग ते मित्राचे असेल, मैत्रिणीचे असेल.. तिथे वयाचे बंधन नसते असतो तो फक्त विश्वास, जिव्हाळा, आपुलकी, काळजी, नी प्रेम…. नसतो तिथे कोणताच स्वार्थ..मागच्या जन्मीचं पूर्वसंचित म्हणून ती आपल्या आयुष्यात ती नाती आलेली असतात..

ऋणानुबंधाची ही नाती जपता येण्यासाठी प्रारब्धाही तेवढे चांगले असावे लागते, तर ती नाती फुलतात, बहरतात, उन्हाळ्यात गुलमोहर कसा बहरतो बघा!!!! अगदी तशी…. मोगऱ्याच्या झाडाला बहर आल्यावर त्याचा सुवास सर्वत्र पसरतो, तशीच ही नाती सुद्धा आपले जीवन सुगंधित करतात… रणरणत्या उन्हात भाजून तप्त झालेल्या धरणीला जसा पाऊस सुखावतो आणि दाही दिशांत त्या मातीचा मृगंध दरवळतो, तशी नाती ऋणानुबंधाची…..

संचिते मिळती नाती ऋणानुबंधाची,

जपून त्यास सफल करू कसोटी नात्याची…”

_-सुसिमा

@ All rights are reserved.

Image source- Google
🎋🌾🎋🌾🎋🌾🎋🌾
२४/०५/२०२०

*╰✤▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬✤╯*
╰════════════════╯

रांगोळी समृद्ध जीवनाची…

*✤_______________________________✤*
*╭════════════════════╮*
* ●ओथंबलेले क्षण●*
*╰════════════════════╯*

*○रांगोळी समृद्ध जीवनाची○*

आज जरा लवकरच जाग आली… सूर्योदयाला थोडा वेळ होता. विचार केला चला सडा टाकून घेऊ… अंगणात छान सडा टाकला. कुंडीतील रोपांना अगदीं मनसोक्त पाणी दिलं… कुंडातील चीनी गुलाब, कोरफड, शेवंती पाणी दिल्यावर बिचारी शहारून गेली.. आणि गालातल्या गालात हसू लागली. त्यांना पाणी दिलं आणि माझ्या मनाला एक वेगळच समाधान मिळालं..

तुळशीवृंदावनासमोर रांगोळी रेखाटायला घेतली. रांगोळी रेखाटण्याचा माझा नित्यनियम. ठिपक्यांची छान रांगोळी काढली, या रांगोळीला वेली आणि पाने- फुले यांनी सजवली. ती पांढरी रांगोळी फार आकर्षक वाटत नव्हती. काहीतरी उणेपणा मला तिच्यात जाणवत होता. रंग उचलले रांगोळीत भरलेही हिरवा, केशरी, निळा, पिवळा, गुलाबी. रंग भरल्यावर ती खूप सुंदर दिसू लागली. मी समाधानाने पुन्हा एकदा रांगोळीकडे पाहिलं. आता माझ्या मनासारखी झाली होती… सूर्योदयानंतर सूर्याची किरणे पडल्यावर ती अधिक सुंदर दिसू लागली.

मनात विचार आला आयुष्यही असंच असावं नाही का??? आपल्या आयुष्यात ओकेपणा येऊ नये म्हणून काही माणसं आयुष्यात रंग भरतात.. जीवनाची रांगोळी अशी पांढरी असेल तर थोडी उदासीनता येत असेलही कदाचित, पण त्यामध्ये रंग भरले तर तिला एक वेगळाच आकर्षकपणा येतो. ती सगळ्यांचेच मन मोहून घेते….

आपल्या आयुष्यात आपल्यावर प्रेम करणारी, आपल्याला समजून घेणारी, आपल्या जीवनाच्या रांगोळीत रंग भरणारी माणसं खूप महत्त्वाची असतात. मग ती व्यक्ती कोणीही असेल!! आपले आई-वडील, आपल्या मित्र-मैत्रिणी, आपला जोडीदार किंवा आपली बहिण -भाऊ. अशा व्यक्ती आपले आयुष्य खूप आकर्षक आणि हवहवसं बनवतात. अशा प्रेम करणाऱ्या ,आपल्या सुखदुःखात सोबत उभा राहणाऱ्या माणसांमुळे, आपल्या जीवनाची रांगोळी नक्कीच सुसंस्कृत, समृद्ध बनते. त्यामध्ये असणाऱ्या रेषा, फुले, पाने, विविध आकार हे, आपल्या आयुष्यात येणारे वेगवेगळे प्रसंग आणि हे सगळे विविध रंग म्हणजे त्यामध्ये आपल्या जिवलग माणसांनी दिलेली साथ असते.

आपण बोलतच नाही मूक राहतो, पण जीवनाची रांगोळी सर्व काही बोलून जाते, त्यामुळे ती रांगोळी रंगीबेरंगी,आकर्षक ,छान व समृद्ध करण्याचा प्रयत्न करायला हवा,

समृद्ध रांगोळीचा ठेवा जपायला हवा तरच जगणं समृद्ध होईल….

*”रांगोळी सुंदर जीवनाची रेखाटू,

रंग त्यात प्रेम – चैतन्याचे भरू.”

_- सुसिमा

@All rights are reserved.

२३/०५/२०२०

*╰✤▬▬●❂❃۩▪️S▪️ ۩❃❂●▬▬✤╯*
╰══════════════════╯